अभिमानास्पद : रिलायन्स ची गगन भरारी; बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट यांनाही टाकले मागे..!

| मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीने एक मोठे यश मिळविले आहे. लॉकडाऊन काळात अब्जावधीची परकीय गुंतवणूक मिळविणाऱ्या रिलायन्सने ‘फ्युचरब्रँड इंडेक्स २०२०’ मध्ये थेट दुसरा क्रमांक पटकाविला आहे. हे यश कंपनीला अशावेळी मिळाले आहे जेव्हा बाजारमुल्य १४ लाख कोटीवर जाऊन पोहोचले आहे. तसेच कंपनी कर्जमुक्तही झाली आहे. तसेच रिलायन्सचा शेअर २२०० रुपयांवर आहे.

हा इंडेक्स जगातील सर्वात मोठे ब्रँडची माहिती देतो. यामुळे रिलायन्स केवळ भारताचाच नाही तर जगातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. रिलायन्सच्या पुढे आयफोन बनविणारी कंपनी ॲपल आहे. रिलायंस इंडस्ट्रीजमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीच्या वेगावरून असे दिसते की, काही महिन्यांतर रिलायन्स ॲपललाही मागे टाकून जगातील पहिला सर्वात मोठा ब्रँड बनणार आहे.

फ्युचरब्रँडने २०२० च्या या यादीमध्ये सर्वात मोठी उडी ही दुसऱ्या नंबरसाठी घेतली गेली आहे. रिलायन्स सर्वबाजुंनी ताकदवर होत चालली आहे. ही भारतातील सर्वाधिक फायद्यात असलेली कंपनी आहे. कंपनी नैतिकतेने काम करते. यामुळे लोकांचा कंपनीवर भावनिक विश्वास वाढत चालला आहे, असे फ्युचरब्रँडने म्हटले आहे.

रिलायन्सच्या या यशाचे श्रेय मुकेश अंबानींना दिले जावे. त्यांनी कंपनीला नवीन ओळख दिली आहे. आज कंपनी ऊर्जा, पेट्रोलिअम, कापड उद्योग, नैसर्गिक संसाधने, रिटेल आणि दूरसंचारसारख्या क्षेत्रात काम करत आहे. गुगल आणि फेसबुकनेही यामध्ये भागीदारी खरेदी केली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

यादीत आणखी कोण कोण
या यादीमध्ये ॲपल आणि रिलायन्सनंतर सॅमसंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या एनवीडिया, मोताई पाचव्या, नाईकी सहाव्या, मायक्रोसॉफ्ट सातव्या, एएसएमएल आठव्या, पेपल नवव्या आणि नेटफ्लिक्स दहाव्या स्थानावर आहे. फ्युचरब्रँड गेल्या सहा वर्षांपासून ही यादी जाहीर करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *