हाहाकार : कोरोनाचे अमेरिकेत ७० हजाराहून अधिक बळी..!| मुंबई | कोरोनाच्या थैमानासमोर हतबल झालेल्या अमेरिकेत मृतांच्या संख्येत सातत्याने प्रचंड वाढ होत आहे. मागील २४ तासांमध्ये अमेरिकेत दोन हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गाच्या बळीचा आकडा ७० हजारांहून अधिक झाला आहे.

मागील काही दिवसांपासून दोन हजारांपेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाल्यामुळे अमेरिकेला काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. अमेरिकेत १२ लाखांहून अधिकजणांना कोरोनाचा बाधा झाली आहे. तर, एक लाख ९० हजारांपेक्षा अधिकजणांनी कोरोनाला मात दिली आहे. अमेरिकेत आतापर्यंत ७७ लाख नागरिकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग न्यूयॉर्कमध्ये दिसून आला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या तीन लाख ३३ हजारांहून अधिक झाली असून २५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ न्यूजर्सीमध्ये एक लाख ३३ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर ८५०० हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत कोरोनाचा सगळ्यात मोठा प्रभाव जून महिन्यात दिसून येण्याची भीती एका संस्थेने व्यक्त केली आहे. जून महिन्यात अमेरिकेत दररोज तीन हजार नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.