शासकीय कर्मचाऱ्यांना विना ई पास आंतर जिल्हा प्रवासाची परवानगी द्या..
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची सरकारकडे मागणी...

| मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बरीच कुटुंबे मुंबई, पुण्यातून सध्या आपल्या गावी जात आहेत. राज्य शासनाने देखील परराज्यातील मजूर/जनता यांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी नियोजन करून त्यांना त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.  परंतु कर्तव्यावर असणारी शासकीय कर्मचारी आणि त्यांची कुटुंबे मात्र मुंबईत अडकून पडली आहेत, तसेच बरेच कर्मचारी आपल्या गावी देखील अडकले असून त्यांना कर्तव्यावर हजर व्हायचे आहे. या सर्वांना विना ई पास आंतर जिल्हा प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सरकारकडे केली आहे. 

संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी सांगितले की, आपल्याच राज्यातील कर्मचारी गावी अडकलेले असताना त्यांना मुंबईत आणण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध करून देण्याबाबत प्रभावी उपाय योजना करण्यात आलेली नाही याकडे आम्ही लक्ष वेधू इच्छितो. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील शासकीय कार्यालयात कार्यरत अनेक कर्मचारी हे आपल्या मुळ गावी अन्य जिल्ह्यांत अडकून पडले आहेत,  असे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचेसाठी सध्याच्या आंतरजिल्हा प्रवासाची कार्यपद्धतीत सुधारणा करून राज्य शासकीय कर्मचा-यांनी कार्यालयीन ओळखपत्र दाखविल्यास ई पास ची मागणी न करता प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी. 

याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे सचिव अविनाश दौंड यांनी दै. लोकशक्ती शी बोलताना सांगितले की, अशी सोय केल्याने कोरोना विरोधातील या लढ्यात अधिक कर्मचारी सहभागी होतील. तरी वरील प्रस्तावाचा शासनाने ताडडीने विचार करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *