केंद्राचा रडीचा डाव सुरू – मंत्री परब

| मुंबई | केंद्र सरकारकडे आम्ही अधिकच्या रेल्वेची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला मध्यरात्री रेल्वेचं वेळापत्रक पाठवलं. त्यातील बहुतेक गाड्या दुपारी १२च्या आत सोडायच्या होत्या. ईदची ड्युटी आटोपून सकाळी घरी गेलेले पोलीस दुपारी ड्युटीवर येणं कसं शक्य आहे? आणि एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाड्यांचं नियोजन करण्याचं कारण काय? असा सवाल करतानाच महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हे सर्व केलं जात असून केंद्राकडून अजूनही रडीचा डाव सुरू आहे, अशी टीका राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी रेल्वेच्या भोंगळ कारभारावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही केंद्राकडे दररोज ८० गाड्या पाठवण्याची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात ३० गाड्या मिळाल्या. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करताच केंद्राने रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. १ मेपासून ते २४ मे पर्यंत आम्ही जवळपास ७५५ गाड्यांमधून ७ लाख ७६ हजार मजुरांना त्यांच्या गावी पाठवलं.

त्यानंतर २६ मे नंतर महाराष्ट्राला १७२ गाड्या सोडण्याची विनंती केंद्राला केली.  त्यावर केंद्राने रात्री अडीच वाजता आम्हाला गाड्यांचे वेळापत्रक पाठवले. यातील बऱ्याच गाड्या दुपारी १२ वाजताच सोडायच्या होत्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं म्हणून पोलीस हवेत. पण रात्री ईदची ड्युटी आटोपून घरी गेलेल्या पोलिसांना ड्युटीवर बोलावणं कसं शक्य आहे? असा सवाल करत आम्ही गाड्या पाठवल्या होत्या, पण महाराष्ट्र सरकारच मजुरांना पाठवण्याची व्यवस्था करायची नाही,  असा कांगावा करून महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठीच केंद्राचा हा खटाटोप असल्याचा आरोप परब यांनी केला.

पश्चिम बंगालासाठी आम्ही ४८ गाड्यांची मागणी केली होती. पुढच्या काही दिवसांत पश्चिम बंगालसाठी आणखी ४८ गाड्या सोडण्यास सांगितले होते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये वादळ आल्याने पश्चिम बंगाल सरकारने दररोज किमान दोनच गाड्या पश्चिम बंगालसाठी सोडण्याची विनंती महाराष्ट्राला केली होती. आम्ही ही विनंती मान्य केली. असं असतानाही पश्चिम बंगालसाठी एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाड्यांचं नियोजन करण्याची गरज काय होती? असा सवालही परब यांनी केला.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये वादळ आलेले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या जनतेने दोन दिवस महाराष्ट्रातच थांबावं. त्यानंतर तुमच्या जाण्याची व्यवस्था केली जाईल, असं परब म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *