शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा : पुष्प ६ वे – ‘ विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास ‘ हे ध्येय उराशी बाळगून मातेसमान विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या, विद्यार्थ्यांना लिहतं करून विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन भरवणाऱ्या, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांतून व्यक्त होण्याची सुवर्णसंधी देणाऱ्या आदर्श शिक्षिका श्रीमती अनिता जावळे, लातूर..!

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या प्राथमिक शाळा पाहता, यात तिथे काम करणाऱ्या शिक्षकांचा वाटा सर्वाधिक मोठा किंबहुना त्यांच्यामुळेच ते शक्य झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ५ स्पटेंबर शिक्षक दिन या दिवशी शिक्षकांबद्दल उपकृत होण्याचा प्रयत्न समाज करत असतो. परंतु त्याहून अफाट काम करणाऱ्या या शिक्षक रत्नांची त्यांच्या आभाळाएवढ्या कामाची अल्प माहिती सर्वांसमोर यावी त्या दृष्टीने दैनिक लोकशक्ती ४ सप्टेंबर पासून १५ सप्टेंबर पर्यंत ‘ शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा ही लेखमाला सुरू करत आहोत.

यातून असामान्य काम करणाऱ्या प्रेरणादायी अवलियांची गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडत आहोत.

नक्की वाचत रहा..!

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा

पुष्प सहावे : ‘ विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास ‘ हे ध्येय उराशी बाळगून मातेसमान विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या, विद्यार्थ्यांना लिहतं करून विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन भरवणाऱ्या, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांतून व्यक्त होण्याची सुवर्णसंधी देणाऱ्या आदर्श शिक्षिका श्रीमती अनिता जावळे..
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अनिता जावळे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव काळे तालुका जिल्हा लातूर या शाळेत कार्यरत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत अनिता ताईंचे शिक्षणाचे समृद्ध प्रयोग..

✓✓ माझी शाळा आमचे उपक्रम :

मुलांचा सर्वागिण विकास साधण्यासाठी शाळेत विविध उपक्रम घेतले जातात. उपक्रम निवडत असताना उपक्रम उदिष्टे, जीवनावश्यक उदिष्टे अभ्यासक्रम सांगड आणि पाठ्यक्रम याचा समावेश करून विविध उपक्रम शाळास्तर आणि वर्गस्तर उपक्रम घेऊन मुलांना शिकण्यासाठी मदत केली जाते. मुल समजून घेऊन मुलांची शिक्षणाशी नाळ जोडली जाते. मुलांना शाळा हवी हवीशी वाटू लागते तेव्हा शिक्षक म्हणून खूप समाधान मिळते.

उपक्रम :
मन की बात मुल समजून घेताना :

या उपक्रमामुळे मुल शाळेत येऊ लागली उपस्थिती वाढण्यास मदत झाली या मधील मी केशव, सुहानी आणि संस्कार यांची यशोगाथा सादर करते.

मुल समजून घेताना..!

अ) केशव…

केशव भागवत कवडे
केशव पाचवीत शिकतो. मुल त्यास केशव्या म्हणतात. शरीर प्रकृती सडपातळ वर्ण गोरा अतिशय चंचल. वर्गात शांत म्हणजे ,”वादळ पूर्वीची शांतता असते. वर्गात अध्ययन चालू असले तरी तो इतराबरोबर खोड्या करणार म्हणजे करणार चांगली कुस्तीच धरतो लगेच. एकदा अंगणवाडीतील मुली आणि पहिलीतील मुली मला म्हणाल्या ,”mam केशवला आम्ही काल चांगलच धुतले. मला काही हसू अवरेना ! केशवने मार खाल्ला तुमचा !

हो mam आम्हाला तो सारखा चिडवत असतो म्हणून..

केशव खूपच चिडचिड करत असतो.. तसा तो खूप हुशार त्याचे विचार इतरापेक्षा वेगळेच असतात. त्याचा दोष नाही कारण, त्याचे बाबा रोज दारु पिऊन घरी येतात.. एक दिवस केशव सर्वा बरोबर भांडण करीत होता. मला लक्षात आले.. काही तरी घरी याच्या झाले आहे. जेवणाच्या सुट्टीत आम्ही एकञ जेवण करीत असे. मी मुलाबरोबर जेवण करण्यासाठी बसल्यामुले मुल समजून घेण्यात खूपच मदत झाली..
केशवला मी म्हणाले , “काय झाले आस का करतोस घरी काय अडचण !केशव म्हणाला आई चार दिवस झाले मामा कडे गेली. बाबा बरोबर भांडण करुन दोघ माझ ऐकतच नाहीत! आई आणि बाबा पण ! राञी बाबा पिऊन आले आणि लागले भांडण करायला.. मग काय आईला मी म्हणालो तु शांत बस पण आई माझ ऐकते का..! बसलो पांघरूण घेऊन ..आणि गेली दुसऱ्या दिवशी राग राग मामा कडे मला सोडून तीला माझ काही वाटतच नाही !
मी म्हणाले तस नाही रे केशव आईला फोन करु का मी ? बोल तु आई बरोबर ..
तो म्हणाला फोन पण लागत नाही तिचा. बर माझ्या बरोबर येतोस मग ! नको mam राञी चूलतीला फोन करण्यास सांगतोना.. त्याच्या मनाची हलचल मला चांगलीच अस्वस्थ करुन गेली. दुसऱ्या दिवशी केशव आनंदाने पळत माझ्या कडे आला आणि म्हणाला आई आली mam.. आनंद पाहण्यसारखाच होता ! छोट्या जिवाला किती सहन करावे लागत आहे.. बाबाच्या व्यसनामुळे त्याच बालपण हरवत आहे कुठे तरी !
काळजी वाटते मला त्याची. केशव माझ्या जवळच असतो सतत बोलत राहतो. कधी कधी माझ्या गालावर आपले चिमूकले हात फिरतो आणि म्हणतो mam किती किती छान आहात!

मकरसंक्रात सण होता. शाळेत हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. केशवची आई देखिल आली त्याच्या आईस भेटले आणि केशवची काळजी घ्या. त्याला ऐकट्याला सोडून जाऊ नका खूप परिणाम होतो त्याच्या मनावर .. आई बरोबर संवाद साधला समजून सांगितले… घरातील वातावरणाचा परिणाम लेकरावर होत असतो. केशव खूप हूशार आहे.

ग्रामीण भागात या सणा निमित्त चूडे बसवतात हा चूडा लाखे पासून नाहीतर डांबरा पासून बनवतात.. एक पाटली जोडी साधारण २० रु पर्यत असते. केशवने आई जवळ हट्ट करून माझ्या आवडत्या रंगाची पाटल्या आणल्या होत्या. सकाळ पासून माझा माघे होता mam घरी चला आई कडून तुम्हाला चूडे बसवायचे आहेत.. इतर मुलांनी पण मला घरी घेऊन जात होते. पण केशव शेपटासारखा सारखा मागेच ! मुले त्यास म्हणत होती अरे ! तुझे बाबा घरी असल्यास कसे ! केशव शांत झाला तेव्हा मी त्यास म्हणाले ,”येते केशव मी तुझ्या घरी.. केशव आणि मी त्याच्या घरी गेलो घराला कुलूप ! केशव जोरत ओरडत होता आई आई sss मला सांगत होता, mam काळजी करु नका शेजारी बसली असेल ? केशवचा आवाज ऐकून आई बाहेर आली. केशव नाचूच लागला कुठ बसली होतीस माझ्या mam घरी येणार माहीत नव्हत का तुला ? आईने दार उघडले आणि आम्ही घरात गेलो. शेतातील घर छानच होत. केशव मला सांगत होता हे माझी खेळणी, छोट्या छोट्या गाड्या. केशवच्या अंगणवाडीतील मैत्रीणची टिम देखिल केशवच्या घरात दाखल झाली. मस्त गप्पा आमच्या रंगल्या. तितक्यात केशव म्हणाला ,”गुलाबी रंगाचे चूडे बसव mam ला..” जवळच बसला आणि आईला सांगत असे पोळेल बघ चूडा नीट बसव बघ!
त्यातच प्रश्न पण करे ! असे चूडे का घालतात. काचेच्या बांगड्या तुम्ही का घालत नाहीत असे अनेक प्रश्न.. प्रश्नाचा भडीमार असे! घरी गेल्यास त्याला जो आनंद झाला होता. मला शब्दात सांगता येणार नाही ! मला खूपच समाधान वाटले त्यास आनंद देऊन.
दुसऱ्या दिवशी केशव शाळेत आला वर्गात पाठ अध्यापन चालू होते मी मुलांना संवाद लिहीण्यास सांगितले. शाळेतील सर्व गाण्यात बोलणार असा संवाद होता .. केशवने खूपच सुंदर संवाद लिहीला आणि सादरही केला ..
मुल आनंदात असली शिक्षण खूप सुलभ होत हे माझा चांगलेच लक्षात आले केशवच्या वर्तनावरुन.

मला शिक्षणाची वारी निमित्त नाशिकला जायचे होते.. केशव खूपच नाराज झाला मला म्हणाला ,” चार दिवस येणार नाही! अस्वस्थच झाला कशी तरी समजून काढली आणि म्हणाले नाशिक साठी शैक्षणिक साहित्य त्या बॉक्स मधे भर. तुझ्या आवडीप्रमाणे केशव साहित्य भरु लागला. त्या बॉक्सवर लिहू लागला. नाशिक करांनी आमच्या भाषा दालनास नक्की भेट द्यावी ..अस काय काय लिहीत होता.. मला त्याच्या मनाची अतूरता कळत होती .
जाताना हळूवार गालावर हाताचा स्पर्श करीत म्हणाला लवकर या मी फोन करतो तुम्हाला ! तुम्ही गेलात की करमत नाही आम्हाला.

नाशिक वारी संपली घरी सकाळी आले तर मुलांचे फोनवर फोन.. शाळेत येणार आहोत का आज mam ? मी म्हणाले येणार थोडे उशिला येते खूपच थकले. दुपारी शाळेत प्रवेश मुले चिक्कार करत माझ्या जवळ गोळा झाली ..बस त्यांना पाहून माझा देखिल थकवा पळून गेला.
केशव जवळ आला आणि म्हणाला ,”आता कुठे जायच नाही ना ? मी म्हणाले नाही आता नाही कुठे जाणार नाही. “खरच ! आणि नाचूच लागला .
ही लेकरं माझ्या वर जीव लावतात.. ! लाखमोलाची माझी हिच तर आयुष्यातील कमाई ….

ब) सुहानी..

सुहानी रामदास हजारे
सुहानी रामदास हजारे इयत्ता ६ वी वर्गात शिकते..
सुहानी नावाप्रमानेच सुहाना सफर अशीच आहे. मी तिला इयत्ता ५  वी  पासून अध्यापन करते माझ्या कडे भाषा विषय .. सुहानी शब्द वाक्य छान वाचत होती पण तिला लिहीता येत नव्हते. अक्षरातील साम्य भेद तिला समजत नव्हता आता देखिल छ आणि ध या अक्षर  लिहीण्यात गोंधळून जाते.. एक दिवस फळ्यावर तिने काही तरी लिहीले तिलाच तिची लिपी माहीत! तिने लिहीलेला मजकूर आम्हाला वाचता येत नव्हता उभ्या आडव्या रेषा कुठ गोल अर्ध गोल असच काही तरी..
मला म्हणाली  ,”mam मी हे वाचून दाखवते.” मस्त तीने वाचले त्यातील विचार छान ! पण आम्हा सर्वाना तिने काय लिहीले ते समजेना.. मी प्रथम तिची अडचण काय आहे लक्षात घेतली. अक्षराच्या जगात तिचातारे जमिन पर हा घोळ चालू आहे.. हे माझ्या लक्षात आले.. त्या नुसार  उपक्रम घेण्यास सुरुवात केली. बिट स्तरीय शिक्षण परीषद मधे माझे सादरीकरीण झाले आणि गट शिक्षणाधिकारी तृप्ती मॅडम यांना सांगून टाकले सुहानी नक्की लिहीनार.! माझे प्रयत्न चालूच होते..
सुहानी तिच्या मनाने शब्द वाक्य लिहीत असे आम्ही ते योग्य कसे  लिहायचे सांगत असे. माझ्या बरोबर वर्गातील मुल देखिल सुलभकाची भुमिका घेत असे.. कोणी तीला हसले, तुला येत नाही जरी म्हटले तरी सुहानी काहीतरी लिहीतच राहत असे ..
एक दिवस वर्गात तपासनी चालू होती. वर्गात वाचन घेण्यात येत होते जे चांगले वाचनारे मुले गडबडले. सुहानी ने माञ पुस्तक हातात, सुरु केले प्रकटवाचन ! आम्हाला माहीत होत जोड शब्द येत नव्हते तिला ! तरी पण कस वाचले तिने. आश्चर्यवाटले खरे ! ती खरी कान सेन होती स्मरणशक्ती भारीच तिची !
पुस्तकालील अमूक शब्द दाखव म्हटले की जमत नसे, माञ धडा माञ पाठ अशी सुहानी..

सहावीत माञ खूप बदल झाला. ती  छान लिहीत आहे .तिने मला पञ पण खूप सुंदर लिहीले आहे .

क) संस्कार…

संस्कार किशोर पोटभरे
संस्कार इयत्ता ६ वीत शिकतो. अतिशय चंचल, सडपातळ बांधा, आपल्याच मस्तीत जगणारा.. प्रथम शाळा त्याला आवडतच नसे. शाळा म्हणजे जणू तुरुंगच त्याला वाटत असे, वर्गात कधी आलाच तर सारखी बडबड नाही तर भांडण हे ठरलेले असत. त्याच्या कडून काय लिहून घ्यायचे म्हटल म्हणजे माझे कसबच असे. संस्काराला समजून घेतल्यामुळे संस्कार शाळेत रमत आहे.

वर्गातील एक प्रसंग मी पत्र लेखन शिकवत होते. सर्व लेकर लिहित होते. पण संस्कार काही पत्र लिहित नव्हता. मी त्याला पत्र लेखनाचा विषय दिला तरी पण तो काही लिहिण्यास तयार नसे. वर्गात मस्त मोठ मोठ्या आवाजात गप्पा ! मी शेवटी त्रागातच त्याला म्हणाले ,”संस्कार तू पत्र का लिहित नाहीस? त्यावर उत्तर अदिशय धिरगंभीर मधे ,”टिचर माझे मोठ मोठे विचार छोट्या पत्रात बसत नाही!
मी मात्र आ ….करुन आवाक झाले त्याची समयसुचकता हुशारी पाहून आनंद पण झाला. तेव्हा मी म्हणाले तुला काय करु वाटतय मग त्यावर तो म्हणाला,जरा बाहेर फिरुन येतो.त् यावर मी त्याला परवानगी दिली पण शेवटी पत्र लेखन लिहूनच घेतले. सुंदर पत्र लिहले त्याने. पण हे पत्र पूर्ण लिहायला एक आठवडा लागला आम्हाला.

संस्कार खूप छान लिहित आहे आता. त्याला शाळा हवी हवी वाटत आहे. सुट्टीत देखील शाळेला भेट देऊन आपले मनोगत लिहित आहे, रोजनिशी लिहित आहे आणि कविता पण.. या कोरोनाच्या संकटसमयी सर्व घरात आसताना संस्कार ने मोठ्यांना विचारात पाढणारी कविता लिहली आहे .

कविता..!

अन् मंदिर बंद झाले,
संकटाला घाबरून देव मंदिरात गेले,
घरदार सोडून पोलीस आपल्या
सुरक्षेसाठी आले,
मंदिरासाठी लय पैसे खर्च केले,
दवाखाने नसल्याने लोक मरायले,
देव म्हणून दगडाला पूजायले,
देवभक्त म्हणून पैसे उडवायले,
संकट आलय म्हणून देवाला
बोलवाय गेलो,
तर सर्वात आधी मंदिर बंद झाले.

भित्ती पत्रक :

भाषा विकास साधत असताना, भाषा शिकण्याचा नैसर्गिक क्रम महत्त्वाचा आहे. भाषेचे विविध क्षेत्र श्रवण, भाषण संभाषण, वाचन, लेखन, स्वअभिव्यक्ती या अनुशंगाने भाषा दालनात इयत्ता ५ वी ते ७ वी या वर्गासाठी लेखन यावर उपक्रम घेण्यात आला. भित्ती पत्रक मुलांनी मुलांसाठी लिहलेल साहित्य लेखन वाचन या साठी हा उपक्रम घेण्यात आला.
भाषा विकास मधील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखन होय. लिहिणे म्हणजे एक प्रकारचे बोलणेच. आपण जेव्हा लिहितो आपल्या समोर प्रत्यक्ष नसलेल्या अशा कोणाशीतरी आपण संवाद साधत असतो. काहितरी जपून ठेवण्यासाठी आपण ते लिहितो. लिहिणे म्हणजे स्वतः शीच केलेले बोलणे आणि नेमक शाळेत आलेल लेकरु त्यांच्या बोलीभाषेत बोलत.. शाळेत लिहायच म्हटल की प्रमाण भाषेत म्हणजे सत्येच्या भाषेत मग तिथ शुद्ध अशुद् हा प्रकार त्यामुळे लेखन गती कमी होऊन लेखणातील आनंद निघून जातो.

लहान मुलांना लिहायला शिकवताना बोलण्याच एक रुप म्हणूनच आपण शिकवायला हवे. लिहिणे ही कोणालातरी उद्देशून केलेली कृती आहे ही दृष्टी मुलांना निश्चित मिळेल हे पाहिले पाहिजे शिक्षकाचे कर्तव्य आहे. मुलांना लिहिणे यांत्रिक पद्धतीने असल्यासारखे शिकवायला नको .श्रुत लेखणात यांत्रिकपणा येतो आणि भाषा विकासात अनुलेखन आणि श्रुतलेखन मुळे तितकेसे उपयोगी पडेलच असे नाही मुल मात्र कंटाळा करतात. वर्गात स्पर्धा सुरु होते “माझच बरोबर तुझ बघ किती चूक ” अस वर्गात सुरु होतो आणि भाषा विकास साधता येत नाही. मुलांना वेगवेगळे विषय देयला हवे. आई , बाबा त्या परीसरातील मग मुल भन्नाट लिहितात आणि त्या लिहिण्यात सृजकता असते खरी ! प्रत्येक मुल वेगळा विचार करुन लिहित खर.

यांत्रिक पणा मुळे लिहिणे ते काहितरी व्यक्त करण्यासाठी ही जाणीव मुलांमधे निर्माणच होत नाही . शिक्षकाच्या सांगण्यावरुन पुन्हा पुन्हा करण्याची कृती म्हणजे लिहिणे अशीच मुलाची लिहिण्याविषयाची भावना होते.

भित्ती पत्रके .. मुलांना वेगवेगळे विषय देऊन.. त्याचे लेखन आणि मग भित्ती पत्रक तयार करण्यात आली.

✓ उद्दिष्टे..

• ऐकलेल्या वाचलेल्या अनुभवलेल्या गोष्टी चे लेखन करता येणे
• दिलेल्या शब्दावर अनुभव लेखन करता येणे
• दिलेल्या विषयावर सर्व प्रकारचे लेखन करता येणे, कथा, कविता बातमी, अहवाल लेखन पत्र लेखन इत्यादी.
• विविध साहित्य प्रकाराचे वाचन आणि समिक्षा करता येणे.

अध्यापन निष्पत्ती..

• विविध विषयासांठी विविध उद्देशासाठी लेखन करताना विरामचिन्हाचा योग्य वापर करतात.
• आपल्या बोली भाषेचा योग्य वापर करून भाषा अभिरुची निर्माण करतात.
• स्वतः चे अनुभव स्वतः च्या भाषेत लिहितात.
• वाचनाचा आनंद घेतात.
• नव्या शब्दांविषयी जिज्ञासा व्यक्त करतात. अर्थ समजून घेऊन लेखनात वापर करतात.

कृती

भित्ती पत्रक हा उपक्रम घेत असतात महिन्यासाठी एक विषय दिला जातो. उदा उन्हाळा, पाऊस, शाळा, बाजार वृक्ष, लग्न असे विविध विषय दिले जातात एका महिन्या साठी एक विषय त्यावरच मुलांनी लिहायच आणि प्रत्येक मुलाच लेखन भित्ती पत्रकावर लावायचे नंतर मुले ते वाचतात आणि चर्चा करतात. पाऊस विषयावर लेखन करताना, रानातला पाऊस , शाळेतील पाऊस घरातील पाऊस असे अनुभव लेखन करतात कथा कविता बातमी तयार करतात, सुंदर कविता करतात चित्र आणि कथा देखिल लिहितात. असे महिना भराचे विविध लेखन करतात आणि वाचतात देखिल.
बरसात, बाल्या पैसे खेळतो, मॕडमच लग्न खूप सुंदर कथा मुलांनी लिहिल्या आहेत आणि त्या प्रकाशित पण झाल्या आहेत.. मुल वाचनाचा लेखनाचा आनंद घेतात आणि महिन्याभरातील लेखन नंतर फाईल मधे संग्रहीत देखिल करतात. पुन्हा नवीन शब्द नवीन लेखक वर्ष भर आमच चक्र चालू असते. मुलांना मी शाळा विषय दिला त्या शाळेतील विविध गंमती जंमती शाळेच्या समस्या तसेच शाळेतील मित्र यावर मुलांनी कथा लेखन केले. आमच्या शाळेत बालाजी हा मुलगा शाळेत नेहमी येत नसे. वर्गात नेहमी त्याची चर्चा होत असे. मुल त्याच्याविषयी बोलत, शाळेच्या वेळात तो काय करतो काय नाही. एक दिवस सुमितने त्यांच्यावर कथा लिहून टाकली मला खूपच भावली बालाजी ने ती कथा वाचली आणि त्याच्यावर परिणाम झाला आणि तो शाळेत येऊ लागला,अशा प्रकारे मुल विविध प्रकारचे वाचन लेखनाचा आनंद घेतात. एक पाऊल भाषा समृद्धीच्या दिशेने. मुलांच्या अभिव्यक्तीला संधी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकरी मंडळी च्या मदतीने शाळास्तरीय बालसाहित्य संमेलन दर वर्षी आयोजित केले जात आहे .

शाळास्तरीय बालसाहित्य संमेलन..

पहिले शाळा स्तरीय बाल साहित्य संमेलन जिल्हा परिषद प्रा.शा .बोरगाव काळे ता. जि,लातूर अगदी थाटामाटात संपन्न झाले..

दि.३ जानेवारी २०१९ वार गुरुवार, बालिका दिनानिमित्त जि. प. बोरगाव शाळेत पहिले शाळास्तरीय बाल साहित्य संमेलन घेण्यात आले. या संमेलनचे वैशिष्ट्ये विद्यार्थीनीआपल्या स्वरचित कथा कविता सादर केल्या. प्रथम सकाळी ८.३० वाजता ग्रंथ दिंडी निघाली. मुलांनी स्वतः कल्पना वापरुन पालखी बनवली होती अगदी थाटामाटात संमेलन दिंडी निघाली यात राजमाता जिजाऊ आणि सावित्री माई यांची वेशभुषा परिदान करुन आलेले चिमुकल्या मुळे दिंडीचे अनोखे दृश्य दिसत होते.

या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष म्हणून लाभलेल्या मा वृशाली पाटील ताई लातूर ज्येष्ठ लेखिका व कथाकथन सत्राचे अध्यक्ष म्हणून लाभलेले अनंत कदम सर सह शिक्षक जि.प रुई ता. अहमदपूर (वाचन संवाद मुख्य संयोजक उदगिर) तसेच या बाल साहित्य संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा रत्नराज जवळगेकर साहेब तसेच मुरुड केंद्राच्या केंद्र प्रमुख लता पांचाळ, गावचे सरपंच कुंडलीक आदमाने, उप सरपंच डॉ कौलास काळे , शा.व्य.स.अध्यक्ष व सदस्य मिलींद सोनवणे , दिपक काळे तसेच प्रशांत देशमुख , बंडू घोडके, राजाभाऊ काळे उपस्थिती होते .

अवलिया शिक्षकाचा परिचय..!

अनिता महादेव जावळे -वाघमारे
जि. प. प्रा. शा. बोरगाव काळे ता. जि. लातूर
• Email anitajawale1977@gmail.com
• Blog
anitajavle.blogspot.in
• You Tube माझी शाळा
• मो.नं 9545050292

प्रकाशित पुस्तके

• लगलखणारी शाळा
• गोट्या
• फुलचुकी आणि इतर गोष्टी
• पहिले मराठवाडा बहुजन महिला साहित्य संमेलन स्मरणिका
• आम्ही झालो कवी

ताईंना मिळालेले पुरस्कार

• पं.स लातूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार २०१७
• “आस ” नांदेड राज्यस्तरीय उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार २०१८
• पोलिस मित्र पुरस्कार २०१९रमाई
• पुरस्कार २०१९

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा: पुष्प ५ वे – बोलक्या बाहुल्यांचा मदतीने शिक्षणाचे कार्य अधिक मनोरंजक करणाऱ्या, त्याचबरोबर समाजात आनंदाचा प्रकाश पेरणाऱ्या व प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेल्या शिक्षिका श्रीमती दीपाली बाभूळकर..

Leave a Reply

Your email address will not be published.