भाजप आमदार कोरोना बाधीत..! हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये बडे नेते..

| पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाचा लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना रुग्णालयाला भेट दिली होती त्या बैठकीलाही लांडगे उपस्थित होते.

सध्या दोघांवरही चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याच सांगण्यात आले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राज्याचे बडे मंत्री तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

त्या बैठकीला आमदार महेश लांडगे हे देखील उपस्थित होते. त्याच बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घेतलेल्या बैठकिला ते उपस्थित होते. यावेळी त्यांचा अनेक नेत्यांशी संपर्क आला. तर सहा दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण या कोरोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णालयात प्रशासनाकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी आमदार महेश लांडगे फडणवीस यांच्यासोबत बराच वेळ होते.

फडणवीस यांच्यासोबत आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा संपर्क आला होता. तसेच, मतदार संघातील बऱ्याच ठिकाणी हायअलर्ट करण्यात आला आहे. काही भागांना कोरोनाचा कंन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. तर, झोपडपट्टी भागाला कोरोनाचा केंद्रबिंदू म्हणून जाहीर केले आहे. अशा भागातील लोकांची होणारी अडचण पाहून आमदार लांडगे यांनी त्या भागाला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना मदत केली आहे.

कोण आहेत ‘हायरिस्क कॉन्टॅक्ट’ ?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आदींसह उच्चपदस्थ अधिकारी यांची पुण्यातील विधान भवन येथे बैठक झाली होती. या बैठकीला जिल्ह्यातील आमदारांसह महेश लांडगे सुद्धा उपस्थित होते. तसेच, गेल्या आठवडाभर आमदार लांडगे यांनी मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ घालवला आहे. आठवड्यातून एकवेळ महापालिकेत भेट देऊन त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे माजी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर प्रमुख पदाधिकारी यांच्या संपर्कात आमदार लांडगे आले आहेत. लांडगे यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे १०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *