फक्त त्यांना नव्या बंदुका पाहिजे…!

मागचं अख्खं वर्ष कोरोनानं पार चोळामोळा करून, चुरगळून फेकून दिलं. सारे धर्म, एकेक देव, बाबा, पुजारी.. सारं सारं काही काळासाठी का होईना, पण आरपार भंगारात गेलं होतं. मात्र कचऱ्यातूनही धंदा शोधणारे हुशार लोक काही कमी नाहीत.

कचऱ्यातून कला निर्माण करणं, ही नक्कीच चांगलीच गोष्ट आहे. पण मोठ्या प्रयासानं, पिढ्या पिढ्यांच्या त्यागातून, समर्पणातून आकारास आलेल्या एखाद्या शिल्पाचं रूपांतरच जर कुणी भंगारात करायला निघालं असेल तर ?

आपल्या देशाची सद्याची अवस्था ह्यापेक्षा काही वेगळी नाही. एक एक मोठी, सर्वसमावेशक बाग उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे. विध्वंस हाच ज्यांना आनंदाचा सोहळा वाटतो, अशी मानसिकता आता मोकाट सुटली आहे. शिरजोर झाली आहे.

संसद कोमात आहे. मीडिया मुका आहे. न्यायव्यवस्था खिडकीत बसली आहे. लोकशाही वाऱ्यावर पडली आहे. फक्त एक शेतकरी तेवढा जमिनीत पाय घट्ट रोवून लढतांना दिसतो आहे.

ही प्रलयाची घडी आहे. स्वातंत्र्यापूर्वी असंख्य तुकड्यात विखुरलेला हा देश मोठ्या कष्टानं जोडून आजचा डौलदार नकाशा तयार झाला. त्या नकाशाला जीवघेणे ओरखडे पाडण्याचं पाप काही टोळ्यांनी पद्धतशीरपणे सुरू केलं आहे. दुर्दैवानं त्यांच्या टोळीत सामील होणारांचीही मोठी रांग लागलेली आहे. आपण काय बोलत आहोत, काय करत आहोत, याचंही या लोकांना भान राहिलं नाही.

पण ह्याला कोणती एखादी टोळी जबाबदार आहे, असं नव्हे. साऱ्याच टोळ्या बागेच्या विध्वंसात सामील आहेत. कुणी कमी, कुणी जास्त एवढाच काय तो फरक !

नेहरूंच्या हातात देश मिळाला, तेव्हा ते एक उध्वस्त माळरान होतं. आधी ते ताब्यात घ्यायलाच किती पिढ्या शहीद व्हाव्या लागल्यात. त्यानंतर त्यांनी अनेकांना सोबत घेवून अगदीच परिपूर्ण नसेलही, तरी पण नक्कीच एक चांगला देश निर्माण केला. मिश्र अर्थव्यवस्था ही त्यावेळी देशाची गरज होती. काळाची गरज होती. आजही आहे. भारतासारख्या खंडप्राय आणि हजारो जाती, असंख्य धर्माचं गाठोडं असलेल्या देशाचा एक सुंदर गालीच्या निर्माण करणं हे सोपं काम नव्हतं. आताही नाही. तेवढा सुंदर गालिचा झाला नसेलही, पण नक्कीच एक सन्मानजनक, आश्वासक वस्त्र तयार झालं होतं. पण एक घुबडांचा कळप आत घुसला आणि साऱ्या देशाचा बट्ट्याबोळ करून टाकला. जगात दुर्गंधी पसरली. त्यातूनही अत्तराचा सुवास येत असल्याचा साक्षात्कार काही लोकांना होत असतो. गारुड्याचा खेळ खरा समजून नाचणारी नवी पैदास अलीकडेच भरभराटीस आली.

हा देश साध्या भोळ्या लोकांचा आहे. ‘सर्वाभूती परमेश्वर’ पाहणारी संस्कृती.. हाच या देशाचा आत्मा आहे. त्याचाच फायदा घेवून धूर्त लोकांनी धर्माचा धंदा नव्यानं सुरू केला. थापाडे, चाकुबाज, डाकू, बलात्कारी, तडीपार, खुनी, आतंकवादी या लोकांनी धर्माचा वापर सोयीनुसार केला. माणसामाणसात भांडणं लावली. दंगे घडवून आणले. तेच लोक आता राजरोस सत्तेत जाऊन बसले.

स्वार्थासाठी यांनी सोयीनुसार रंग बदलले, शब्द बदलले, नियत बदलली, निष्ठा बदलल्या. जनतेला मूर्ख बनवत राहिले. जनता मूर्ख बनत राहिली. दोष तरी कुणाला द्यायचा ?

मेघांचे फसवे वादे
हा फसवा फसवा वारा
हा पाऊस खोटा खोटा
ह्या फसव्या फसव्या धारा !
ही बंजर बंजर राने
ही पंजर पंजर पाने
मातीच्या गर्भामध्ये
पाण्याविन कुजले दाणे
सुकली धरणे, ठणठण विहिरी
अजून फोडती टाहो..
पालींच्या मुतण्याला मी
पाऊस म्हणावा का हो ?

पण पालिंच्या मुतण्यालाच श्रावण सरी समजून कविता लिहिणारेही काही कमी नाहीत. त्यांना टीआरपी देखील झकास मिळतो.

देश असो की समाज, मध्ये मध्ये असा लाजिरवाणा, किळसवाणा काळ येत असतो. गिधाडांना गरुड म्हणून डोक्यावर घेणारे कितीही नाचले, तरी शेवटी गरुड तो गरुड आणि गिधाड ते गिधाड, हेच अंतिम सत्य ! सोशल मीडियामुळे गरुड आणि गिधाड यांच्यातील फरक कळायला मोठी मदत होते. अशा चुका अमेरिकेसारख्या देशातही झाल्या, आपल्या देशातही झाल्यात. तशा त्या सर्वत्रच होत असतात. मात्र अमेरिकेनं आपली घोडचूक लगेच दुरुस्त केली. आम्हाला थोडी वाट बघावी लागेल. पण नव्या वर्षात त्याची दमदार सुरुवात झाली आहे, एवढं नक्की !

मात्र काही लोकांना अजूनही चोरांच्या हातातच बँक सुरक्षित राहील, असा विश्वास आहे. कारण चोरांच्या टोळीलाच आपण चौकीदारीचा ठेका दिला, तर चोरी करायला कुणी शिल्लकच उरणार नाहीत, असा भाबडा समज काही लोकांच्या डोक्यात फिट्ट बसून आहे. आपलं हे कारस्थान यशस्वी व्हावं यासाठी, आधी मंदिरांना आपल्या पापात भागीदारी दिली, आता न्यायालयांना सामावून घेतलं जात आहे ! त्यांनी काहीही सांगायचं आणि साऱ्या देशानं त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवायचा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्याबदल्यात ते जे काय करतील त्यालाच आपण प्रेम समजून नाचायचं एवढीच त्यांची अपेक्षा आहे. आणि ती आपण मुकाट्यानं पूर्ण करायलाच हवी. कारण त्यांचा तसा आदेश आहे.

यार शंका नको, प्रेम करतील ते..
फक्त त्यांना नव्या बंदुका पाहिजे !
‘पाहिजे तो वकील कर..’ म्हणाले मला
मात्र तो आंधळा अन् मुका पाहिजे !

चार थेंबातही मी नदी शोधतो
ती जिगर पाहिजे, त्या भुका पाहिजे !!
हे पुन्हा लागले, गाव मंबाजिचे
मात्र माझ्या सवे, तो तुका पाहिजे !

कॅलेंडर बदललं म्हणून दिवसही बदलतील असं नव्हे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मनामनात पडलेल्या भेगा विस्तरणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. प्रामुख्यानं माणूस म्हणून विचार करण्याची सवय लावावी लागेल. साऱ्याच बाजूनं भक्त संप्रदाय हल्ली जोरात वाढताना दिसतोय. तो प्रवाह थांबला पाहिजे. केवळ याला त्याला दोष दिल्यानं आपली जबाबदारी संपणार नाही. वाईटावर प्रहार करणं हे जेवढं गरजेचं आहे, त्याहीपेक्षा चांगल्याला साथ देणं, हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या पिढीला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जरी त्याग करावा लागला नसेल, तरी ते टिकविण्यासाठी मात्र त्याग करावा लागेल. अन्यथा पुन्हा देश आपल्या हातातून केव्हा निसटून जाईल, कळणार देखील नाही. तेव्हाचा शत्रू बाहेरचा होता. स्पष्ट ओळखता येत होता. आताचा शत्रू आपल्यातलाच आहे. आपल्या वस्तीत राहतो, सोबत खातो, सोबत नाचतो, गातो.. आणि हळूच संधी साधून वारही करतो. तो तेव्हाही स्वातंत्र्याच्या बाजूनं नव्हता, आताही आपल्या स्वातंत्र्याची त्याला चीड आहे.

त्यांचं काम ते करतात, आपलं काम आपण करू या ! मात्र त्यांची प्रेमाची भाषा अफलातून आहे. ती समजून घेवून आपल्यालाही तशीच तयारी करावी लागेल, हेही लक्षात घ्यायला हवं !

ज्ञानेश वाकुडकर, नागपूर ( अतिथी संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *