काही ठिकाणी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री तर काही ठिकाणी अजित पवार – चंद्रकांत पाटील

| पुणे | साप म्हणून भुई थोपटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी शनिवारी पुणे पालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार हे हेडमास्तर आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना दिला. तसेच विरोधी पक्षनेते दरेकर यांना देवेंद्र फडणवीस यांची तुलना संताजी धनाजी यांच्यासोबत करण्याचा मोह देखील आवराता आला नाही.

तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहात. कोण म्हणते सरकार पडणार? आम्ही कुणीच म्हणत नाही. पोटदुखी आम्हाला झालेली नाही, म्हणून बाहेर फिरत आहोत. पोटदुखी झाली असेल, तर त्यांना झाली असेल, म्हणून त्यांच्या फिरण्यावर मर्यादा आल्या आहेत, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

धारावी जवळपास दोन महिने भीतीच्या सावटाखाली होते ते विसरुन जायचे का?, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. शिवाय, अजित पवारांना पुणे आंदण दिले आहे का, असा खोचक टोमणाही प्रदेशाध्यक्षांनी मारला.

काही ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्री, तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. अजित पवार हेडमास्तर आहेत, म्हणून उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडून काहीतरी शिकावे, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला.

तिघे एकत्र येऊन लढा, भाजप त्याला घाबरत नाही आणि हे एकदा होऊन जाऊद्या. सरकारमध्ये ज्या कुरबुरी सुरु आहेत, त्या फक्त स्वत:च्या ताटात काहीतरी पाडून घेण्यासाठी सुरु आहेत, असे म्हणत राज्यातील पुढील निवडणुका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवण्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांनी थेट महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे.

सरकारला संताजी-धनाजीसारखे फडणवीस दिसतात; भाजपचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

ज्याप्रमाणे संताजी-धनाजी सारखे पाण्यात दिसायचे, त्याप्रमाणे सरकारी पक्षांना देवेंद्र फडणवीसांशिवाय कोणीच दिसत नाही, असा टोलाही दरेकर यांनी हाणला आहे. केंद्र सरकारने कोविडच्या परिस्थितीमध्ये काय मदत केली, याचा सविस्तर लेखा-जोखा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही दरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.