| नागपूर | काल २६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक – शिक्षकेतर समन्वय समितीची Online बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शिक्षक सह इतर कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी सहभागी झाले होते.
१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना DCPS योजना लागू करण्यात आली व आत्ता तिचे NPS मध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया केली जात आहे. DCPS मध्ये कपात झालेल्या रक्कमेचा हिशोब दिला गेला नाही. त्यात शासन वाटा व व्याज जमा न करता शिक्षक कर्मचाऱ्यांना NPS योजनेत वर्ग करने योग्य नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर NPS योजना राज्य सरकारने लागू केली तर केन्द्राच्या NPS धारक कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन व ग्राज्युटी चे लाभ दिले जातात; पण ते लाभ राज्य कर्मचारी यांना दिले जात नाही, तसेच ज्यांच्या अजुन कपात नाहीत त्यांच्या रकमेची जबाबदारी सरकारची असल्याने महाराष्ट्रातील १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांनी NPS चे फार्म भरु नये असे ठरविण्यात आले आहे.
या बैठकीत जुन्या पेन्शनच्या विषयावर व्यापक चर्चा झाली. सर्व संघटनांनी जुन्या पेन्शनच्या विषयावर एकत्रित येऊन संघर्ष केला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व तयार असल्याचे सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी ग्वाही दिली. जुन्या पेन्शनच्या आंदोलना संदर्भात सर्व संघटनांनी एकत्रीत येऊन एक समान कृती कार्यक्रम ठरवला जावा त्यासाठी एका व्यापक बैठकिचे आयोजन करुन सर्वांनी त्यात आपले योगदान द्यावे असे सर्वानुमते ठरले. त्यानुसार सर्व संघटनांच्या प्रतिनिधीं सोबत चर्चा करून लवकरच महाराष्ट्रातील सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून एक व्यापक लढा जुन्या पेन्शन साठी दिला जाईल, अशी दिशा स्पष्ट करण्यात आली असल्याची माहिती जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिली.
काल झालेल्या बैठकीत प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक काळुजी बोरसे पाटिल, समन्वय समिती चे राज्य समन्वयक मधुकर काठोळे, जि. प. आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण खरमाटे, जि. प. कर्मचारी संघटनेचे गिरीश दाभाळकर, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष (संभाजी थोरात गट) बाळकृष्ण तांबारे, प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, ग्रेड मुख्याध्यापक महासंघाचे नेते श्रीराम परबत, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे साजिद निसार, प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजी पाटील गट) शंभूराजे पाटील, जुनी पेन्शन हक्क कृती समिती (सिनियर काॅलेज प्राध्यापक) डॉ. सोमनाथ वाघमारे, डॉ. मारोती तेगमपुरे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे वितेश खांडेकर, गोविंद उगले, सुनील दुधे, प्राजक्त झावरे पाटील व शिवाजी खुडे उपस्थित होते.