शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाला स्थानिक प्रशासनाची केराची टोपली, आता डॉक्टर, पोलीस यांच्या नंतर शिक्षक देखील कोरोनाच्या विळख्यात..!

| नागपूर | राज्यातील जवळपास प्रत्येक ठिकाणी शिक्षकांना माझे कुटुंब, माझी जबाबदारी या कामासाठी जुंपले जात आहे. शासनाच्या या योजनेच्या रूपरेषेत शिक्षकांनाच कुठेही उल्लेख नसताना त्यांना या कामी जुंपले जात आहे. राज्यात कित्येक ठिकाणी तर गेली ६ महिने शिक्षक या कामात अडकून पडले आहेत. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप तर सोडाच परंतु उलट धाक दाखवून त्यांची पिळवणूक चालू आहे. विशेष म्हणजे संघटनांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दोन वेळा शासन निर्णय तर शिक्षण आयुक्त यांनी एकदा शासन निर्णय काढून शिक्षकांना या कोरोना संबंधी कामातून कार्यमुक्त करण्याचे आदेशित केले आहे, परंतु त्याला जवळपास प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने केराची टोपली दाखवली असून हे काम चालूच आहे. एकीकडे ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा तर दुसरीकडे ही हमालीची कामे यामुळे शिक्षक अस्वस्थ आहेत.

कोरोनाचे संकट मागील दोन महिन्यांपासून अधिकच वाढत आहे. या संकटाने एकीकडे डॉक्टर आणि पोलिसांना आपल्या विळख्यात घेतले असताना आता शिक्षकही बळी पडत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत १० शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. मागील काही दिवसांत राज्यात लाखोंनी कोरोना रुग्नांची भर पडली आहे. नागपुरात १५ दिवसांत २७ हजार रुग्णांची भर पडली असताना ८६३ मृत्यू झाले आहेत. यामध्ये शहरातील १४ पोलिसांचा समावेश आहे. कोरोना असताना त्यांना दिवसरात्र कर्तव्यावर राहावे लागते.

याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शाळांच्या शिक्षकांना कोरोना सर्वेक्षणाच्या कामात जुंपविण्यात आले. शिक्षकांनी कोरोना सर्वेक्षणाचे काम केल्यास, शाळेत शिकवायचे कसे, हा प्रश्न उपस्थित करून या कामातून मुक्तता देण्यात यावी अशी मागणी केली.

यातूनच शालेय शिक्षण विभागाने त्यांची कोरोनाच्या कामातून मोकळीक देण्याचा निर्णय घेतला. तसा अधिकृत आदेशही काढला. या आदेशाला धरून प्राथमिक, माध्यमिक आणि उपसंचालक कार्यालयाने पत्र काढले. मात्र, यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदारांकडून शिक्षकांना कोरोना कामातून मुक्तता देण्यात येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शिक्षकांना कोरोनाचे संक्रमण होत असून १० शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तीन शिक्षक शहरातील तर ७ शिक्षक ग्रामीण भागातील आहेत. इतक्या मृत्यूनंतर अद्यापही शिक्षकांकडून कोरोना सर्वेक्षण करण्यात येत आहे, हे विशेष.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *