शेतकरी आंदोलकांवर लाठीचार्ज, ‘ मोदी है तो मुमकिन है..!’

| नवी दिल्ली | पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव ३५ शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळला. त्यामुळे केंद्र सरकारने मंगळवारी विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असून, त्यांचे आंदोलनही सलग सातव्या दिवशी कायम आहे. या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन आता शेतकऱ्यांना ऑनलाइन माध्यमातूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. विरोधी पक्षांपासून ते अनेक नामवंत व्यक्तींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही ट्विटवरुन या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर टीका केली आहे. एकीकडे बड्या उद्योजकांना फायदा पोहचवला जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यावर लाठीचार्ज केला जात आहे अशी टीका भूषण यांनी ट्विटवरुन केली आहे.

प्रशांत भूषण यांनी ट्विटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी, ‘मोदी है तो मुमकीन है’ अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोमध्ये मोदी अंबानी, अदानींसारख्या मोठ्या उद्योजकांसोबत दिसत आहे. अंबानींसमोरच्या फोटोवर टेलिकॉम, रिटेल, संरक्षण आणि शेतीसंबंधितील उद्योग अंबानींना देण्यात आल्याचे म्हटले आहे. तर विमानतळं, रेल्वे, सौरऊर्जा आणि शेतीसंदर्भातील उद्योग अदानींकडे असल्याचं म्हटलं आहे. एकीकडे उद्योजकांकडे प्रमुख उद्योग असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नशिबी वॉटर कॅनन, लाठीचार्ज आणि तुरुंगवास आहे, असं फोटोच्या शेवटच्या भागात नमूद करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवताना डोळ्यावर जखम झालेल्या वयोवृद्ध शीख शेतकऱ्याचा फोटो वापरण्यात आला आहे.

भूषण यांनी अशाप्रकारे शेतकरी आंदोलनावरुन मोदींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी वाराणसीमध्ये देव दिवाळीचा उत्सवासंदर्भातील मोदींच्या व्हिडीओवर प्रितिक्रिया देताना पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. ‘तक् धिना धिन्! बाय बाय लाइट्स! भारत (देश) जळत असताना मोदींनी गाण्यावर ठेका धरलाय,’ अशी कॅप्शन भूषण यांनी या ट्विटला दिली आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान नदीच्या किनाऱ्यावर उभे असून समोर मंदिरांना केलेली रोषणाई दिसून येत आहे. भगवान शंकराचे कौतुक करणारं गाणं मोठ्या आवाजात वाजत असल्याचे ऐकू येत असून मोदींनी या गाण्याच्या चालीवर ठेका धरल्याचे दिसून येत आहे.

प्रशांत भूषण यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाच्या दिलेल्या पाठिंब्याचंही समर्थन केलं आहे. जगातील प्रत्येक देशाने लोकशाही मुल्यांसाठी आवाज उठवायला हवा. जर कोणाला हा एखाद्या देशाचा अंतर्गत प्रश्न वाटत असेल तर त्यांचा तो समज चुकीचा आहे, असंही भूषण यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले कॅनडाचे पंतप्रधान?

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या मंत्रीमंडळामधील शीख नेत्यांशी संवाद साधताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुढे बोलताना त्यांनी भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. “भारतामधील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख न करणं चुकीचं ठरेल. भारतामध्ये सध्या सुरु असलेल्या या आंदोलनाची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. तिथे असणाऱ्या शीख समुदायातील व्यक्तींच्या नातेवाईकांबद्दल कॅनडात राहणाऱ्या अनेकांना चिंता वाटत असेल आणि ते सहाजिक आहे. मात्र मी तुम्हाला आठवण करुन देऊ इच्छितो की, अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याच्या हक्काचे आम्ही पाठीराखे आहोत. संवादातून प्रश्न सुटू शकतो यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून या विषयाबद्दलची आमची चिंता आम्ही भारतीय अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी व्यक्त केली आहे. करोना आणि सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे,” असं त्रुडो यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *