संपादकीय – “साठी” तला कणखर ‘तरुण महाराष्ट्र’
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ तथा १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने आणि असंख्य मराठी जनतेच्या परिश्रम, कष्ट आणि त्यागाने मराठीजनांचा महाराष्ट्र आज साठ वर्षांनी देखील दिवसेंदिवस तरुण होताना दिसत असल्याचे चित्र आजच्या महाराष्ट्रदिनी बघावयास मिळत आहे.

मराठी भाषिकांचा एकसंघ महाराष्ट्र उभा झाल्यानंतरही या महाराष्ट्राने कधीही कुणाला नाकारले नाही, सगळ्यांची माय बनवून या महाराष्ट्राने संपूर्ण देशांवर आणि देशवासीयांवर आपले वात्सल्य कायम पाझरत ठेवले. आज सर्वाधिक परभाषीय लोक कोणत्या राज्यात आढळत असतील तर ते आढळतात महाराष्ट्रात. यावरून महाराष्ट्राच्या मनाचा अंदाज आपल्या सर्वांना आलाच असेल. सर्वजण या राज्यात गुण्यागोविंदाने नांदतात यातूनच महाराष्ट्राची सहिष्णुतेची भूमिका येथील जनमानसामध्ये किती रुजली आहे याचा प्रत्यय येतो.

वयाच्या साठी मध्ये प्रवेश करताना महाराष्ट्र अगदी तरुणासारखा डौलाने उभा आहे. याचा इतिहास जितका तेजस्वी आणि प्रखर आहे तितकाच तो मनोहारी आणि रंजक देखील आहे.

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले.

या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.

जेव्हा जेव्हा देशावर संकट आले तेव्हा तेव्हा सह्याद्रीचा वाघ कायम हिमालयाच्या मदतीला धावून गेल्याची उदाहरणे या भूमीच्या इतिहासात आढळतात.

आज राज्याच नव्हे तर देश आणि जग एका मोठ्या संकटातून जात असताना महाराष्ट्र संपूर्ण देशासोबत कणखरपणे उभा आहे, आजच्या दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना हे संकट लवकरच नष्ट होवो आणि पुन्हा आपला सह्याद्री अगदी डौलाने बहरत जावो, या मनोभावाने संपूर्ण मराठीजनांना तथा देशवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जाता-जाता जी मराठी जणांची एक खंत मनाला बोचत राहते ती बोलल्याशिवाय हे संपादकीय अपूर्ण वाटते; म्हणून लिहिणे अपरिहार्य आहे आणि अपेक्षा देखील, ‘दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा’ असे वर्षानुवर्ष म्हणत आलेला मराठी माणूस आता “दिल्लीच्या तख्तावरही बसतो महाराष्ट्र माझा” याची आस लावून बसलेला आहे.

या हीरकमहोत्सवी जन्मदिनाच्या निमित्ताने या तरूण महाराष्ट्राची मराठी जणांकडून हीच अपेक्षा.

योगेश थोरात ( वरिष्ठ संपादक)


4 Comments

  1. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *