नवी मुंबईत १००१% सत्ता परिवर्तन होणार , ही काळ्या दगडावरची रेघ आहे – सुप्रिया सुळे

| नवी मुंबई |आगामी नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तुन होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. “ठाम शरद पवार यांना राजकारणात 55 वर्षे झाली. त्यातली 25 वर्ष सत्तेत गेली, तर 25 वर्ष विरोधात गेली. या 55 वर्षात महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांना कधी अंतर दिलं नाही. ही गोष्ट राष्ट्रवादी पक्षातील सर्वांनी कुटुंब म्हणून लक्षात ठेवली पाहिजे. सत्ता येते आणि जाते, सत्ता ही सेवा करण्यासाठी असते, ती पदासाठी नसते, ना लालदिव्यासाठी असते हे लक्षात ठेवा,” असंही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज (19 फेब्रुवारी) नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केलं. दरम्यान या मेळाव्यात नवी मुंबईत सत्ता परिवर्तन 1 हजार 1 टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असंही मत खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.

राष्ट्रवादीकडून केलेलं इनकमिंग नडल्याची कबुली दिल्याचा किस्सा :

दरम्यान, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना साताऱ्याच्या सभेचा फोटो लक्षात ठेवा हे सांगताना पुढचा महापौर हा महाविकास आघाडीचाच होईल, असा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. भाजपच्या एका बड्या नेत्याने महाराष्ट्रात आमचा ओव्हर कॉन्फिडन्स शिवाय राष्ट्रवादीकडून केलेलं इनकमिंग नडल्याची कबुली दिल्याचा किस्सा खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितला.

“गणेश नाईक पक्षात असताना त्यांचा पक्षात कसा सन्मान होत होता हे सांगताना ब्लँक पेपरवर सही होऊन नवी मुंबईत उमेदवारांची नावं टाकली जात होती. नाईकांच्या घरात अन्न खाल्लं आहे. त्यामुळे अन्नाशी गद्दारी कधीच नाही. ते कसेही वागले तरी,” असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं.

‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस म्हणाले होते शरद पवारांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केलं होतं. मात्र महाराष्ट्राने शरद पवारांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’. शरद पवार म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत तर रिटायर्ड होतो, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तसं नाही.”

शिवाय नवी मुंबईकरांच्या मनात ‘त्या’ घोड्याची फिल्म छान झालीय. त्यामुळे ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ म्हणून आपल्याला पिक्चर बघायचा आहे असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं.

“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”

“पक्षात दीड वर्षांपूर्वी कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही अशी परिस्थिती होती. रोज उठून आज कोण पक्षातून गेला याची चिंता असायची आणि कोण पक्ष सोडून गेला नाही की बरं वाटायचं. 52 लोक शरद पवारांना सोडून गेले होते. त्यातील एकही आमदार म्हणून निवडून आला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं ते 2019 मध्ये भाजपचं झालं. त्यातून सेना वाचली. त्यांच्या पटकन लक्षात आलं. ‘दाल मे काला है इधरसे निकलो’. उध्दव ठाकरेंनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्यातूनच महाविकास आघाडीची स्थापना झाली. केंद्र सरकार सव्वा वर्षात कुठलीही टीका करु शकले नाही कारण ते जेव्हा खाली बोलतात तेव्हा त्यांना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी महाराष्ट्रात उत्तर देते. त्यामुळे प्रत्येक जण महाविकास आघाडीचे मॉडेल देशात यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करतोय.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *