शिक्षक सागर भोईर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव..!

| ठाणे | महाराष्ट्र राज्य नपा व मनपा शिक्षक संघ यांच्यामार्फत दरवर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शाळा पुरस्कार वितरित केले जातात. भिवंडी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असलेले उपक्रम शील शिक्षक सागर बबन भोईर यांना सन २०२०-२०२१ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या दिवशी जाहीर झाला आहे.

सागर भोईर हे गेली बारा वर्ष भिवंडी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत आहेत. त्यांनी महानगरपालिकेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवले. पालक व ग्रामस्थ यांच्याशी असणारे सौहार्दाचे संबंध ही त्यांची सर्वात जमेची बाजू. पटसंख्या वाढविण्यासाठी त्यांनी अनेक कृती संशोधन व नवोपक्रम राबवले आहेत.त्यासोबत महानगरपालिकेतील दहावी च्या विद्यार्थ्यांना मोफत विशेष मार्गदर्शन गेली अनेक वर्षे करत आहेत. सध्या शाळा क्र. ०२, शांतीनगर येथे कार्यरत असलेले सागर भोईर सर हे ह्या अगोदर शाळा क्र. ४६ व शाळा क्र. ९३, चाविंद्रा येथे सेवा बजावली आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमात गौरव केला आहे. कला व क्रीडा या क्षेत्रात त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. ते स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा पंच आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या क्रीडा नैपुण्याचा फायदा गरीब विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी शाळेच्या वेळे व्यतिरिक्त कालावधीमध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा प्रशिक्षण चालू केले, ज्याचा फायदा महानगरपालिकेतील गरीब विद्यार्थ्यांना होऊन अनेक विद्यार्थ्यांनी खोखो, लंगडी, कबड्डी, ॲथलेटिक्स अशा मैदानी खेळात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर महानगरपालिका शाळेचे नाव उंचावले आहे.

सध्या चालू असलेल्या कोरोना महामारी च्या काळात, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, फोनच्या मार्फत वैयक्तिक मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भरीव कामगिरी केली आहे. लहानपणापासून असलेली समाजसेवेची आवड त्यांनी जोपासली आहे. विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या व शिक्षकांच्याही समस्या निराकरणासाठी ते सदैव झटत असतात. ह्या अगोदर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शिक्षण मंडळ तसेच विविध संस्था ह्यांच्या मार्फत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य नपा व मनपा शिक्षक संघाने घेवून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या दिवशी जाहीर करण्यात आले आहे.

एका कार्यकुशल, मेहनती व प्रामाणिक शिक्षकाला हा पुरस्कार प्राप्त झाल्याने भिवंडी महानगरपालिका शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. भिवंडी विभागातील सर्व शिक्षक संघटनांनी व भिवंडी पूर्व चे मा. आमदार रुपेश दादा म्हात्रे यांनी त्यांना मंगल सदिच्छा दिल्या आहेत, तसेच अनेक सामाजिक व परिवारातील लोकांच्या कडून त्यांचं कौतुक केलं जातं आहे. जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने मुख्य राज्य संपर्क तथा मिडिया प्रमुख प्राजक्त झावरे पाटील, कोकण विभाग प्रमुख अमोल माने, महेश पाटील आदी यांच्याकडून देखील त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *