शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा: पुष्प ५ वे – बोलक्या बाहुल्यांचा मदतीने शिक्षणाचे कार्य अधिक मनोरंजक करणाऱ्या, त्याचबरोबर समाजात आनंदाचा प्रकाश पेरणाऱ्या व प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेल्या शिक्षिका श्रीमती दीपाली बाभूळकर..

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या प्राथमिक शाळा पाहता, यात तिथे काम करणाऱ्या शिक्षकांचा वाटा सर्वाधिक मोठा किंबहुना त्यांच्यामुळेच ते शक्य झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ५ स्पटेंबर शिक्षक दिन या दिवशी शिक्षकांबद्दल उपकृत होण्याचा प्रयत्न समाज करत असतो. परंतु त्याहून अफाट काम करणाऱ्या या शिक्षक रत्नांची त्यांच्या आभाळाएवढ्या कामाची अल्प माहिती सर्वांसमोर यावी त्या दृष्टीने दैनिक लोकशक्ती ४ सप्टेंबर पासून १५ सप्टेंबर पर्यंत ‘ शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा ही लेखमाला सुरू करत आहोत.

यातून असामान्य काम करणाऱ्या प्रेरणादायी अवलियांची गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडत आहोत.

नक्की वाचत रहा..!

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा

पुष्प ५ वे : बोलक्या बाहुल्यांचा मदतीने शिक्षणाचे कार्य अधिक मनोरंजक करणाऱ्या त्याचबरोबर समाजात आनंदाचा प्रकाश पेरणाऱ्या व प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेल्या शिक्षिका श्रीमती दीपाली बाभूळकर

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
बोलक्या बाहुल्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे मनोरंजन करणाऱ्या दीपाली बाभूळकर ह्या समाज प्रबोधनाचे काम मनोरंजनातून करत असतात. आजवर कित्येक नाविन्यपूर्ण उपक्रमांतून मुलांचे शिक्षण सहज, सुलभ बनवले आहे नुकताच त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम चालू केला आहे, चला तर मग जाणून घेऊया दीपाली बाभूळकर यांचे अनोखे शिक्षणाचे बोलके प्रयोग.

✓ ‌ऑनलाइन शिक्षण दिव्यांगासाठी : 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्य़ातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लास सुरू करण्यात आले आहेत. यात आतापर्यंत पंधरा सत्र संपन्न झाले. एक दिवस गणित विषयक मुलभूत संबोध सुनिता लहाने व एक दिवस भाषा विषयक मुलभूत संबोध विकासाकरिता दीपाली दिलीप बाभुळकर यांनी काम सुरू केले आहे. सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थी मित्रांकरीता हा वर्ग आहे. उदा. मला लाल रंगाची ओळख करून द्यायची होती तर मी स्वतः लाल रंगाचे कपडे घालून, घरातील सर्व लाल रंगाच्या वस्तू गोळा करून मुलांना दाखवते. तुषार दृष्टीबाधित आहे तर त्याला त्याच्या बहीणीला वस्तू हाताने स्पर्श करून दाखवायला व रंग सांगायला सांगते. दुसर्‍या दिवशीचा रंग आजच सांगितल्या जातो. त्यामुळे पालक सुद्धा मुलांना तशी तयारी करून देतात.घरातील उपलब्ध वस्तू गोळा करतात. दररोज छोटासा घरचा अभ्यास दिला जातो. उदा. पिवळा रंग ओळख घेतली त्या दिवशी मुलांना आई पोळी करताना एक छोटा गोळा हळदीने पिवळ्या रंगात रंगवायला सांगितले. मुलांना आॅनलाईन बक्षीस म्हणून मी सुद्धा पिवळा गुलाब त्यांच्या नावासह शाब्बास लिहून पाठवले. यामुळे विद्यार्थी आनंददायी पद्धतीने भाषिक संबोध समजून घेत आहेत. याशिवाय बाहुलीनाट्याच्या मदतीने मुलांना वैयक्तिक स्वच्छतेबद्दल माहिती दिली जाते. छोटी छोटी बालगीते, जीवनकौशल्य या बद्दल माहिती दिली जाते. याशिवाय प्रत्येक दिवशी मी पालकांच्या सोबत बोलून संबोध दृढीकरण करण्यासाठी कोणता संवाद मुलांबरोबर साधावा, कोणता सराव द्यावे याबद्दल माहिती देते.

या दिव्यांग विद्यार्थी मित्रांकरीता भाषिक संबोध विकासाकरिता काम करताना मला स्वतःला खूप आत्मिक समाधान मिळत आहे. या बालकांच्या चेहऱ्यावर हास्य, आनंद ते व पालक देत असलेला सकारात्मक प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो. दररोज सुमारे ३५ विद्यार्थी, पालक, विशेष शिक्षक व जिल्हा समन्वयक वैशाली शिरभाते, विभाग प्रमुख मा. डाॅ. राम सोनारे या वर्गाला उपस्थित असतात. मा. प्रशांत डवरे सर, प्राचार्य, सर्व अधिव्याख्याता व विषय सहायक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांचे सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.

ताईंनी आजवर राबवलेल्या नवनवीन उपक्रमांची माहिती थोडक्यात पाहू..
धुळपाटी :
दररोज मुलं शाळेत आल्यानंतर परिपाठापुर्वी व नंतरचा काही वेळ किंवा गरजेच्या वेळी मुलांना सुचवलेल्या अक्षरांपासून शब्द लेखनाची संधी देणे.
उद्दीष्ट्य :
•अप्रगत मुलांना अभ्यासाची खेळाच्या माध्यमातुन गोडी लागावी.
•अधिकाधिक निरीक्षण क्षमता वाढीस लागावी.
•शब्दांच्या लेखनाची गती व वळण लक्षात यावे.
•बिनखर्चिक व सहज उपलब्ध

विविध व्यावसायिकांना भेटी-परिसरामध्ये उपलब्ध व्यवसाय व त्यांची कार्य पद्धती समजून देणे :
उद्दीष्ट्य :
•व्यवसायात विविध विषयांची गरज समजावुन देणे.उदा.गणित व शेती, सुतारकाम व कार्यानुभव इ.
•मेहनतीला पर्याय नाही हे स्पष्ट करणे
•कार्यकौशल्याचा विकास करणे.
•श्रमप्रतिष्ठेची जाण निर्माण करणे.

वर्णाक्षरानुसार हजेरी : वर्गाची हजेरी घेतांना फक्त यस मँडम म्हणण्यापेक्षा मुले प्रत्येक दिवशी इंग्रजी वर्णाक्षरानुसार शब्द उच्चारून हजेरी देणे.
उद्दीष्ट्य :
•शब्दसंग्रह वाढीस लागणे.
•मुलांमध्ये चुरस निर्माण करणे.
•निरिक्षण क्षमता व डीक्शनरी स्कील वाढविणे.

दिनविशेष साजरे करतांना विशेष उपक्रमांचे आयोजन :
जयंती वा पुण्यतिथी अथवा विविध कार्यक्रमाचे वेळी नाट्यछटा, पोवाडे , भजन इत्यादीसह इंटरनेटद्वारा प्राप्त माहीती, व्हिडिओ दाखविणे.
उद्दीष्ट्य :
•दिनविशेषाचे महत्त्व अधोरेखित करणे.
•शोधकवृत्ती वाढीस लावणे.
•कलात्मकता वाढीस लावणे.
•योग्यवेळी योग्य माहीतीचे उपयोजन करणे.

उत्पादक उपक्रम राबविणे : मुले विविध सण उत्सवाचे निमित्ताने विविध वस्तू निर्माण करून विक्री करतात.
उद्दीष्ट्य :
•कलात्मकता वाढीस लावणे.
•श्रमप्रतिष्ठेची सवय लावणे.
•सौंदर्यभावना वाढविणे.

पक्षीनिरीक्षण : विविध पक्ष्यांची ओळख व जीवनक्रम मुलांना माहीत करून देणे.
उद्दीष्ट्ये :
•पक्ष्यांची माहीती मिळवून देणे.
•पक्ष्यांच्या जीवनक्रमाविषयी माहीती देणे.
•संकटग्रस्त व अडचणीत असणाऱ्या पक्ष्यांविषयी माहीती देणे.
•वन्यजीव व संरक्षण संस्थेकडुन वेळोवेळी मदत मिळवून माहीती देणे.
•पक्ष्यांसाठी पाणपोई व अन्नधान्याची सोय करणे.
•विविध सामाजिक संस्थांच्या वतीने तज्ञांच्या मार्गदर्शनाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.

लेखकांशी संवाद : मुलांचे प्रत्यक्ष लेखकांशी बोलणे करून देणे.
उद्दीष्ट्य :
प्रश्न कौशल्य विकसित करणे.
लेखन व वाचन वाढविण्यास प्रोत्साहन देणे .

पत्रलेखन : मान्यवर लेखक व प्रसिद्ध व्यक्ति,नातेवाईकांस पत्र लेखन करणे.
उद्दीष्ट्य :
पत्रलेखनाचा सराव करुन घेणे.
भाषिक कौशल्याचा विकास करणे.
मान्यवरांच्या पत्रांची ओळख देणे.

मनोरंजक गाणे व खेळ : मनोरंजक खेळ व गीतातून आनंद दायी शिक्षण
उद्दीष्ट्य :
खेळातुन विविध विषयांची उजळणी.
आनंदनिर्मिती करणे.

बाहुलीनाट्य : बाहुलीचे माध्यमातुन आनंदनिर्मिती सह विविध विषयाची माहीती देणे.
उद्दीष्ट्य :
मनोरंजनातून विषय मांडणी ऊदा.स्री पुरुष समानता,स्वच्छता विषयक जाणिव,आनंददायी शिक्षण.ईत्यादी.
कला संवर्धन करणे
भारताचा कलाविषयक इतिहास समजून घेणे

वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे.
•विविध सामाजिक विषय हाताळणे
•अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवणे
•विज्ञान दिनी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः उपलब्ध साधनांचा उपयोग करून प्रयोग दिग्दर्शन करणे.

गाव, परिसरातील कलाकार, स्थानिक व्यावसायिक यांचे मार्गदर्शन
• श्रमप्रतिष्ठा कळण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव
• कलेची जपणूक, संवर्धन करणे.

पर्यावरण संवर्धन करणे
उद्दीष्ट्य :
•निर्माल्य संकलन उपक्रम राबवणे
•वृक्षमैत्री करणे
•झाडांची स्वाक्षरी गोळा करणे.

एक पाऊल वाचन समृद्धीकडे
•वाढदिवसाच्या दिवशी पुस्तक भेट देणे
•पुस्तक भिशी
•आजोबांना पुस्तक वाचून दाखवण्याचा उपक्रम

गाथा बलिदानाची
•स्वातंत्र्य चळवळीत लढलेल्या वीरांची माहिती देणे.
•आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी तिव्रता निर्माण करणे.
•गावातील स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मिळवणे

गाथा विज्ञानाची
•देशविदेशातील वैज्ञानिकांनी लावलेले शोध समजून घेणे
•जिद्द, चिकाटी व मेहनतीचे महत्त्व समजून घेणे.
•स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनांचा वापर करून प्रयोग करून बघणे.

आमची भटकंती
•गावातील महत्त्वाची स्थळे, त्याचे ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व समजून घेणे.
•परिसरातील संसाधनांचा परिचय करून देणे
•आपल्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करणे.
•गावातील सामाजिक उपक्रमात सहभागी होणे.

आमचा नकाशा
•नकाशा तयार करणे.
•सूची बनवता येणे
•उपलब्ध साधनांचा उपयोग करून उठावदार नकाशा तयार करणे.

बोलक्या भिंती
•शाळा व गावातील भिंतीवर अभ्यासातील महत्त्वाच्या बाबी लिहणे.
•विविध सामाजिक विषय हाताळणे
•राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग

ऐकून वाचण्याचा प्रयोग :
एक पाऊल वाचन समृद्धीकडे अंतर्गत मुलांना ऐकण्यासाठी गोष्टी ची मालिका मी सुरू केली आहे. माझ्या स्वतःच्या गोष्टींसह ख्यातनाम बालसाहित्यिक माधुरीताई पुरंदरे, राजीव तांबे, फारुख काझी, स्वाती राजे यांच्यासह अनेक बालसाहित्यिकांच्या गोष्टी स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून विविध सामाजिक माध्यम उदा. फेसबुक, व्हाट्सअप, Deepali Babhulkar यूट्यूब चॅनल, ब्लॉग या माध्यमातून शिक्षकांपर्यंत व पालकांपर्यंत मुलांकरिता पाठवत आहे . या माध्यमातून घरी बसल्या बसल्या विद्यार्थ्यांच्या भाषासमृद्धी करिता मदत होत आहे. पण माझ्या लक्षात आले की ज्या मुलांच्या पालकांजवळ अँड्रॉइड मोबाईल नाहीत अशा पालकांसाठी आपण काय करायचे? त्यावेळी माझ्या मदतीला धावून आला कैवल्य फाऊंडेशनचा वर्चुअल फिल्ड सपोर्ट टोल फ्री नंबर 1800-572-8585 कैवल्य फाउंडेशन सोबत मी बोलणे केले. त्यांना विनंती केली की आपल्या टोल फ्री नंबर वरून माझ्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवाव्यात आणि त्यांनी या गोष्टीला उत्तम प्रतिसाद देत सहा एप्रिल पासून माझ्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या मराठी गोष्टी मुलांना पोचवायला सुरुवात केली आणि बघता बघता विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळायला लागला. एकाच दिवशी तर १०६९ विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली.. आतापर्यंत ७०००० मुलांपर्यंत माझ्या गोष्टी पोहचल्या यात १४५०० मुलांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मोफत गोष्ट ऐकली आहे.

दररोज मोफत गोष्ट उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थी कॉल करून ही गोष्ट सहज ऐकू शकतात. एक पाऊल वाचन समृद्धीकडे या उपक्रमाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर मध्यप्रदेश, गुजरात, अंदमान आणि निकोबार व छत्तीसगड प्रतिसाद मिळत आहे. कैवल्य फाउंडेशन गोष्ट ऐकणाऱ्या पालकांना, प्रत्यक्ष मुलांना फोन करून गोष्ट कशी वाटली हे विचारतात त्यामुळे त्यांचे प्रतिसाद माझी हिंमत वाढवतात मला पण वैयक्तिक फोन, मेसेजेस करून पालक कौतुक करतात. नियमितपणे आपली मेहनत सफल होते आहे. फक्त लाॅकडाऊन काळातच नाही तर वर्षभर आपण असाच प्रतिसाद माझ्या उपक्रमाला मिळेल हा विश्वास आहे.

परिचय
दीपाली दिलीप बाभुळकर, अमरावती
deepalibabhulkar@gmail.com

● दीपाली ताईंचे उल्लेखनीय कार्य :
आज पर्यंत शिक्षिका म्हणून राज्यभर उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल जिल्हा परिषद अमरावती ने विशेष गौरव केला आहे.
● सातत्याने विज्ञान प्रदर्शनात लोकसंख्या शिक्षणात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक राज्यस्तरीय प्रदर्शन सहभाग.
● नवनवीन कल्पना, विचार, प्रयोगाद्वारे विद्यार्थी जिल्हास्तरीय विविध सादरीकरणात सहभागी.
●जिल्हा स्तरावर नवोपक्रम स्पर्धेत प्रथम पुरस्कार
●तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांकरीताचा सातत्याने पुरस्कार
●प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार
●भारतातील पहिल्या शारिरीक शिक्षण विषयक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे झालेल्या ग्लोबल काॅन्फरन्स मध्ये 28 देशांच्या प्रतिनिधी समोर आरोग्य शिक्षण बाबत सादरीकरण
● शिक्षण वारी उपक्रमातून सुमारे पन्नास हजार शिक्षकांना बाहुली नाट्य प्रशिक्षण
● मुलभूत भाषा विकास, समजपुर्वक वाचन कार्यक्रम, स्तराधारित अध्ययन कार्यक्रम यात घटकसंच निर्मिती, राज्यस्तरीय सुलभक म्हणून कार्य
● वृत्तपत्र, शैक्षणिक मासिकातून सातत्याने शैक्षणिक सामाजिक लेख प्रकाशित
● मासिक पाळी व्यवस्थापन राज्यस्तरीय प्रशिक्षक
● स्री पुरुष समानता, पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती, वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता शिक्षणाचे महत्त्व बाहुली नाट्य च्या माध्यमातून बालकांना मनोरंजनातून प्रात्यक्षिकासह माहिती दिल्या जाते.
● आजपर्यंत तिनशेपेक्षा जास्त शाळांमधून लाखो बालकांपर्यंत व शिक्षण वारी उपक्रमातून हजारो शिक्षकांपर्यंत बालकांची सुरक्षितता हा विषय मी बाहुलीनाट्याच्या मदतीने पोहोचवला आहे कलेचा एकात्मिक पद्धतीने वापर हा देखील यातून साध्य होतो.
● शिक्षकांपर्यंत मुलभूत भाषा विकास साहित्य पोहचवले.
● पश्चिम क्षेत्रातील सहा राज्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केंद्रीय शालेय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सह सहा राज्यातील शिक्षण सचिव यांचे उपस्थितीत सादरीकरण
● विदर्भातील एकमेव महिला बाहुली नाट्य कलाकार.
● राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पुरस्काराचे मानकरी.
● सर फाउंडेशन चा ‘ इनोव्हेटिव्ह टिचर अवॉर्ड’.
● राज्यस्तरीय बाहुली नाट्य संमेलनात सहभागी.
● महानगरपालिका अमरावती द्वारा ८ मार्च ला शहरातील कर्तृत्ववान स्त्री शक्ती पुरस्कार.
● अनेक शासकीय खाजगी कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन.
● जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालयांमार्फत मतदार जनजागृती करण्यासाठी बोलक्या बाहुल्यांच्या मदतीने प्रथमच पुढाकार.
● अविष्कार फाऊंडेशन चा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार.
● अद्वैत संस्था द्वारा उत्कृष्ट नाट्यकर्मी पुरस्कार.
● राज्यस्तरीय कामगार कल्याण नाट्य स्पर्धा अंतर्गत उत्कृष्ट स्री पात्र भुमिका अभिनय पुरस्कार.
● कोरोना गुरुवंदना पुरस्कार दिव्य मराठी.
● शिक्षण ध्येय साप्ताहिक अंतर्गत नवोपक्रम स्पर्धेत शिक्षण क्षेत्रातील अधिकारी /कर्मचारी गटात प्रथम क्रमांक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *