आज नव्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा शपथविधी..!
दिपांकर दत्ता नवे न्यायमूर्ती..!| मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झालेले कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायाधीश दिपांकर दत्ता यांचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी मुंबईत राजभवनामध्ये पार पडणार आहे. या समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांना शपथ देतील. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहतील.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कामकाज पाहणारे विद्यमान न्यायाधीश भूषण धर्माधिकारी हे २७ एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर या रिक्त पदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाकडून दत्ता यांच्या नावाची १९ एप्रिलला शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

न्यायाधीश भूषण धर्माधिकारी हे निवृत्त होणार..!

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कामकाज पाहणारे न्यायाधीश भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी निवृत्त झाले आहेत. मूळचे नागपूरचे असलेले धर्माधिकारी कडक शिस्तीचे आणि झटपट निर्णय देणारे न्यायमूर्ती म्हणून त्यांची ओळख होती. मुंबई उच्च न्यायालयातील आपल्या कारकीर्दीत शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनी कायद्यातील तरतुदीला दिलेलं आव्हान, राठी प्रकरण, एनजीओ मर्डर केस, अँग्नेलो वल्दारिसचा कोठडी मृत्यू यांसारखी प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत. त्याचबरोबर काही प्रकरणांत फाशीची शिक्षा झालेल्यांना पुराव्याअभावी त्यांनी निर्दोषही मुक्त केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर धर्माधिकारी यांच्या कारकीर्दीत प्रथमच उच्च न्यायालयात डिजिटल माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत सुनावणी पार पडल्या.

कोण आहेत न्यायाधीश दीपांकर दत्ता?

न्यायाधीश दीपांकर दत्ता गेल्या १४ वर्षांपासून कोलकाता उच्च न्यायालयात कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून न्यायदानाचे काम करत आहेत. १९८९ मध्ये एलएलबीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरुवात केली. कोलकाता उच्च न्यायालयात त्यांनी अनेक वर्षे वकिली केली. सर्वोच्च न्यायालय आणि अन्य राज्यांतील न्यायालयांतही त्यांनी राज्यघटना आणि कायद्यांच्या महत्त्वाच्या प्रकरणांत युक्तिवाद मांडले. त्यांनी केंद्र व राज्य सरकारसाठीही काही वर्षे सरकारी वकील म्हणून काम केले आहे. कोलकाता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधी कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. २२ जून २००६ पासून ते कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवेत आहेत. दीपांकर दत्ता हे कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी  न्यायाधीश सलीलकुमार दत्ता यांचे ते चिरंजीव, तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अमिताव रॉय यांचे मेहुणे आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published.