भाजपमध्ये गेलेल्या पिचडांना मोठा धक्का, त्यांचे खंदे सहकारी गायकर करणार राष्ट्रवादीत घरवापसी..!

| अहमदनगर | ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक सीताराम गायकर यांची उद्या घरवापसी होणार आहे. सीताराम गायकर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून सीताराम गायकर हे अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचवेळी गायकर राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत सीताराम गायकर यांचेवर शेलक्या शब्दात टीका केली होती. विधानसभा निवडणुका होऊ द्या तुमचे धोतर कसे फेडतो, अशा शब्दात अजित पवारांनी गायकर यांच्यावर टीका केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं.

नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत सीताराम गायकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमागे अजित पवार यांचीच खेळी होती. सीताराम गायकर यांनी आता भाजपमध्ये गेलेल्या पिचड यांची साथ सोडत हातावर घड्याळ बांधण्याचं ठरवलं आहे. अगस्ती ग्रामीण पतसंस्थेचे 9 आणि गायकर असे पिचडांचे दहा खंदे समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *