नवीन प्रयोग : मराठीतील पहिले ऑनलाईन नाटक मोगरा..!

| पुणे | हरहुन्नरी कलाकार हृषिकेश जोशी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मराठीतील पहिले वाहिले नाटक म्हणजे इंटरनेटवरील लाईव्ह नाटक मोगराचा रविवारी १२ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग होत आहे. तेजस रानडे यांनी लिहिलेल्या या नाटकात आघाडीची नाटय़, चित्रपट कलाकार स्पृहा जोशीसुद्धा असणार आहे. या नाटकाचा टीझर नुकताच रिलीज केला गेला. लॉकडाऊनच्या या काळात अशाप्रकारे इंटरनेटवरून सादर होणाऱ्या या नाटकाबद्दल मराठी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

हे नाटक नेमके कोणते, त्याचा दिग्दर्शक कोण, त्यातील कलाकार कोण, प्रेक्षकांनी ते नेमके कसे पाहायचे, लॉकडाऊनच्या या काळात सर्व चित्रपट-नाट्यगृहे बंद असताना सरकारकडून प्रयोगांना परवानगी कशी मिळाली, या आणि अशा अनेक प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात मराठी रंगभूमीने अनेक आव्हाने पेलली, उलथवून लावली आणि ती नव्या उभारीने समर्थपणे उभी राहिली. निरनिराळे प्रयोग करत आणि बदल घडवून आणत रंगभूमीने आणि रंगकर्मींनी मराठी नाटक जिवंत ठेवले. मोगराच्या माध्यमातून तोच अध्याय पुन्हा एकदा गिरविला जाणार आहे. मायबाप प्रेक्षक मराठी रंगभूमीने पेललेल्या प्रत्येक आव्हानाच्यावेळी खंबीरपणे नाटकाच्या मागे उभे राहिले आहेत. यावेळीही ते या प्रयोगाच्या मागे उभे राहतील, याची पूर्ण खात्री ठेवत हा अनोखा प्रयोग सादर होणार आहे असे हृषिकेश जोशी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *