शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक होण्याची शक्यता..

| नवी दिल्ली | महाराष्ट्रातून नाशिकहून अखिल भारतीय किसान सभेचे २५०० शेतकरी दोन दिवसांत दिल्लीत दाखल होणार आहेत. वादग्रस्त शेती कायद्यांवर चर्चा करण्यासाठी पाठवलेले नवे निमंत्रण शेतकरी संघटनांनी अजून स्वीकारलेले नसले तरी पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या या प्रस्तावावर शेतकरी नेत्यांच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सोमवारी साखळी उपोषणात सहभागी होण्याला अधिक प्राधान्य दिले.

केंद्र सरकारने आत्तापर्यंत शेतकरी नेत्यांशी विज्ञान भवनात घेतलेल्या तीन बैठका अपयशी ठरल्यानंतर, रविवारी रात्री उशिरा कृषी मंत्रालयाकडून ४० शेतकरी नेत्यांना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रणाचे पत्र पाठवले गेले. शेतकरी संघटनांनी बैठकीची तारीख निश्चित करावी असेही केंद्राकडून कळवण्यात आले. पंजाबमधील शेतकरी नेते तसेच संयुक्त किसान मोर्चा व उत्तर प्रदेशमधील नेत्यांची रविवारी बैठक झाली होती व आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारी शेतकरी संघटनांनी प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पश्चिम बंगालमध्ये पत्रकार परिषदेत, शेतकरी नेत्यांशी कृषिमंत्री दोन दिवसांत पुन्हा चर्चा करतील असे सांगितले होते. केंद्राच्या चर्चेच्या या प्रस्तावावर मात्र लोकांची दिशाभूल करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याची टीका अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने केली. तीनही कायद्यांतील प्रत्येक अनुच्छेदावरील आक्षेप केंद्रापुढे मांडलेले आहेत. त्यातील फक्त आठ आक्षेप केंद्राने स्वीकारले असून आता प्रश्न सोडवण्यास तयार असल्याचा दावा करत असल्याची टीकाही समन्वय समितीने पत्रकाद्वारे केली.

एनडीए’तील पक्षांना आवाहन

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी असलेल्या घटक पक्षांनी शेती कायदे व शेतकरी आंदोलनासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने २६ व २७ रोजी केले जाईल. त्यानुसार, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, तसेच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रातील मंत्री रामदास आठवले यांनीही भूमिका जाहीर करावी, असे आवाहन राष्ट्रीय किसान महासंघाचे समन्वयक संदीप गिड्डे-पाटील यांनी केले.

कृषी विद्यार्थ्यांशी संवाद

नव्या शेती कायद्यांचा शेतकऱ्यांना लाभ होईल असा दावा केंद्राकडून केला जात असून उत्तर प्रदेश तसेच, अन्य राज्यांतील शेतकरी संघटनांनी कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेऊन पाठिंबाही व्यक्त केला होता. सोमवारी तोमर यांनी देशातील कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधून शेती कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. या कायद्यांचा अभ्यास करून लोकांना जागरूक करण्याचे आवाहनही तोमर यांनी केले. या दूरसंचार संवाद कार्यक्रमात १५ हजार विद्यार्थी सहभागी झाल्याचे कृषी मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

तीन शेती कायद्यांच्या लाभाचा दावा करणाऱ्या शेतकरी गटांची आम्ही भेट घेऊन त्यांच्याकडून फायदे समजून घेऊ, अशी प्रतिक्रिया भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी दिली.

साखळी उपोषण सुरू

शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांनी सिंघू, टिकरी, गाझीपूर-गाझीयाबाद, बुराडी मदान तसेच, राजस्थानच्या शाहजहापूर-खेडा सीमेवर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू झाले. तीन कृषी कायदे रद्द होईपर्यंत आंदोलनस्थळांवर दररोज अकरा शेतकरी उपोषण करतील, असे भारतीय किसान युनियनचे नेते राजेश टिकैत यांनी सांगितले. २३ डिसेंबरला शेतकरी दुपारी अन्नत्याग करणार असून त्यात जनसामान्यांनीही सहभागी व्हावे, २७ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या कार्यक्रमावेळी नागरिकांनी टाळ्या व थाळ्या वाजवून निषेध करावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, सिंघू सीमेवर सोमवारी निरंजन सिंग या पंजाबमधून आलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सिंग यांच्यावर रोहतक येथील रुग्णालयात उपचार केले गेले. आत्महत्येच्या प्रयत्नाला प्रवृत्त करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल होतो. माझ्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या कृतीला मोदी व शहा जबाबदार असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी भावनिक प्रतिक्रिया निरंजन सिंग यांनी दिली.

दिल्लीत नवे जथे

हरयाणा व उत्तर प्रदेशातून येणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीकडे येण्यापासून अडवले जात असल्याचा दावा समन्वय समितीने केला. या राज्यांतील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ महामार्ग काही तास बंद केला होता. शेतकऱ्यांच्या ‘चलो दिल्ली’ आंदोलनाचा सोमवारी २६वा दिवस होता. पंजाब, हरयाणा तसेच अन्य राज्यांतून पहिल्या टप्प्यात आलेले शेतकऱ्यांचे काही जथे परत जात असून त्यांच्या जागी नवे जथे येऊ लागले आहेत. महाराष्ट्रातून नाशिकहून अखिल भारतीय किसान सभेचे २५०० शेतकरी दोन दिवसांत दिल्लीत दाखल होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.