| मुंबई | महाराष्ट्रात करोनाचे नवे ५८३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात करोनाची लागण होऊन २७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. ५८३ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १० हजार ४९८ झाली आहे. गुरुवारपर्यंत महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ९ हजार ९१५ होती. त्यामध्ये आता ५८३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने रुग्ण संख्या १० हजारांच्याही पुढे गेली आहे.
आज राज्यात २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी २० रुग्ण मुंबईचे, ३ रुग्ण पुण्याचे, २ जण ठाण्यातले आहेत. तर नागपूर शहरातील १ आणि रायगडमध्ये १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या २७ मृत्यूंपैकी १९ पुरुष तर ८ महिला आहेत. २७ मृत्यूंपैकी ६० वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांची संख्या १४ आहे. तर १३ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले आहेत. २७ मृत रुग्णांपैकी २२ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार आढळून आले आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूंमुळे राज्यातील मृत्यूंची आत्तापर्यंतची संख्या ४५९ झाली आहे.
आज दिवसभरात १८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत १७७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८ नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे नमुने करोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तर १० हजार ४९८ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ लोक होम क्वारंटाइन असून १० हजार ६९५ लोक हे संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत अशीही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
देशभरात १८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे. यापैकी ८ हजार २७३ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन १ हजार ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३३ हजार ६१० रुग्णांपैकी १० हजार ४९८ रुग्ण महाराष्ट्रात आहेत.