दोन तीन विभाग सोडता इतर विभातील सरकारी कर्मचारी यांच्या वेतनावर गदा येण्याची शक्यता

| पुणे | महसूलात घट झाल्याने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देणेही सध्या शासनाला अवघड बनत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात त्यांचा पगार देणेही कठीण होईल, त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ देखील येऊ शकते, अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले, कोरोनामुळं शासनाच्या महसूलात घट झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुढील महिन्यात कर्ज काढावे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मदत व पुनवर्सन, आरोग्य आणि इतर दोन विभाग वगळता इतर विभागात वेतन कपात करण्याची वेळ आली आहे. मात्र, डॉक्टर, नर्स आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या कोरोना योद्ध्यांचे पगार दिले जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरोना विषाणूमुळे राज्यातील उद्योग व्यवसाय चालणे कठीण झाले आहे. यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील एकही पैसा अद्याप राज्याला मिळालेला नाही. त्यामुळे सध्याच्या गंभीर परिस्थितीत केंद्राने राज्याला लवकरात लवकर मदत देणं अपेक्षित आहे. मात्र, असं होताना दिसत नाही. उलट सरकारवर काहीजण टीका करण्याचे काम करीत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देण्याचे आवाहन करण्याऐवजी ज्या विरोधकांनी राज्यातील नेत्यांना, व्यवसायिकांना आणि नागरिकांना पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन केले, अशा महाराष्ट्रद्रोहींना राज्य शासनाच्या कारभारावर बोलण्याचा अधिकार नाही, अशा तिखट शब्दांत वडेट्टीवार यांनी राज्यातील भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *