| IPL | नव्या २ टीम सह असा असू शकतो आयपीएलचा नवा फॉरमॅट..!

| मुंबई | बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आयपीएलच्या दोन टीम वाढवण्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं वृत्त आहे. 24 डिसेंबरला मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे. दोन टीम वाढल्यानंतर आयपीएलच्या एकूण टीमची संख्या 10 होणार आहे.

2011 सालीही आयपीएलच्या 10 टीम खेळल्या होत्या, यानंतर पुढच्या दोन मोसमांमध्ये 9 टीमची आयपीएल स्पर्धा खेळवण्यात आली होती. पण 2014 पासून पुन्हा एकदा आयपीएल 8 टीममध्ये खेळवण्यात यायला सुरुवात झाली. आता 2021 मध्ये चाहत्यांना पुन्हा 10 टीम बघायला मिळू शकतात.

सुरुवातीला पुढच्या मोसमासाठी एकाच टीमचा समावेश होईल, तसंच 2022 साली आणखी एक टीम वाढवली जाईल, असं बोललं जात होतं. पण सध्याच्या टीम फ्रॅन्चायजींनी याला विरोध केला. दोन वर्षात दोन टीम वाढवल्या असत्या तर टीमना दोनवेळा मोठ्या लिलावाला तोंड द्यावं लागलं असतं, त्यामुळे फ्रॅन्चायजींनी याला विरोध केल्याचं बोललं जात आहे. म्हणून बीसीसीआय एकाच वर्षात दोन टीम वाढवण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे.

कसा असणार आयपीएल फॉरमॅट?

सध्याच्या आयपीएलमध्ये सगळ्या 8 टीम राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात, त्यामुळे प्रत्येक टीमच्या 14 मॅच होतात. या 14 मॅच झाल्यानंतर टॉप-4 टीम प्ले ऑफमध्ये पोहोचतात. याच फॉरमॅटनुसार जर पुढची आयपीएल खेळवली गेली, तर प्रत्येक टीम 18 मॅच खेळेल, त्यामुळे आयपीएलचे दिवसही वाढतील. सध्याच्या क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकात आयपीएलसाठी एवढा जास्त काळ आंतरराष्ट्रीय खेळाडू उपलब्ध असणं कठीण आहे, त्यामुळे आयपीएल फॉरमॅट बदलला जाण्याची शक्यता आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 2011 साली वापरण्यात आलेला आयपीएल फॉरमॅट पुढच्या वर्षीही वापरला जाईल. त्यामुळे पुढच्या वर्षी 10 टीम दोन ग्रुपमध्ये विभागल्या जातील. एका ग्रुपमधल्या 5 टीम एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने (घरच्या मैदानात आणि प्रतिस्पर्धी टीमच्या मैदानात) खेळतील, तर दुसऱ्या ग्रुपमधल्या टीमशी एकच सामना खेळतील. दोन ग्रुपमधल्या टीम ठरवण्यासाठी याआधी लॉटरीचा वापर करण्यात आला होता. हा फॉरमॅट गोंधळात टाकणारा असला, तरी त्यामुळे स्पर्धेचा बराच वेळ वाचला होता.

आयपीएलच्या नव्या टीमबद्दल माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार अहमदाबादचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. अहमदाबादसह लखनऊ आणि पुणे या शहरांची नावं देखील चर्चेत आहेत. अडानी ग्रुप आणि संजीव गोयंका यांची RPSG ग्रुप या दोन टीम विकत घेण्यासाठी आघाडीवर आहेत. याआधी गोयंका दोन वर्षांसाठी पुण्याच्या टीमचे मालक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *