अध्याय ४ : तख्तास जागा हाच गड करावा – रायगडाचे वेगळेपण (पूर्वार्ध)

जावळीकर मोरे यांच्यासोबत बखेडा निर्माण होऊन शिवरायांनी रायगड स्वराज्यात कसा सामील करून घेतला याची हकीकत आपण मागच्या लेखात घेतली. जावळीकर मोऱ्यांचे वर्चस्व मोडीत काढून शिवरायांनी त्यांची पूर्ण जहागीरच स्वराज्यात सामील करून घेतली. “ येता जावळी जाता गोवळी ’’ अशी वल्गना करणाऱ्या मोर्यांवर शिवरायांनी जो निर्विवाद विजय मिळवला त्याचा अभ्यास करता शिवरायांची युद्धनीती किती बेजोड होती याची पुरेपूर खात्री पटते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करताना असे जाणवते कि शिवरायांच्या मनात एखादा दुर्गम गड ताब्यात असावा अशी इच्छा होतीच आणि तो दुर्ग रायरी हाच असावा असेही जाणवत राहते परंतु तात्कालिक परिस्थिती अशी होती कि इच्छा असूनही काही काळ शिवरायांना संयमाने राहणे क्रमप्राप्त होते.

काले मृदुर्यो भवती | काले भवती दारूण: |
स साध्नोती परंश्रेयं | विघ्नानामपि धीष्टती ||

असा एक संस्कृत श्लोक आहे . त्याचा अर्थ असा कि “ जो योग्य वेळी मृदू म्हणजेच शांत संयमी आणि योग्य वेळी दारूण म्हणजे कठोर वागतो तोच व्यक्ती सर्व प्रकारचे विजय तर मिळवतोच पण संकटांवर सुद्धा हुकुमत चालवतो ’’  नेमका रायगड घेण्याचा विचार शिवरायांच्या मनात का आला आणि मग रायगड इतर दुर्गांपासून भिन्न कसा होता याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. रायगड घेण्यामागे अनेक कारणांची एक परंपरा दिसून येते त्या सर्वांचा उहापोह आपण क्रमाक्रमाने घेऊयात.  सर्वात आधी तात्कालिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊयात.

रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतर शिवरायांनी तोरणा दुर्ग जिंकून घेतला व जवळच्या डोंगरावर राजगड बांधण्याची हालचाल सुरु केली. हा प्रदेश तसा दुर्गम आणि मुख्य जहागीरीपासून काहीसा दूर असल्याने विजापूर दरबाराने तात्पुरती समजूत देऊन या गोष्टींकडे दुर्लक्ष केले परंतु शिवरायांनी कोंढाणा दुर्ग जिंकल्यानंतर मात्र आदिलशाही दरबाराचे पित्त खवळले आणि त्यांनी शहाजी राजांना कैदेत टाकले व त्यांच्या सुटकेसाठी म्हणून कोंढाणा परत करण्याची अट घातली. त्यामुळे शिवरायांना कोंढाणा आदिलशाही ला परत करावा लागला. कोंढाणा परत करावा लागल्याने शिवरायांना एखादा मजबूत किल्ला आपल्या ताब्यात घ्यावा असे वाटू लागले आणि त्यांची नजर जावळीच्या खोऱ्यावर स्थिरावली. जावळीकर मोऱ्यांच्या अन्यायाच्या तक्रारी शिवरायांकडे १६५१ पासूनच येऊ लागल्या होत्या परंतु शहाजी राजांची कैदेतून सुटका झाली असली तरी शहाजी राजे अजून विजापुरातच होते. त्यामुळे शिवरायांनी उघड अशी हालचाल न करता जावळीच्या खोऱ्यात जे वतनदार तथा पाटील लोक मोऱ्यांच्या अत्याचाराला बळी पडले होते त्यांना आपल्या बाजूला वळण्यात लक्ष केंद्रित केले. पुढे १६५३ मध्ये शहाजी राजांना कर्नाटकात जाण्याची परवानगी मिळाली आणि विजापूरचा बादशहा महमद आदिलशहा मरणासन्न झाल्याने राजधानीतच अस्थिर परिस्थिती उत्पन्न झाली. या अस्थिरतेचा फायदा घेऊन शिवरायांनी जावळी कशी काबीज केली हे आपण पहिले आहेच.

इ.स.१६५७-१९६५८ मध्ये राजकीय परिस्थिती अशी होती कि विजापूर मध्ये महमद आदिलशहा मरणासन्न असल्याने त्याचा उत्तराधिकारी कोण असणार याबद्दल लाथाळ्या सुरु होत्या आणि मुघल शहजादा औरंगजेब आपल्या बाप आणि भावांना ठार करून दिल्लीचे तख्त कसे काबीज करता येईल ह्या धांदलीत होता. हि तात्कालिक परिस्थिती वर्ष दोन वर्षानंतर निवळली कि दोन्ही शाह्यांचे लक्ष आपल्या स्वराज्यावर लागणार याची जाणीव शिवरायांना होती. दिल्ली आणि विजापूर मध्ये सर्वकाही स्थिरस्थावर झाल्यावर त्यांची टोळधाड आपल्या जहागिरीवर आणि पर्यायाने मैदानी भागातील पुणे परिसरावर येणार हे शिवराय ओळखून होते. या सर्व बाबींचा विचार करता शिवरायांनी पुढील सर्व हालचाली सह्याद्रीच्या मजबूत भिंतीआड करण्याचे ठरवले आणि या सर्व हालचालींचा केंद्रबिंदू अर्थातच रायरी आणि जावळी असणार होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

राजकारणाचे डावपेच जरी कागदावर आखले जात असले तरी त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मात्र भौगोलिक परिस्थिती जमेची असावी लागते. त्यासाठी आपण रायगडाची भौगोलिक परिस्थिती समजावून घेऊया :

रायगडाची भौगोलिक परिस्थिती :

रायगडाची भौगोलिक परिस्थिती समजावून घेताना आधी सह्याद्री समजावून घ्यावा लागतो. सह्याद्रीची पर्वत रांग पश्चिमेच्या अरबी समुद्राला समांतर अशी आहे. सह्याद्रीचे जे अंग समुद्राच्या अंगाला आहे ते जास्त उंच आहे. सह्याद्रीची रांग ते अरबी समुद्र यांच्या दरम्यान सरासरी २५ मैल लांबीची जमिनीची पट्टी आहे ज्याला आपण कोंकण म्हणून ओळखतो. सह्याद्री आणि हिमालय यांची तुलना केल्यास सह्याद्रीची रचना समजणे सोप्पे होईल. हिमालयाच्या एकमेकांना समांतर अशा तीन रांगा पहावयास मिळतात व ह्या तिन्ही रागांची उंची सरासरी समान आहे. सर्वात कमी उंचीच्या शिवालिक टेकड्या त्यानंतर मध्यम उंचीचे हिमांचल डोंगर आणि सर्वात नंतर महत्तम उंचीचे हिमाद्री पर्वत… परंतु सह्याद्रीची रचना अशी नाही. सह्याद्रीची एकच सरळ रांग आहे आणि मुख्य रांगेशी काटकोन करणाऱ्या अनेक शाखा पूर्व आणि पश्चिम दिशेस पसरल्या आहेत. सह्याद्रीचे जे फाटे किंवा शाखा पूर्वेस म्हणजेच घाटावर किंवा देशावर गेले आहेत त्यामध्ये सुटे किंवा विलग डोंगर कमी आहेत. ज्या शाखा किंवा फाटे पश्चिमेस गेले आहेत त्यात मात्र विलग डोंगर तुलनेने जास्त आहेत. असाच एक पूर्णपणे वेगळा डोंगर म्हणजेच रायरीचा डोंगर ज्यावर शिवरायांनी रायगड वसविला. इतर कुठल्याही डोंगरावरून चालत किंवा चढाई करत रायगडावर पोहोचता येत नाही हा रायगडचा सर्वात मोठा गुण शिवरायांनी हेरला. रायगड हा शंकराच्या पिंडीसारखा आहे. चारही दिशांनी पूर्णपणे वेगळा अलिप्त. ह्या अलिप्तपणामुळे रायगडाला नैसर्गिक अभेद्यता लाभली. त्याकाळी समुद्रमार्गे हजारोंचे सैन्य पाठवून आक्रमण करू शकेल असे सामर्थ्यवान आरमार कुणाकडेच नव्हते. त्यामुळे रायगडावर आक्रमण करायचे झाल्यास ते जमिनी मार्गानेच होणार हि गोष्ट नक्की होती परंतु रायगडाची भौगोलिक स्थिती अशी कि कोणत्याही मार्गाने आले तरी एकदा संपूर्ण सह्याद्री रांग ओलांडावीच लागते आणि त्यानंतर ६०० फुट चढाव चढून यावे तेंव्हा कुठे रायगडाचा पायथा दिसतो आणि तिथून वर दुर्ग २००० फुट. सह्याद्रीच्या निबिड अरण्यातून तोफा वगैरे अवजड साहित्य घेऊन येणे म्हणजे मोठे जिकीरीचे काम आणि एकदा पूर्ण सह्याद्री रांग उतरून थोडा कुठे विश्रांतीचा विचार करावा तर समोर ६०० फुटांची पुन्हा खडी चढाई. इतर किल्यांच्या तटांना सुरुंग लावून किल्याचे बुरुंज उडवून देण्यासाठी प्रयत्न तरी करता येतो पण इथे तर तटबंदी म्हणून सह्याद्रीचे १५०० फुट बेलाग कडे….( ..चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच.. ) गडावर जाण्यास एकच बिकट वाट..त्याच्याही एका बाजूला खडकाचा स्वाभाविक तट आणि दुसर्या बाजूला शेकडो फुट खोलीची उभी दरड.. त्यामुळे रायगड हा अभेद्य . रायगडाची अशी अभेद्यता पाहिल्यावर एक प्रश्न मनात उत्पन्न होणे साहजिक आहे..  अलिप्त माणसावर जेंव्हा काही संकट येते तेंव्हा तो एकटा पडतो आणि त्याची अलिप्तता त्याची शत्रू बनते. रायगडा बाबत पण असे घडू शकले असते का ? जर रायगड चारही बाजूंनी अलिप्त आहे तर मग रायगडाला चारही बाजूंनी घेरणे किंवा वेढा टाकणे सहज शक्य होत असेल न ? तुम्हाला हि पडला असेल न असा प्रश्न ?… पण हा विचार शिवरायांनी केला नसेल का ? चारही बाजूंनी मोकळा असला तरी रायगडाला वेढा घालणे हि एक अशक्यप्राय गोष्ट होती..  ती अशक्यप्राय का होती हे आता पाहूया.

रायगडाचे नैसर्गिक दुर्गमत्व :

“ रायगड पहाडी किल्ला चांगला. शत्रूची फौज बसावयास जागा नाही. घोडे माणूस जाण्यास महत्संकट. वरकड किल्ले पन्हाळे वगैरे बहुत गोमटे पण खुलासेवार व मैदानांत यास्तव आजच्या प्रसंगाला हीच जागा बरी..येथे लवकर उपद्रव होऊ न शकेल …’’ ( मराठा रियासत भाग १ पृ ३६२ ) रायगडाच्या नैसर्गिक दुर्गमत्वाचे वर्णन या ठिकाणी वाचावयास मिळते. रायगड चारही बाजूंनी मोकळा आहे हि गोष्ट फक्त डोंगर आणि टेकड्या या बाबींना लागू होते. वास्तवात रायगड तीन बाजूंनी नद्यांनी वेढला आहे. रायगडाच्या पूर्व आणि दक्षिण बाजूला काळ नदीचे खोरे आहे तर पश्चिम बाजूला गांधारी नदीचे खोरे पसरले आहे. कोकणात पडणारा पाऊस लक्षात घेता या नद्या वर्षातले ४ महिने लालसर पाण्याने दुथडी भरून वाहत असतात त्यामुळे ह्या काळात या नद्या ओलांडून येणे किंवा त्यांच्या काठावर छावणी बसवून वेढा देणे अशक्यप्राय होते. मुळात सह्याद्रीच्या सरळ रांगेचा पायथा आणि रायगडाचा पायथा ह्या मधली दरी फारफार तर २ मैल आहे आणि त्यातलाही बराच भाग नद्यांच्या खोर्यांनी व्यापलेला आहे त्यामुळे एखाद्या शत्रूने खूप हिम्मत करून ६-७ महिने वेढा चालवला तरी पावसाला सुरु होताच त्याला आपला सगळा सरंजाम घेऊन सुरक्षित जागा गाठणे क्रमप्राप्त अन्यथा गांधारी आणि काळ नद्यांचे पाणी त्यांना नेऊन समुद्रात जलसमाधी देणार हे निश्चीत. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून विलग.. उंचीने इतर किल्ल्यांपेक्षा सरस.. तीन बाजूंनी नद्यांचे खोरे अश्याप्रकारे रायगडाला एक नैसर्गिक दुर्गामत्व प्राप्त झाले होते. आपली राजधानी अशाच एका दुर्गम ठिकाणी असावी अशी इच्छा शिवरायांची असणे स्वाभाविक आहे.

राजधानी हा कुठल्याही राज्याचा मानबिंदू असतो. युध्द छेडले गेल्यास शत्रूराष्ट्र एकमेकांचा प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न तर करतातच परंतु अधिक रोख हा राजधानी जिंकून शत्रू राष्ट्रात अस्वस्थता उत्पन्न करण्याकडे असतो. त्यामुळे स्वराज्य अगदी बाल्यावस्थेत असताना आणि मैदानी प्रदेशात आदिलशाही आणि मुघल फौजांशी संघर्ष होणार हि निश्चित बाब असताना शिवरायांनी राजधानी म्हणून सह्याद्रीच्या मजबूत भिंतीचे संरक्षण लाभलेला रायगड निवडला यात आश्चर्य ते काय ? परंतु भौगोलिक स्थान आणि दुर्गम प्रदेश हे दोनच निकष मात्र नव्हते. रायगडाचे भौगोलिक स्थान म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर दुर्गम भागात एकटा पण खंबीर उभा असलेला रायगड नजरेसमोर येतो परंतु रायगडा पासून सिद्दीचा जंजिरा आणि शिवरायांचे प्रदीर्घ वास्तव्य असलेला राजगड जवळजवळ सारख्याच अंतरावर येतात हे आपल्याला माहित असते का ? रायगड राजधानी करण्यामागे आर्थिक करणे कोणती होती ? भौगोलिक मोजमापे कधीकधी कशी फसवी असतात ? स्वराज्याला खरा संघर्ष कुणाशी करावा लागणार या बद्दल शिवरायांचे काय विचार होते ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या लेखात घेणार आहोत.

|| जयोस्तु श्री राजा शिवछत्रपती ||

दुर्गासेवेसी तत्पर मावळा निरंतर,
श्री प्रवीण काळे-देशमुख , रायगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *