आमदार विक्रम काळे यांच्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली..!


 

” केलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याने कोणताही पुरावा विरोधी याचिकाकर्त्यांना मिळाला नाही. त्यामुळे हे धादांत खोटे आरोप माननीय कोर्टाने खारीज केले आहेत..” 

– आमदार विक्रम काळे 


| औरंगाबाद | शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या यचिकेवर मुंबई उच्च न्यायालच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान मुळ याचिकाकर्त्याने केलेल्या आरोपाचे कोणतेही पुरावे देता आले नाहीत तसेच सदर आरोपात तथ्य नसल्याचे निरीक्षण नोंदवित आव्हान देणारी याचिका न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी रद्दबातल ठरविली.

दरम्यान आमदार काळेंतर्फे याचिकेतील आरोप चुकीचे असून संबंधित याचिका खारिज करण्यात यावी अशी विनंती करणारा अर्ज दाखल करण्यात आला असता सुनावणीदरम्यान खंडपीठाने काळेंच्या निवडीला आव्हान देणारी याचिका रददबातल केली.

काय होते विक्रम काळेंवर आरोप : 
विक्रम काळे यांनी नामनिर्देशन अर्जासोबत चुकीची माहिती सादर केली. काळे यांच्याकडील लातूर येथील निवासस्थानाचा मालमत्ता कर थकीत होता. वीजबीलही थकीत होते. यासंदर्भात त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. तसेच विक्रम काळे आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही शिक्षक किंवा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी नामनिर्देशन अर्जात स्वतःला आणि पत्नीला प्राचार्यपदी कार्यरत असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे स्वतःसह पत्नीला उच्च शिक्षित दाखवून मतदारांची दिशाभूल केली. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल केल्याच्या दिवशी श्री. काळे यांनी मोठी जाहीर सभा घेतली. मतदारांना जेवण दिले तसेच केवळ जेवणासाठी एक कोटी रुपये खर्च केला असून हे निवडणूक खर्चाच्या मर्यादेच्या बाहेर आहे. मोठ्या प्रमाणावर जाहीराती दिल्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार निवडणूक खर्चाचा हिशोब निवडणूक झाल्यानंतर लगोलग दाखल करावा लागतो तो केला नाही. निवणूक कामातील शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत केले. त्या अधिकाऱ्यांनी १५ हजार मतपत्रिका बाद असतानाही संबंधित मतपत्रिका अधिकाऱ्यांनी काळेंच्या बाजूने मोजल्याचा आरोप देखील याचिकेत केला होता.

दरम्यान, याचिकाकर्ते तथा पराभूत उमेदवार संजय जाधव यांनी मूळ याचिका २०१७ मध्ये दाखल केली होती. या शिक्षक मतदारसंघ झालेल्या निवडणूकीत विक्रम काळे हे प्रचंड मताधिक्य घेऊन २५ हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले होते. तर प्रतिस्पर्धी उमेदवार तथा याचिकाकर्ते संजय जाधव यांना केवळ ११९ मते पडली होती.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *