|ठाणे| ठाणे आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही महापालिका क्षेत्रातील महापालिका रुग्णालयांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा शब्द आठवडाभराच्या आतच पूर्ण केला आहे. कृष्णा डायगोनोस्टिकस आणि खा डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही महापालिका रुग्णालयांना आज 20 व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले.
अमेरिकेच्या पलमोनेटिकस कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञानाने केलेल्या या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेता येऊ शकणार आहे. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या अतिगंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी आता मुंबईत हलविता येणे शक्य होणार आहे.
आज ठाणे महानगरपालिकेत महापौर नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे आणि कृष्णा डायगोनिस्टकचे संचालक राजेंद्र मुथा यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे 10 व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे 10 व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. उपरोक्त दोन्ही ठिकणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती होती. तसेच तिथे त्याचे सादरीकरण देखील करण्यात आले.
दरम्यान, दोन्ही आयुक्तांच्या समवेत खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांच्या समस्या आणि उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली आणि आवश्यक सूचना केल्या. महापालिका रुग्णालये अधिक सक्षमपणे कार्यान्वित करण्यासाठी आपण खासदार निधीतून यापूर्वी 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे. सध्या खासदार निधी रद्द झाल्याने यापुढे खासदार निधी देता येणे शक्य नसले तर CSR निधीतून आणि वेळप्रसंगी वैयक्तिक मदत करण्याचा शब्द यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिला.