आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या प्रियांका राजेंद्र भोसले सेवानिवृत्त..

| कल्याण | ठाणे येथील गावदेवी ट्रस्ट कडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षिका सौ.प्रियांका राजेंद्र भोसले या ३१ जानेवारी, २०२१ रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. सन१९८८ रोजी ठाण्याच्या मनपा शाळेत रुजू झाल्यानंतर त्यांचा प्रवास मानपाडा, नौपाडा, कोपरी असा होऊन शेवटी डायघर येथून त्या सेवानिवृत्त झालेल्या असून त्या निमित्त कल्याणच्या चिंतामणी सभागृहात त्यांचा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आपल्या शिक्षकी कार्यकाळात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे यामध्ये औरंगाबाद येथील सोनल गायकवाड यांची तलाठी म्हणून नेमणूक झालेली आहे तसेच राष्ट्रीय पातळीवर कबड्डीपटू म्हणून माधुरी गवंडी यांना नावलौकिक मिळवून दिला व सामाजिक विषयावर भाष्य असणारं लिंगभेदावर आधारित नाट्यकृतीस प्रथम क्रमांकांचे बक्षीस मिळवून दिले.

मुलांचा सर्वांगीण विकास किंवा त्यांचे समाजातील आचरण, संस्कार हे फक्त आईच करते असं नाहीय, त्यामध्ये मुलांना सक्षम घडविण्यासाठी शिक्षकांचा देखील हातभार व मोलाची साथ असते असे गौरवादगार मनसे जिल्हाध्यक्षा सौ. स्वाती कदम यांनी काढले तसेच अनेक शिक्षकांनी सौ. प्रियांका भोसले यांचे तोंडभरून कौतुक केले.

या कार्यक्रमाला गटाधिकारी अस्लम कुंगले, गटप्रमुख पूजा चव्हाण, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अध्यक्ष प्राजक्त झावरे, ठाणे जिल्हा शिक्षक सेना व ठाणे मनपा प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष सुनील फापाळे, अध्यक्ष तथा संचालक ठाणे व पालघर जिल्हा प्राथ.शिक्षक पतपेढी अध्यक्ष बाबाजी फापाळे, मनसे जिल्हाध्यक्षा स्वाती कदम, गटप्रमुख राजेंद्र परदेशी, विषयतज्ञ वनिता वंजारी, वृषाली सावंत, आप्तेष्ट, प्रियजन, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *