अन्वयार्थ : अवलिया शिक्षकाने शेतीतून फुलवला शिक्षणाचा मळा..!

विशिष्ट ध्येयानं पछाडलेले बाबू मोरे यांच्यासारखे लोक कमाल असतात! गेल्या तीन वर्षांपासून मोरे सरांनी पालकांचं स्थलांतर रोखून धरलंय. त्यांना शेतीकडं वळवलंय. पालकांसाठी शेती आणि मुलांसाठी शिक्षणाचा मळा फुलवणारं चाकोरीबाहेरचं काम करुन दाखवलंय. त्याची ही कहाणी ज्येष्ठ लेखक व प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांच्या लेखणीतून…!

‘आपण देशाला व जगाला देत असलेली अंतिम व सर्वोत्तम देणगी’ असं ‘नयी तालीम’चं वर्णन खुद्द महात्मा गांधींनी केलं होतं. ‘नयी तालीम’चा म्हणजे नव्या दृष्टिकोनांमधून शिक्षणाचा नवा विचार गांधीजींनी मांडला. त्या काळात गांधीजी देशातल्या दारिद्र्याचा, शहरांकडून होणाऱ्या खेड्यांच्या पिळवणुकीचा आणि खेड्यांमध्ये रोजगारनिर्मिती करण्याचा खोल विचार करत होते. या प्रश्नाला उत्तर म्हणून उत्पादक हस्तोद्योग आणि कौशल्ये यांचा शिक्षणात समावेश करून शाळेला स्थानिक स्तरावरील उत्पादन प्रकियांशी जोडण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न गांधीजी करत होते. १९३७ साली वर्धा येथे भरलेल्या शिक्षण परिषदेत ग्रामोद्योगांद्वारे ग्रामीण राष्ट्रीय शिक्षणाचा विचार मांडताना अत्यंत आग्रही स्वरात गांधीजींनी ‘शारीरिक श्रम मारून पुस्तकी ज्ञान वाढविण्यात आले तर त्याविरुद्ध आपण बंड पुकारले पाहिजे,’ असे निक्षून सांगितलं होतं. ‘नयी तालीम’ हा नवशिक्षणाचा विचार आजवरच्या शिक्षणविषयक सर्व रूढ विचारांना उभाआडवा छेद देणारा आणि एका मर्यादित अर्थानं का होईना खेड्यांना विकासाच्या पदपथावर नेण्यासाठी दिग्दर्शन करणारा होता.

हा सगळा इतिहास इथं सांगायचं कारणही तसंच खास आहे. ‘नयी तालीम’च्या माध्यमातून गांधीजींनी बघितलेलं स्वप्न बाबू मोरे नावाचा ध्येयवेडा प्राथमिक शिक्षक अंशत: प्रत्यक्षात जगतो आहे. आदिवासीबहूल पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातल्या खोमारपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोरे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. रोजगाराच्या निमित्तानं होणारं पालकांचं नेहमीचं स्थलांतर रोखून त्यांना उपजीविकेसाठी शेतीचे धडे देताना मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मोरे काम करत आहेत. अजूनही ज्या आदिवासी पाड्यांवर धड वीज पोहोचलेली नाही, अशा अत्यंत दुर्गम भागात आपल्या अथक मेहनतीतून शिक्षणासोबतच शेतीचा हिरवागार मळा फुलवणाऱ्या एका जिद्दी शिक्षकाची ही विलक्षण रोचक आणि तितकीच प्रेरक कहाणी आहे.

मोरे मुळचे मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातले. २००८ मध्ये नोकरीनिमित्त पालघरला आले. २०१३ साली मोरे यांची साखरे येथून खोमारपाडा शाळेत बदली झाली. शाळेत पहिली ते पाचवीचे वर्ग होते. पटसंख्या होती अठ्ठ्याऐंशी. शाळेत हजर झाले तेव्हा तिथल्या लोकांची भातशेतीची कामं आवरत आली होती. ही कामं आवरली की कामधंद्याच्या शोधात पालक वसई, विरार, कल्याण, मुंबईच्या दिशेनं स्थलांतर करत. बांधकाम मजूर म्हणून मासेमारी, वीटभट्ट्यांवर कामाला जात असत. मोरे हजर झाले त्याच वेळेस पालक कामाच्या शोधात बाहेरगावी निघाले होते. पालकांसोबत शाळेतली १७-१८ मुलंदेखील चालली होती. शिकण्याची उमेद आणि क्षमता असतानाही मुलं शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जाणार, हे दृश्य बघून मोरे यांचं संवेदनशील मन हललं. मात्र मनात कितीही सद्भावना असली तरी या पालकांना थांबवणार कसं? प्रश्न पोटापाण्याचा होता. पोटातल्या भुकेची आग नेहमी शिक्षणावर मात करते. अनेक वर्षांपासून हे दुष्टचक्र सुरू होतं. या काळात मोरे घरोघर फिरले. पालकांना भेटले. त्यांची मनं वळवायचा विफल प्रयत्न केला. मुलांना सोबत घेऊन जाण्याऐवजी गावात नातेवाईकांकडं ठेवायचा आग्रह धरला. त्याला तितकं यश आलं नाही. मात्र हार न मानता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. या काळात मोरे आणि सहकारी शिक्षक हतबल होऊन शांत बसले नाहीत. आठ-दहा मुलं वयानुरूप दाखल केली. ती शिकती केली.

झाडवेलींवर मोरे सरांचं विशेष प्रेम. शाळेला कुंपण नसल्यामुळं लावलेली झाडं जगायची नाहीत. कुंपण केलं. दोन्ही वर्गखोल्यांभोवतीच्या ओसाड, उजाड जागेत चहूबाजूंनी इतकी झाडं लावलीत की अगदी जवळ गेलो तरी शाळा दिसत नाही! हस्ताक्षर सुधार प्रकल्प असो की दुर्गम पाड्यावरील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्तायादीत चमकणे असो किंवा रिले स्पर्धेत सलग तीन वर्षे जिल्हा पातळीवर शाळेचा संघ पहिला येणे असेल, असं यश माहिती नसलेल्या गावासाठी हे ऐतिहासिक होतं. आजही शाळेतील अपवाद वगळता सर्व विद्यार्थी वाचतात, लिहितात. सरांच्या वर्गातले ८० टक्के विद्यार्थी दुसरीतच भागाकार शिकले आहेत. शाळेत पारंपारिक वर्गरचना नाही. क्षमतानुसार विषय गट अशी वर्गरचना केली आहे. विविध उपक्रम आणि शिकण्या-शिकवण्यातले हे बदल सहज लक्षात येतील इतके ठळक असल्यानं ते पालकांपर्यंत पोहोचले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याचा विचार मनात घोळवणाऱ्या मोरे सरांचा पालक संपर्कही प्रचंड असतो.

शाळेला जागा कमी असली तरी इथली परसबाग अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण. नवलच आहे ना? प्लॅस्टीक टबमध्ये अद्रक, बटाटे, मिरची, रताळे आदी पिकं घेतली जातात. शाळेसमोर अर्धा गुंठा पडीक जागा होती, ती मिळवली. कुदळ, फावडं हातात घेतलं. मुलांच्या मदतीनं जागा करून लागवडीलायक बनवली. शालेय पोषण आहारात उपयोगी पडतील, अशा भाजीपाला पिकांची लागवड केली. मेथी, पालक, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर असा लहानसा मळाच फुलवलाय. यातून तीन हेतू साध्य झाल्याचं मोरे सर सांगतात. पहिला, मुलांना ताज्या भाज्या खायला मिळू लागल्या. दुसरा, मुलांना प्रत्यक्ष कृतीतून शेतीविषयक/उत्पादक कामाचे धडे देणं शक्य झालं. तिसरा, ‘हे शक्य आहे’, हे प्रात्यक्षिकातून दाखवत पालकांना शेतीकडं वळवणं. मुलांची मेहनत आणि सरांचं कृतिशील मार्गदर्शन यांच्या जोरावर परसबागेचा प्रयोग भलता यशस्वी झाला. शाळेजवळून येता-जाता घटकाभर थबकून पालक उत्सुकतेनं बघत, काहीजण कुतूहलापोटी माहिती विचारत. भाताव्यतिरिक्त इतर पिकं घेतली नसल्यानं भाजीपाल्याचं उत्पादन त्यांच्यासाठी नवं होतं. खरं तर मोरे सर याच संधीच्या प्रतीक्षेत होते!

पालकांपुढे शेतीचा प्रस्ताव-

नेहमीप्रमाणं २०१६चा भाताचा सिझन आवरत आला. पालकांची गाव सोडून जायची तयारी सुरू झाली. कामामधून परिचय झालेले मोरे सर आता गावात बऱ्यापैकी रुळले होते. त्यांच्या मताला महत्त्व आलं होतं. मुलं आणि पालकांचं स्थलांतर रोखण्यासाठी मोरे सरांच्या डोक्यात बऱ्याच दिवसांपासून विचार घोळत होते. २०१६च्या गणेशोत्सवाच्या सुट्यांपूर्वी सरांनी शाळेत पालकांची बैठक बोलावली. ३५-४० पालक जमले. मोरे सर बोलायला उभे राहिले. ‘तुम्ही बाहेर कामाला का जाता?’ उत्तर माहिती असूनही त्यांनी प्रश्न विचारला. पुढं बरंच बोलत राहिले. पालक शांतपणानं ऐकत होते. मितभाषी, मवाळ असलेल्या सरांच्या बोलण्यात एरवी दिसणारी ऋजुता त्या दिवशी नव्हती. त्यांचा सूर किंचित आग्रही आणि निश्चियी होता. कुठल्यातरी ध्येयानं पछाडलेल्या सरांचा आत्मविश्वास त्या दिवशी कमाल पातळीपर्यंत पोहोचला होता. ‘तुम्ही बाहेर कामाला जाता. त्याऐवजी इथं काम मिळालं आणि तिकडं जेवढे पैसे मिळतात ते इथंच मिळाले तर?’ सरांनी कल्पना समोर ठेवली. ‘ते कसं शक्य आहे?’ पालकांनी विचारलं. ‘आपल्याकडं चांगली जमीन आहे, मुबलक पाणी आहे. सगळं असताना मालक बनायचं सोडून मजूर म्हणून बाहेर जाऊन आपल्या बायाबापे आणि मुलाबाळांच्या जीवाचे हाल का करून घ्यायचे?’ सरांनी अत्यंत भावनिक होऊन साद घातली होती. आणखीन बरंच बोलले. बरं केवळ बोलून थांबले नाहीत. शाळेतल्या प्रोजेक्टरवर पालकांना शेतीविषयक व्हिडीओज दाखविले. नानाप्रकारचे प्रश्न विचारून लोकांनी सरांना अक्षरशः भंडावून सोडलं. अभ्यासू वृत्तीच्या सरांचा ‘गृहपाठ’ एकदम पक्का होता. भरपूर चर्चा झडली, शेवटी काय ठरलं? तर बाहेर न जाता गावातच राहून शेती करायची. अनेक वर्षांच्या स्थलांतराची साखळी सरांनी तोडली होती. १७-१८ मुलांच्या पालकांना आणि शाळाबाह्य होणाऱ्या मुलांनाही गावात थांबवण्यात सरांना यश आलं होतं. हे काम सोपं नव्हतं. आता सरांची जबाबदारी कितीतरी पटींनी वाढली होती.

हिरवं स्वप्न-

आपलं शैक्षणिक काम ताकदीनं करताना सुटी आणि शाळेव्यतिरिक्तच्या वेळेत मोरे सर शेतात जायचे. बांधावरून भाषणवजा मार्गदर्शन न करता वेळप्रसंगी लोकांसोबत कामाला बिलगायचे. लोकांना नवल वाटायचं. पहिल्या वर्षी गवार, कांदा, वांगी, दुधी भोपळा, हरभरा, कलिंगड, काकडी, भेंडी इ. पिकांची लागवड केली. याच्याही काही गमतीजमती आहेत. भाजीपाल्याचं उत्पादन लोकांना नवीन होतं. त्यासाठी मशागत कशी करायची, ते माहिती नव्हतं. गादीवाफे तयार करण्यापासून सुरवात होती. लोकांनी खुरपं बघितलेलं नव्हतं. बीडवरून ३६ खुरपे बनवून घेतले. १८ कुटुंबांना दिले. दिवाळीच्या दिवसांत मोरे सरांनी मुद्दाम आईला बोलावून खुरपायचं प्रशिक्षण दिलं. पिकांमधून जसजसे पैसे मिळू लागले, तसतसा आत्मविश्वासही दुणावत गेला. बाहेरगावी मजुरीला जावून मिळत त्यापेक्षा जास्त पैसे प्रत्येक शेतकऱ्याला गावात, घरात राहून मिळाले. मुलांचं शिक्षणही सुरू राहिलं. या आव्हानात्मक परिस्थितीमधून मार्ग काढत मोठं यश मिळालं होतं. सरांनी बघितलेलं ‘हिरवं स्वप्न’ आकार घेत होतं. हे सगळं सहज सिनेमाच्या पडद्यावर दिसतं तितकं सहजसोपं नव्हतं. यामागं सर्वांची अहोरात्र मेहनत होती. दुसऱ्या वर्षी जास्त तयारीनं नियोजन केलं. दहा-पंधरा फुट खोल खड्डे खणले की पाणी लागतं. शास्रीय आणि आधुनिक तंत्र वापरून उत्पन्न जास्त घेतलं. सदैव कामात दंग असलेल्या मोरे सरांचं हे मुलखावेगळं काम बघून आश्चर्यचकित झालेले अक्षरधारा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते मदतीला आले. दिवसागणिक हुरूप वाढत गेला. सुरवातीला केवळ खेमारपाड्यापुरतं मर्यादित असलेलं काम हळूहळू विस्तारू लागलंय. २०१९साली मुसळपाडा, फणशीपाडा, ठाकरपाडा, खडकीपाडा हे पाडे जोडले गेले.

कांदा पीक घेण्याचा निर्णय-

काजू बीच्या मोबदल्यात आदिवासी कांदा किंवा बटाटा घेत. व्यापारी करत असलेली ही लूट सरांच्या नजरेला खटकायची. कांद्याला स्थानिक बाजारात असलेली मागणी लक्षात घेऊन कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घ्यायचं ठरवलं. पालघरमधे बियाणं १९०० रुपये किलो होतं. सरांनी १५०० रुपयांत बीडवरून बियाणं मागवलं. वीज पोहोचलेली नसल्यानं विहिरींवर मोटारी बसवलेल्या नाहीत. ठिकठिकाणी रोप टाकल्यास मशागतीपासून इंजीन-पाइप भाड्यानं घेऊन पाणी देणं कठीण होणार, हे धोके लक्षात घेऊन सरांनी नामी शक्कल लढवली. किरण घला यांच्या मालकीच्या ३० गुंठे निचऱ्याच्या शेतात सगळ्यांचं रोप एकत्र टाकलं. खटपट करून ‘अक्षरधारा’कडून इलेक्ट्रिक मोटार खरेदी केली. एकत्र येऊन मशागत करताना लोक गटशेतीचा मजेशीर अनुभव घेत होते. कांद्याची रोपं जोमानं वाढत असताना अचानक वादळ आलं. विजेचे खांब कोसळले, तारा तुटल्या. वीज गायब. रोपं सुकू लागलं. कांदा शेतीचा पहिलाच प्रयोग अपयशी होण्याच्या भीतीनं सरांची काळजी वाढली. चूळ घालून रोप जगवावं लागणार असं वाटत होतं. आठेक दिवसांनी एके दिवशी रात्री वीज आली. कोण कुठंय याचा तपास न करता मोरे सरांनी तडक शेत गाठलं. मोटार चालू करून पाणी देणं सुरू केलं. उशीर होऊनही नवरा घरी आला नाही म्हणून पत्नी स्वाती काही घरी जाऊन चौकशी करत होती. काही तरुण शेतात जाऊन बघतात तर सर एकटे रोपाला पाणी देत होते. तरुण तिकडं थांबले. रात्री दोन-अडीच वाजता येऊन सरांनी घरी येऊन जेवण केलं. विषारी सापांची, हिंस्र श्वापदांची केवढी भीती असते. बायको काळजीत होती खरी; सदा कामात बुडालेल्या नवऱ्याशी लग्न केलं होतं. भांडण्यात मतलब नव्हता.

कांदा लागवड केली. शेणखत-लेंडीखत वापरलं. रासायनिक खतं-औषधं वापरली नाहीत. दोघांच्या शेतात गरज होती म्हणून औषधं फवारली. खर्च कमी ठेवत जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल असं बघितलं. यंदा १७ शेतकऱ्यांनी मिळून कांद्याचं ३५ टन इतकं विक्रमी उत्पन्न काढलं. टाळेबंदी असल्यानं स्थानिक बाजारात, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ठाणे-कल्याणमधे आणि मोरे सरांनी समाजमाध्यमांत जाहिरात केल्यामुळे परिसरातल्या शिक्षकांनी सेंद्रीय कांदे खरेदी केले. उत्पादन आणि भाव चांगला मिळाल्यामुळं पालक शेतकरी आणि शेतीचे व मुलांचे शिक्षक मोरे सर आनंदात आहेत. याशिवाय भाजीपाला, हरभरा, कलिंगडे विकून चांगली आमदनी झाली. यंदा सगळे मिळून सात ते आठ लाख रुपये मिळाल्याचा मोरे सरांचा अंदाज आहे. ३० ते ४० हजार रुपये एका कुटुंबाला मिळाले. सहा महिने गावाबाहेर कामाला जाऊन हे लोक जेमतेम ८ ते १२ हजार रुपये गाठीला बांधून आणत.

कामाचा विस्तार-

शेती करताना अक्षरधारा आणि सुहृदय फाउंडेशन यांच्यासह आई, भाऊ यांची मदत होते असल्याचं बाबू मोरे सांगतात. घरी बसण्याऐवजी पत्नी स्वाती आता अनेकदा लहान मुलाला घेऊन दिवसभर शेतात करमवतेय. हा बदल लक्षणीय आहे. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक-अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचं विशेष कौतुक असतं. बरं या माणसाकडं सांगण्यासारखं खूप काही आहे. सांगता सांगता ‘काय सांगू आणि काय नको’ असं त्यांना होऊन जातं. त्यांच्या मनात अनेक योजना आहेत. माती परीक्षण करायचं आहे. तांदळाची मागणी नोंदवून घेऊन भाताची शेती आधुनिक तंत्राने करायची आहे. हळद, मिरची, बटाटा, कांदा, अद्रक याला मागणी आहे. शिवाय तेलबियांची लागवड करून नफ्याची शेती करायचीय. मुंबई जवळ असल्यानं मोगऱ्यासह फुलांना असलेली मागणी लक्षात घेऊन काही गोष्टी डोक्यात आहेत. कोंबड्यांना असलेली मागणी लक्षात घेता पोल्ट्री फार्म्ससह शेतीवर आधारित लहानसहान प्रक्रिया उद्योग सुरू करता येतील का, यावर विचारमंथन सुरू आहे. काही तरुणांना वीटभट्टी सुरू करायचं मार्गदर्शन सुरू आहे. डिझेल इंजिन-पाइप यांचं भाडं परवडत नाहीये. इलेक्ट्रीकल/सोलर मोटारी घ्यायच्या आहेत. नांगरटीसह मशागतीच्या कामांसाठी होणारा ट्रॅक्टरचा खर्च परवडत नसल्यानं गटाच्या मालकीचा ट्रॅक्टर खरेदी करायचाय. शेतीतले प्रयोग पंचक्रोशीत पोहोचलेत. नवीन लोक जोडले जात आहेत. कामाचा विस्तार होतो आहे.

नवी पहाट-

टाळेबंदीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या हालापेष्टा आपण बघितल्या आहेत. स्थलांतरीत मजूर उपाशीपोटी शेकडो मैलांची वाट चालत होते, तेव्हा विक्रमगडमधले कधी काळी स्थलांतरीत होणारे मजूर स्वत:च्या शेतीत मालक म्हणून कार्यमग्न होते. स्थलांतर थांबवून स्थानिकांचं आत्मभान जागं करत त्यांना कार्यप्रवण ठेवायचं अतुलनीय काम मोरे सर करताय. २०१७ च्या पालक बैठकीत मोरे सर शेती करण्याविषयी बोलत होते तेव्हा ही शेती एके दिवशी आपलं उदासवाणं, भकास, रखरखीत आयुष्य हिरवंगार करीन असं कोणाला वाटलं असेल? मोरे सरांच्या कल्पनेतून शेती फुलेल, आदिवासी शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी पहाट उगवेल, हे तेव्हा कोणाच्या ध्यानीमनी असेल? पालकांच्या भुकेचा प्रश्न सुटल्यामुळं मुलं शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहिली हा बोनस आहे. शाळेतील जीवनात साक्षरतेचं शिक्षण होतं, पण जीवनाच्या शाळेत जीवन जगण्याचं शिक्षण होतं. औपचारिक शिक्षणाचे धडे गिरवताना शेतात हाताजोगती कामं करणाऱ्या, शाळेची परसबाग फुलवणाऱ्या मुलांनीही जीवनाभिमुख असलेलं हे सहज शिक्षण अंगी बाणवलं असणार!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2602336266682841&id=100007194785279

सतत नवनिर्मितीचे डोहाळे लागलेले देखणे हात बाबू मोरेंना लाभलेत. भान ठेवून नियोजन आणि बेभान होऊन वेड्यासारखं काम करणं कठीण असतं. विशिष्ट ध्येयानं झपाटलेल्या बाबू मोरेंसारखी माणसं दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आणि जिद्दीच्या बळावर हे शक्य करून दाखवू शकतात! जी ‘वेडी माणसं’ इतिहास निर्माण करतात, त्यातले एक आहेत बाबू मोरे. नयी तालीमच्या माध्यमातून गांधीजींनी बघितलेल्या स्वप्नाचं काय झालं, याचं चित्र आपल्यासमोर आहे. हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात महात्मा फुलेंनी शेती विषय सक्तीचा करायची केलेली मागणी आजही दुर्लक्षित आहे. आपल्या शेतीप्रधान देशात शारीरिक श्रम मारून पुस्तकी ज्ञान वाढविण्यात आल्याचे परिणाम आपण समाज म्हणून भोगतो आहोत. या पृष्ठभूमीवर शेती आणि शिक्षणाची वेगळ्या अर्थानं सांगड घालून बाबू मोरे करत असलेलं काम अत्यंत आश्वासक वाटतं. हे काम माळावरची आरोळी ठरू नये, तर मुख्य धारेतल्या शिक्षणप्रवाहानं त्यापासून योग्य तो बोध घ्यावा!
– भाऊसाहेब चासकर, प्रयोगशील शिक्षक

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.