संपादकीय : हम आझाद है..!?

गुलामांना गुलामीची जाणीव जोपर्यंत होत नाही तो पर्यंत त्याला स्वातंत्र्याचा अर्थ कळत नाही. ज्याला ज्याला स्वातंत्र्याचा अर्थ समजला त्यांनी गुलामगिरीचं जोखड फेकून क्रांतीच्या मशाली पेटवल्या. त्या मशाली होत्या स्वत्वाच्या, समर्पणाच्या, त्यागाच्या आणि राष्ट्रभक्तीच्या. मुळात क्रांती ही ज्वालेसारखी असते. पाहणाऱ्याला तिचं सौन्दर्य आनंद देऊन जातं; पण जिथे ती ज्वाळा पेटलेली असते तिथे राख झालेली असते; राख झालेली असते ती घर-संसाराची.. आयुष्याची… वैयक्तिक जगण्याची…!

गुलामीचं जिणं जगण्यापेक्षा क्रांतीची राख होऊन अमर होणं ज्यांनी स्वीकारलं, त्या क्रांतिकारकामुळेच आपण एका गुलाम मानसिकतेतुन १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालो. तेव्हापासून प्रत्येक १५ ऑगस्टला मोठ्या थाटामाटात आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला गांधींजी बरोबरच भगतसिंगाची आठवण केली जाते. त्याबरोबरच आपण इंग्रजांच्या गुलामीत असताना किती सहन केलं याचे दाखले दिले जातात. प्रत्येकजण स्वतंत्र कसा झाला, इंग्रजांकडून कसं शोषण केलं जायचं, बोलण्यापासून ते जगण्यापर्यंत कसे निर्बन्ध लावल्या जायचे याबद्दलचे भाषण आणि देशभक्तीचे गाणे ऐकून स्वातंत्र्याचे सत्तर वर्ष उत्साहात साजऱ्या करणाऱ्या सर्व भारतीयांना या स्वातंत्रदिनाच्याही शुभेच्छा..!

या एक दिवसापूरते का होतं नाही आपण देशभक्त होऊन जातो. क्रांतीच्या त्यावेळी पेटलेल्या ज्वाळा आणि क्रांतिकारकांच्या आठवणी शब्दातून जगून आपण त्या स्वातंत्र्याचा आनंदही घेतो. आणि आपण गुलाम नसल्याची थाप स्वतःच्या पाठीवर थोपटून घेतो. इंग्रज गेल्यानंतर मागील सत्तर वर्षात स्वातंत्र भारतामध्ये देशाची भरभराट झाली. मोठं मोठी शहरे विकसित झाली. उद्योगधंदे वाढले. आधुनिकता आली. जागतिकीकरणामुळे आपण जगाशी जोडल्या गेलो. शिक्षणासाठी विद्यापीठे निर्माण झाली. आधुनिक आरोग्याच्या सुविधा उभ्या राहिल्या.वाहतूक व दळणवळनाच्या सोयी निर्माण झाल्या. सगळीकडे नवनिर्मितीचे अनेक परिणाम दिसून आले.

इंग्रज गेल्यानंतर भारतीयांचं नवं सरकार आलं. भारतीय लोक भारतीय लोकांसाठी कायदे बनवू लागले. लोकशाही स्थापन झाली. प्रत्येक माणसासाठी समतेचं, न्यायाचं, आणि बंधुतेच राज्य स्थापन होईल अशी स्वतंत्र भारताची राज्यघटना करण्यात आली. संविधान तेच होतं पण हळूहळू राज्यकर्ते बदलत गेले; पण बदलल्या नाहीत इथल्या जगण्यातल्या व्यथा, पोहचला नाही समतेचा अर्थ इथल्या तळागाळातल्या जनसामान्यापर्यंत..! स्वतंत्र झालेल्या नि समतेवर आधारलेल्या याच लोकशाही देशात झालेल्या विकासाच्या झगमगाटात हरवल्या इथल्या स्वातंत्र्याच्या खुणा. ज्यातून झाले अनेक प्रश्न निर्माण..! जे विचारतात इथल्या स्वातंत्र देवतेला की, ‘हे स्वतंत्र देवते… सांग..! स्वातंत्र्याच्या या सत्तर वर्षानंतर गरिबीचा वाढलेला आलेख तुला कधी अस्वस्थ करत नाही का ? उपास पोटानं मरणाऱ्यांची आणि जगणाऱ्यांची वाढलेली संख्या तुला व्यथित करत नाही का ? किमान भौतिक सुविधा नसल्यामुळे भग्न आयुष्य जगणाऱ्या विस्तृत झालेल्या झोपडपट्ट्या तुझ्या डोळ्यासमोर अंधार निर्माण करत नाहीत का..? आत्महत्या करणारे शेतकरी, बेरोजगार तरुण पाहून इथल्या राज्यकर्त्या जमातीच्या शोषणावर शिक्कामोर्तब होतं नाही की..? बेघर असणाऱ्या अनेक भटक्या अज्ञानी जगण्याचं होणारं शोषण पाहून आपल्या देशातला शोषित आजही अत्याचार सहन करत नाही का ? हा प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या स्वतंत्र अस्तित्वाला पडला नाही; की मग अजून स्वतंत्र भारताचं पाहिलेलं स्वप्नातलं स्वातंत्र्य सगळ्यापर्यंत पोहचलंच नाही..?

आज करोडो लोक बेवारसाचं आयुष्य रस्त्यावर आणि फुटपाथवर जगतात. करोडो लहान लेकरं बालमजुरी करतात. करोडो मुलं पहिलीच्या वर्गातलं शिक्षण देखील घेऊ शकले नाहीत. करोडो लोकांना अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या गरजा भागवता येत नाहीत.करोडो मुलं कुपोषणामुळे मरतायेत. लाखो अन्याय व अत्याचाराचे न्यायालयीन खटले आजही प्रलंबित आहेत. लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि करत आहेत. हजारो मुलीवर बलात्कार झाले आणि होत आहेत. अजूनही दररोज वेगवेगळ्या समस्या आणि कारणासाठी देशात लाखोंनी अर्ज आणि निवेदने दिले जातायेत. आजही अनेकांना हक्काचं रेशन मिळत नाही, म्हणून अनेक जण उपाशी जगतायेत. शिक्षणात झालेली विषम परिस्थिती बेरोजगार तरुणांची मोठी फौज बनवत आहे. तर दुसरीकडे राशन दुकानापासून ते रस्ते बांधकामापर्यत; ग्रामपंचायत कार्यालयापासून ते थेट मंत्रालयापर्यंत पैसा आणि भ्रष्टाचाराच्या जोरावर समाजातली विषम परिस्थिती वाढत आहे. त्यामुळे परत एकदा प्रश्न पडतो.. आपण आपलं स्वातंत्र्य पुन्हा गमावत तर नाहीयेत ना ? हा प्रश्न गुलामीची जोखड गळ्यात न टाकणाऱ्या, प्रत्येक स्वतंत्र विचार करणाऱ्या मेंदूमध्ये तयार होत आहे. म्हणून विषमतेच्या या वातावरणात तयार झालेली नकळत येऊ पाहणारी गुलामगिरी लाथाडण्यासाठी पुन्हा एकदा क्रांतीच्या ज्वाळा पेटाव्या लागतील. पण यावेळी शंका एकच आहे. त्या ज्वालेत राख होण्याऐवढं समर्पण आणि सामर्थ्य असणारी क्रांतिकारकांची जमात आज तयार होईल का…? जिला खऱ्या अर्थाने समजला अर्थ… स्वतंत्र असण्याचा…!

सत्याग्रही आणि शहीद क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्यसंगरातून प्रेरणा घेऊन प्रत्येक भारतीयाला न्यायाचं, समतेच आणि खुल्या स्वातंत्र्याचं दान देणाऱ्या अशा आधुनिक क्रांतिकारकांची आज देशाला गरज आहे…! जी सांगेन की, “गुलाम माणसं नसतात तर गुलाम मानसिकता असते.. मग तो माणूस स्वातंत्र्य म्हणवणाऱ्या देशातला असो वा परतंत्र्यातला..!””

अशा अपेक्षित स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या आणि प्रत्येकाला स्वातंत्र्यात जगण्याचा अधिकार देण्यासाठी धडपडणाऱ्या त्या प्रत्येक स्वातंत्र्य वीरांना मनापासून प्रणाम… स्वातंत्र दिन चिरायू होवो…!

– दादासाहेब श्रीकिसन थेटे, जालना 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *