विशेष : भगतसिंगाची माय परवा भिक मागत होती !

लोकशाही ही जगातील सर्वात चांगली राजकीय व्यवस्था आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण त्यासाठी समाज, देश जागा असला पाहिजे. शुद्धीवर असला पाहिजे. अन्यथा लोकशाहीच्या निमित्तानं गावातल्या माकडांना हाताशी धरून गावावर कब्जा करण्याची सोय बदमाश लोकांसाठी आपोआप उपलब्ध होते.

या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नेमकं काय लिहू, हेच मला सुचत नाही. काहीही तक्रारी असल्या तरी तो स्वातंत्र्याचा दिवस आहे. आणि स्वातंत्र्य ही सर्वात मोठी गोष्ट आहे ! पण जेवढी किमती गोष्ट तिला तेवढ्याच काळजीने जपायला हवी. मात्र एकूणच आपण स्वातंत्र्याचं मोल समजून घेतांना दिसत नाही, असं दुर्दैवानं म्हणावं लागते.

स्वातंत्र्याचा साधा अर्थ
मला एवढाच कळला
देशी दगडाच्या जात्याखाली
गरीब दाणा दळला !

सध्या देशात जे काही सुरू आहे, ते अराजका पेक्षा की नाही. सुप्रीम कोर्टाचे न्यायधिश म्हणतात, की ‘आम्हाला क्रिमिनल लोक धमक्या देतात, पण सरकारी यंत्रणा संरक्षण. देण्यास टाळाटाळ करतात !’ याचा अर्थ नेमका काय होतो ? खरंच तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत का ? सुप्रीम कोर्ट जर असे हतबल असेल, तर स्वातंत्र्य कुठे आहे ? लोकशाही कुठे आहे ? सत्ता कुणाच्या इशाऱ्यावर काम करते आहे ? हा देश खरंच स्वतंत्र आहे का ?

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एका राज्यपाल महोदयाबाबत देखील न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याची बातमी आली ! ही बाब संतापजनक नाही का ? कसल्या लायकीची माणसं कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या जागेवर जाऊन बसली आहेत ? ही वैधानिक पदे आहेत की एखाद्या डॉननं वसुलीसाठी नियुक्त केलेली माणसं आहेत ? ही कुठली विकृती आहे ? खरं तर डॉन किंवा त्याची माणसं सुद्धा यांच्या तुलनेत एवढी धोकादायक नसतात. कारण ती एखाद्या कुटुंबाला, काही व्यक्तींना वेठीस धरतात. मोजक्या लोकांचे निर्दयपणे जीव घेतात. पण ही संवैधानिक पदावर बसलेली माणसं तर साऱ्या देशाला, प्रदेशाला वेठीस धरतात. लाखो, करोडोंच्या भवितव्याशी खेळतात. एवढी विकृती यांच्यामध्ये कुठून येत असेल ? यांचे मेंदू तपासणारी एकही लॅब जगाच्या पाठीवर अस्तित्वात नसेल का ?

खरं तर असल्या बांडगुळांची एवढी हिम्मत होते, याचं कारण आपण स्वतः फितूर आहोत. आपण लोकशाहीशी प्रामाणिक नाही. आपण आपल्या स्वार्थासाठी नको नको त्या लोकांना डोक्यावर घेवून नाचत आहोत. चोरांचे, डाकूंचे फोटो नेते म्हणून मिरवत आहोत. त्यांना आपले तारणहार मानत आहोत.

असंख्य शहीदांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं होतं ! ते या माकडांच्या हातात देश द्यावा म्हणून होतं का ? केवळ इंग्रजांनी या देशातून निघून जाणं, एवढाच स्वातंत्र्याचा अर्थ होता का ? बाहेरचे साप हाकलून घरातले साप मोठे करण्यासाठी आम्ही मतदान करत असतो का ? ४१ टक्के खासदार अतिशय गंभीर आरोप असलेले गुन्हेगार आहेत ! सर्वात जास्त खासदार सत्ताधारी पक्षाचेच आहेत. समजा त्यांनी गुंड, बदमाश, बलात्कारी असल्या लोकांना तिकिटं दिली असतीलही, तरी मतदान तर आपणच केलं ना ? आपली बुद्धी कुठं शेण खायला गेली होती ?

संतापही येतो, वाईटही वाटते. लोकशाहीचे असे धिंदवडे सुरू असताना आपण सारं मुकाट्यानं का सहन करतो, हा खरा प्रश्न आहे ? आपण बोलत का नाही ? आवाज उठवत का नाही ? आम्ही व्यवस्थेला शरण का जातो ? हे कसलं स्वातंत्र्य आहे ? कुणाचं स्वातंत्र्य आहे ? की सारा देश अजूनही गुलाम आहे ? की स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची आमची लायकीच नाही !

हे माझ्या प्राणप्रिय स्वातंत्र्या..!

हे माझ्या प्राणप्रिय स्वातंत्र्या..
पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसलाच
तू आमच्या देशात आलास
पण ..
आल्या आल्या कळलं नाही
कुठे गायब झालास!
वाटलं होतं..
लगेच तू आमच्याही वस्तीत येशील
थोडा थोडा प्रकाश तुझा प्रत्येकाला देशील
प्रकाशाची आरास मांडू..
तिरंगा उंचावर टांगू
तू आमच्याही वस्तीत आलास..
हे ओरडून ओरडून सांगू
पण..
कुठे काय गडबड झाली
काहीच कळले नाही
अजूनही आमच्या वस्तीतले
दिवेच जळले नाहीत !
दोस्ता..
अरे तुझी वाट पाहून थकलीत
आमची जीर्ण मोडकी दारे
अन स्वातंत्र्या..
निदान या वर्षी तरी
तू येणार आहेस कारे?

ठीक आहे..
आमच्याकडे नाही आलास
आम्ही समजून घेवू
सवयीप्रमाणे पुन्हा आणखी अर्धपोटी राहू !
पण स्वातंत्र्या..
अरे,
तुझ्याच साठी संसाराची
माती केली ज्यांनी
तोफेच्या तोंडासमोर
छाती केली ज्यांनी
तुझाच जयजयकार होता
मनी तुझा ध्यास होता
अंगामध्ये मस्ती होती..
गळ्यामध्ये फास होता !
मानेभोवती फासाची दोरी घट्ट पडत होती..
बायकापोरं केविलवाणी
टाहो फोडून रडत होती
पण..
तरीसुद्धा तुझ्याच साठी
जे ‘शहीद’ झाले सारे..
अन स्वातंत्र्या
निदान त्यांच्या घरी तू जावून आलास कारे ?

स्वातंत्र्या
माहित नाही तुझी नक्की कोण लागत होती
पण..
भगतसिंगाची माय परवा
भिक मागत होती!
तिचाही पोरगा वेडा होता तुझ्याचसाठी मेला
मरता मरता आईला अनाथ करून गेला
त्याच्याही कानात भरले होते
तुझ्याच प्रेमाचे वारे
अन स्वातंत्र्या,
निदान त्याच्या घरी तू जायला नकोस कारे ?

ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *