कोरोना विरोधात लढणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ५० लाखाचा विमा प्रस्तावित..!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती..!| पुणे | कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कोरोनाच्या विरोधात कार्यरत असणाऱ्या शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्यांांचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाली आहे, असे सांगतानाच याबाबत योग्य तो निर्णय होईल असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

मार्च महिन्यात अजित पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देणार, अशी घोषणा केली होती. त्यानंतर आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे कोरोना विरोधात लढणाऱ्या इतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील काहीतरी मदतीची घोषणा करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. आज पुण्यातील बैठकीत अजित पवार यांनी पोलिसांप्रमाणेच कोरोनाविरोधात लढणाऱ्या इतर शासकीय कर्मचाऱ्यांना देखील अशाप्रकारे मदत देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

देशात आणि राज्यात लॉकडाऊन जाहीर करुन एक महिना झाला. तरी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच राहिली आहे. विशेषतः मुबंई आणि पुण्यात रुग्णसंख्या कमी होत नाही. यावर आता कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अजित पवारांनी काही उपाय सुचवले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत, असेही अजित पवार म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *