#coronavirus_MH – १९ मे आजची आकडेवारी..! सर्वाधिक मृत्यू..

| मुंबई |  राज्यात आज कोरोनाच्या तब्बल २१२७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७१३६ वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात २६,१६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात सर्वाधिक ७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आज झालेल्या मृत्यूपैकी ४३ जण मुंबई, १५ जण ठाणे तर पुण्यातील ६, अकोला ३, नवी मुंबई, बुलढाणा २, नागपूर, औरंगाबाद, धुळे, नाशिक शहरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत १३२५ जणांचा मृत्यू झाला आहे. आज १२०२ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २ लाख ९३ हजार ९९८ नमुन्यांपैकी २ लाख ५६ हजार ८६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर ३७१३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ८६ हजार १९२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून २१ हजार १५० जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत ९६३९ कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ५० पुरुष तर २६ महिला आहेत. त्यातील ३० जण हे ६० वर्षापुढील वयोगटातील आहे. ३९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ७ रुग्ण ४० वर्षाखालील आहे. ७६ रुग्णांपैकी ५८ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्रात टेस्टिंग सर्वाधिक

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे कारण आपण टेस्टिंग मोठ्या प्रमाणावर करतो आहोत. दररोज १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. तसंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं आहे ही बाब समाधानाची आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

हीन वागणूक देऊ नका

एखाद्या माणसाला करोनाची लागण झाली म्हणून त्याला हीन वागणूक देऊ नका. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हे मला आज आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. कारण एखाद्याला करोना झाला म्हणजे त्याला हीन वागणूक दिली जाते असे प्रकार समोर आले आहेत. करोनाच काय एखाद्याला होम क्वारंटाइन केलं तरीही त्याला दिली जाणारी वागणूक हीन असते. अशा वागणुकीमुळे त्याचे मनोधैर्य खचू शकते त्यामुळे कुणालाही अशी वागणूक देऊ नका अशी विनंती मी तुम्हाला करतो आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

करोनासोबत जगावं लागेल

करोनासोबत आपल्याला जगावं लागेल. आपण घाबरुन जाण्याचं कारण नाही मात्र अधिक सजग आणि जागरुक राहणं ही आत्ता काळाची गरज आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published.