व्यक्तिवेध : आमदार अमोल मिटकरी

अमोल मिटकरी..राष्ट्रवादीचे आमदार होणार..पण राष्ट्रावादीत काय इतर पक्षात देखील त्यांचं नाव गेल्या वर्षभरापर्यंत फारसं काय कुणाला माहितीही नव्हतं. एक व्याख्याते ते आमदार व्हाया स्टार प्रचारक असा मिटकरी यांचा प्रवास एखादा स्वप्नवत असा आहे. आमदार बनण्यासाठी अनेकांना हायकमांडकडे लॉबिंग करण्यापासून ते वरिष्ठांची मनधरणी करण्यापर्यंत झिजावं लागतं. पण मिटकरी यांच्या नशिबात अवघ्या वर्षभरात चालत आमदारकी आली. त्याला कारण ठरली त्यांची वकृत्वशैली.  एकीकडे मोदी यांचा करिष्मा सुरु असताना राष्ट्रवादीत फर्डे नेते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होते. त्याची कसर मिटकरी यांनी भरुन काढली आणि त्याचीच बक्षिसी म्हणजे त्यांना विधानपरिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली. मिटकरी यांच्या आमदारकीचा प्रवास अवघ्या एका वर्षात झालाय हे कुणाला सांगितलं तरी विश्वास बसणार नाही अशी परिस्थिती आहे..! 

तर अकोला जिल्ह्यातील अमरावती जिल्हा सीमेलगत असलेले खारपाणपट्ट्याचे गाव कुटासा. राज्यभरात आपल्या वक्तृत्वशैलीची छाप पाडणाऱ्या अमोल मिटकरी यांचे हे गाव. त्यांच्या परिवारावर कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मोठा प्रभाव. जेमतेम दोन एकर शेती सांभाळून किराणा दुकान चालविणाऱ्या त्यांच्या वडीलांनी समाजसेवेची ज्योत त्यांच्यात जागती ठेवली असल्याने प्रबोधनासह पुरोगामी विचारांच्या प्रचार प्रसाराचे काम ते मोठ्या जोमाने करीत आहेत. विचार व्यक्त करण्याची शक्ती निसर्गाने सर्वांनाच दिलेली आहे. मात्र, त्याचा प्रभावी वापर करून कुटासासारख्या छोट्याशा गावातून थेट देशपातळीवरील आघाडीचा वक्ता होण्याची ख्याती अमोल मिटकरी यांनी प्राप्त केली आहे.

राष्ट्रसंतांच्या भजनांची आवड आणि विचारांचा प्रभाव असणाऱ्या अमोल मिटकरी यांनी लहानपणापासून गुरुदेव भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार गावागावात पोहचविण्याचे काम केले. आपल्या वक्तृत्व कलेची साधना आणि उपासनेतून त्यांनी श्रोत्यांवर लहानपणापासूनच प्रभाव पाडला. त्यांनी राज्यघटनेचा सखोल अभ्यास केला. राज्यघटनेतील बारकावे अभ्यासताना महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही त्यांनी जाणून घेतले. गणेशोत्सव, दुर्गोत्सव किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो आपले विचार मांडण्याची त्यांना प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे सातत्याने संधी मिळत गेली. सर्वप्रश्नांची उत्तरे राज्यघटनेत असल्याचे ठाम मत ते आपल्या सभांमधून वारंवार व्यक्त करतात.

कोठे सुरू झाली भाषणांची सुरुवात?
१२ जानेवारी २०१२ ला मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे ऐनवेळी केलेले त्यांचे भाषण गाजले. तेथेच त्यांना नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे एका सभेत बोलण्यासाठी पाचारण करण्यात आले. सावरकरांचे जन्मगाव असेल्या भगूर येथे केलेल्या परखड भाषणातून प्रतिगाम्यांचा त्यांनी समाचार घेतला. विचारपीठवरून उतरतानाच श्रोत्यांनी अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतले होते.  अमोल मिटकरी यांनी समाजातील अनिष्ट चालीरिती यासह सामाजिक भेदावर कडाडून प्रहार केला. भांडारकर प्रकरण असो की, वाघ्या कुत्र्याचे प्रकरण त्यांनी प्रत्येकवेळी आपली भूमिका स्पष्ट करीत अग्रेसर राहीले. बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचाही त्यांनी विरोध केला होता. भीमा कोरेगाव प्रश्नाबाबत जातीय तणाव निर्माण झाला असताना खेड्यापाड्यापर्यंत जाऊन लोकांना आपला प्रेरणादायी इतिहास सांगत देशात शांतता व सर्व धर्म समान नांदावा यादृष्टीने केलेले त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. 

अजित दादांची पहिली भेट..
तारीख १६ मे २०१९..अजित पवार आणि मिटकरी यांची पहिली भेट झाली ती धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर. या भेटीसाठी जेवढी खटपट अजित पवारांना भेटण्यासाठी लागते तेवढी खटपट मिटकरी यांनी केली. अनेकदा पीएला फोन, मेसेज..अखेर अजित दादांनी भेटीला बोलावलं..मुंबईत भेटायचं तर कोणी ओळखीचं नाही..मग मिटकरी यांनी सीएसएमटी स्टेशन गाठल्यावर शेजारी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतालयात आंघोळ उरकून घेतली..तिथून बी ५ बंगल्यावर धनंजय मुंडे यांचा बंगला असल्याचं माहिती झाल्यावर तिथं गेलो..अजित दादांची पहिलीच भेट..सर्वसाधारण व्हिजीटरसारखे अजित पवार त्यांना भेटले..पक्षासाठी काम करायची इच्छा व्यक्त केली..अजितदादांनी ऐकून जायला सांगतिलं..नंतर चर्चेअंती राज्य पातळीवर एक पद दिलं गेलं..पण पक्षातल्या पदाबरोबर आपल्या वकृत्वाचा वापर पक्ष कधी करणार असा प्रश्न मिटकरी यांना पडला होता.

अजित पवारांनी दिली संधी:
जातीय ताण कमी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नातून बारामती येथे शारदा व्याख्यानमालेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वक्तृत्वशैलीचे कौतुक करीत सोबत काम करण्याची संधी दिली. प्रभावी वक्तृत्वशैलीचा वापर करून कुटासासारख्या छोट्याशा गावातून थेट देशपातळीवरील आघाडीचा वक्ता होण्याची ख्याती अमोल मिटकरी यांनी प्राप्त केली आहे.

वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र:
१ ऑगस्ट २०१७ पासून अकोला शहरात अमोल मिटकरी यांनी विशाल बोरे, जीवन गावंडे यांच्यासोबत प्रत्येकाला ओजस्वी भाषण कला शिकता यावी व आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून व्यक्त करावे या उद्देशाने कॉग्निझंट म्हणजेच जाणीव असलेला वक्ता या नावाने वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. ज्या माध्यमातून जिल्हा व राज्यातील अनेक विद्यार्थी व नागरिकांनी वक्तृत्व कला शिकवून समाजात प्रेरणादायी विचार करण्याचे काम सुरू केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीत मिटकरी आपली वकृत्वशैली दाखवण्यासाठी संधी शोधत होते. पण नेत्यांच्या भाऊगर्दीत ती संधी कोण देणार. अखेर ती संधी मिळाली शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं शिवस्वराज्य यात्रा काढली. शिवनेरीवरुन सुरु झालेल्या यात्रेवेळी अमोल मिटकरीचं नाव कुणालाही माहित नव्हतं..पण या यात्रेची सांगता झाली तेव्हा मिटकरी यांच्या भाषणांची मागणी राष्ट्रवादीचेच उमेदवार करत होते. वाशिममध्ये यात्रा आली असताना अवघ्या १० मिनिटे भाषण करायची संधी मिळाली आणि त्याचं सोनं करत मिटकरी यांनी मोठा पल्ला गाठला. आतापर्यंत व्याख्यान देऊन कुटुंब चालवणारे मिटकरी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक झाले.. अर्थात शरद पवारांच्या मंजुरीशिवाय हे शक्य नव्हतं.

विरोधी पक्षावर आक्रमक आणि मुद्देसूद भाषणानं मिटकरी यांची पक्षात मागणी वाढत चालली. मग नेहमी गाडीनं प्रवास करणाऱ्या मिटकरींच्या दिमतीला पक्षाने हेलिकॉप्टर दिलं..वकृत्वाच्या जीवावर पहिल्यांदाच हवाई प्रवासाचं स्वप्नही मिटकरींनी प्रत्यक्षात उतरवलं. थोड्या नाही तर तब्बल ६५ सभा विधानसभा निवणुकीच्या निमित्तानं त्यांनी घेतल्या.  पुरोगामी आणि शिवरायांचा विचार पुढं घेऊन जाणारे मिटकरी यांचा अवघ्या एक वर्षातला प्रवास राजकीय क्षेत्रातल्या बजबजपुरीत वेगळा दिसून येतो..एक साधा कार्यकर्ता ते थेट आमदार असं सध्याच्या राजकारणात होणं तसं दुर्मिळच..पण नशिबाची साथ आणि वकृत्वाच्या वरदानानं मिटकरी ते करुन दाखवलंय. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *