भारताचा मृत्युदर सर्वात कमी, कोरोना नसणाऱ्यांची देखील होणार चाचणी..!

| नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांच्या रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होत आहे.  आता आपला रिकव्हरी रेट ३१.७ टक्के आहे. तर या लढाईत आपला मृत्यू दर जगात सर्वात कमी आहे. मंगळवारी आपला मृत्यू दर जवळपास ३.२ टक्के एवढा होता. अनेक राज्यांत तर हा दर याहीपेक्षा कमी आहे. तसेच जगातील मृत्यूदर हा ७ ते ७.५ टक्क्यांच्या मधे आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. 

संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उत्तम मॉनिटरिंग सिस्टम तयार केली जात आहे. यासाठी  प्रत्येक जिल्ह्यात दर आठवड्याला २०० कोरोना टेस्ट अनिवार्य असतील. विशेष म्हणजे, या टेस्ट ज्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत, अशांच्या केल्या जातील. यामुळे, प्रत्येक जिल्ह्यात सामान्य माणसांमध्येही कोरोना व्हायरस आहे की नाही? याची तत्काळ माहिती मिळवता येईल.  तसेच यानंतर त्याच्यासाठी महत्वाची पावले उचलली जातील. देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सर्दी-खोकला आणि ताप यांसारखी कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची कोरोना टेस्ट यापूर्वीच अनिवार्य करण्यात आलेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७०,७५६ वर पोहोचली आहे. यांपैकी २२४५४ लोक ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. तर देशात एकूण ४६००८ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे २२९३ जणांचा मत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *