रेडझोन जिल्ह्यातील शिक्षकांना अतिरिक्त करू नका – अनिल बोरनारे
भाजप शिक्षक आघाडीची शासनाकडे मागणी..


 

शाळा बंद असल्याने व लॉकडाउनमुळे अद्याप एकही विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नसल्याने शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती वाटत असून तणाव वाढत आहे.
अनिल बोरनारे, भाजपा शिक्षक आघाडी.


| मुंबई | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा १५ मार्च पासून बंद आहे. अद्याप कोणत्याही अनुदानित शाळेत इ.१ ली ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत , त्यामुळे या वर्षी बरेच शिक्षक पुढील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे अश्या भीतीयुक्त गंभीर परिस्थितीत अनुदानित शाळेतील शिक्षकांना पुढील शैक्षणिक सत्रात अतिरीक्त करू नये अशा मागणीचे निवेदन भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण आयुक्त व शिक्षण सचिव यांना पाठविले आहे.

आता लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढल्यामुळे संपूर्ण राज्यातील अनुदानित शाळेतील प्रवेशप्रक्रिया रखडली आहेत. पुढील शैक्षणिक सत्राचे संपूर्ण वेळापत्रकाचे नियोजन बदलणार असल्याचे स्पष्ठ दिसते. शाळा बंद असल्याने व लॉकडाउनमुळे अद्याप एकही विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नसल्याने मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही फार चिंतेत सापडले आहेत, कारण विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात त्यांची पदे मंजूर होतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा पट कमी झाला तर शिक्षकांचाही पट कमी होऊन त्यांना अतिरिक्त होण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती वाटत असून तणाव वाढत असल्याची स्थिती निर्माण झाल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

शैक्षणिक सत्र संपले असून लॉकडाऊन १७ मे पर्यंत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेशावर याचा निश्चितच विपरीत परिणाम होऊन पुढील शैक्षणिक सत्रात मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक होऊ शकतात त्यामुळे निदान रेडझोन जिल्ह्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांना पुढील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त ठरविण्यात येवू नयेत व त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीच्या राज्य संयोजक डॉ कल्पना पांडे, मुंबई कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे, सह-संयोजक बयाजी घेरडे, सुभाष अंभोरे, सचिन पांडे, विजय धनावडे यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *