मुंबईत अतिदक्षता विभागात अधिकचे ५०० बेड लवकरच उपलब्ध होणार..!

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के आहे. मुंबईतील धारावी भागातून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या हळू हळू कमी होत आहे, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना सेव्हन हिल, सेंट जॉर्ज येथे आठवडभरात सुमारे ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने कंटेनमेंट झोनसाठी जे निकष केले आहेत त्यात बदल करण्याबाबतची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.

कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस त्या भागातील व्यवहार बंद ठेवले जातात. हा बंद काटेकोरपणे पाळला जावा, यासाठी पोलीस तैनात केले जातात. त्यामुळे राज्यातील पोलीस मोठ्या संख्येने अशा कंटेनमेंट झोनच्या ड्युटीवर आहेत. त्यांना आराम मिळावा, हा पोलिस फोर्स अन्यत्र वापरता यावा,  यासाठी २८ दिवसांच्या निकषाऐवजी १४ दिवस कंटेनमेंट झोनमध्ये व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा. त्यावर केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना पाठविण्यात याव्या, अशी मागणी टोपे यांनी केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *