शालार्थ मधून बंद करण्यात आलेली भविष्य निर्वाह निधीची टॅब तात्काळ चालू करा..!
शिक्षण संघर्ष संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन..

| अमरावती | राज्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना सध्याच्या स्थितीत त्यांच्या  भविष्य निर्वाह निधी खात्यातील रक्कम कुटुंबातील सदस्यांचा औषधोपचार, घर बांधणी तसेच घरातील मुला मुलींचे विवाह आदींसाठी आवश्यक आहे. परंतु भविष्य निर्वाह निधीची टॅब शालार्थ मधून मार्च २०२० पासून बंद करण्यात आल्यामुळे शिक्षकांना त्यांची हक्काची रक्कम मिळविता येत नाही. त्यामुळे अनेक शिक्षक अडचणीत आलेले असल्यामुळे शासनाने ही टॅब तातडीने सुरू करावी अशी मागणी  शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यात सध्या लॉक डाऊन मुळे अनेक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यात कर्मचाऱ्यांचे वेतन देखील अनियमित स्थितीत आहे. काही ठिकाणी लॉक डाऊनला शिथिलता असल्यामुळे शिक्षकांनी भविष्य निर्वाह निधी खात्यातील काही रक्कम परतावा आणि निपरतावा यासाठी अर्ज सादर केले आहेत.

काही कर्मचाऱ्यांचे आई-वडील यांचे आजारपण, कोविड १९ च्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषधी उपचारासाठी पैशाची गरज आहे, मुलांचे लग्न,घरबांधणी अशा विविध गोष्टींसाठी शिक्षकांना पैश्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे शिक्षकांनी ही रक्कम मिळविण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. तसेच जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत किंवा मयत आहेत त्यांची रक्कम देखील त्यांना किंवा त्यांचे कुटुंबीयांना मिळण्यासाठी अडचण जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांची दैनावस्था दूर करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीची टॅब सुरू करण्याची मागणी संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *