पारनेरचे नगरसेवक पुन्हा शिवसेनेत, मिलिंद नार्वेकर यांची मध्यस्थी यशस्वी..!

| मुंबई | शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पारनेर नगरपालिकेचे पाचही नगरसेवक आज मातोश्रीवर शिवबंधन बांधून पुन्हा स्वगृही परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. सर्व नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचं बोललं जात आहे. मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाचही नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी जवळपास २० मिनिटं चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला होता.

पारनेर नगरपंचायतीमधील पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ४ जुलै रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. बारामतीत पार पडलेल्या कार्यक्रमात नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तणाव निर्माण झाल्याची चर्चा होती.

पाण्याच्या प्रश्नावर ठोस आश्वासन मिळाले असल्याने आणि वरिष्ठांनी विनंती केल्याने सर्व नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. या वेळी मातोश्रीवर आमदार निलेश लंके देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *