ठाण्यात कडक लॉक डाऊन करण्यास प्रशासन सज्ज..!

| ठाणे | कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाण्यामध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. यावेळी लॉकडाऊन एकचे सगळे नियम आणि निर्बंध पुन्हा लागू केले जाणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 १ जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होईल. २ ते ११ जुलैपर्यंत हा लॉकडाऊन कडक असणार आहे. भाजी तसेच मासळी बाजारदेखील या काळात बंद असतील. मुंबईला ये-जा देखील करता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी असणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. याआधी उल्हानसगर आणि भिवंडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर नवी मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण ठाण्यात पुन्हा टाळेबंदी लागू केली जाण्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु होती. प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. पण अखेर आज पोलीस आणि महापालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर लॉकडाऊनचा अधिकृत आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान निर्बंध थिथील झाल्याने लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून ठाणे पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी लोकांना नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणा-या ठाणे, कल्याण-डोंबवली, भिवंडी, उल्हासनगर या चार महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात राहणे अपेक्षित आहे. गरजेच्या गोष्टी, कामांसाठी खासगी कार, टॅक्सी, रिक्षा ज्यामध्ये एक अधिक अशा दोघांना आणि दुचाकीवर एकालाच परवानगी आहे. असे असतानाही लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. कंटेनमेंट झोन, रेड झोन वाढत आहेत, असे अमित काळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.