पुणे , पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा लॉक डाऊन, सोमवारपासून कडक निर्बंध लागू होणार..!

| पुणे / रोहन बापट | पुणे शहर आणि परिसरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पुणे शहरासह पिंपरी – चिंचवडमध्येही पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. येत्या सोमवारपासून या दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालला आहे. एकट्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यात बुधवारी १६१८ कोरोना रुग्ण वाढले होते तर गुरुवारी ही संख्या वाढून १८०३ वर पोहोचली. यामध्ये पुणे शहर १०३२, पिंपरी चिंचवड ५७३, पुणे ग्रामीण १३७ अशी रुग्णांची संख्या आहे.

पुणे सरासरी वाढ तेवढीच राहिल्याचं दिसत आहे, मात्र पिंपरी चिंचवड रुग्णांची संख्या तीनशेवरून पाचशेवर गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सरासरी वाढ पन्नासवरून दीडशेच्या जवळपास पोहोचली आहे, म्हणूनच शहरालगतची गावं पुन्हा सीलबंद केली आहेत.

दरम्यान, कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने शहरालगत हिंजवडी आणि मांजरी परिसरात कालपासूनच ८ दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत.९ जुलै ते १६ जुलै दरम्यान केवळ दूध, मेडिकल आणि दवाखाने सुरू असतील. तसंच या भागातील आयटी कंपन्यांना मात्र सूट देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *