भाजपला पश्चिम बंगाल मध्ये १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर पॉलिटिकल स्ट्रेटीजिस्ट म्हणून काम करणे सोडून देईल – प्रशांत किशोर

| कोलकत्ता | भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर पॉलीटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम सोडून देईल, असे आव्हान रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिले आहे. तृणमूल कॉँग्रेस आणि ममता बॅनर्जी राज्यात पुन्हा सत्तेवर येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले,भाजपाला शंभरपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी हे काम सोडून देईल. आयपॅक ही संस्थाही सोडून देईल आणि अगदी वेगळे काहीतरी काम करेल.

आपण मला कधीही एखाद्या पक्षासाठी स्ट्रॅटेजी ठरविताना पाहणार नाही. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत आमचा पराभव झाला होता. परंतु, तेथे आम्हाला जे करायचे होते ते करू शकलो नव्हतो. परंतु, पश्चिम बंगालमध्ये ममतादिदींनी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे जर पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला तर मी या कामाला योग्यच नाही असा अर्थ होईल.

भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये जे काही थोडेफार यश मिळेल ते केवळ तृणमूल कॉँग्रेसच्याच अंतर्गत वादामुळे मिळेल. सध्या पक्षात अंतर्गत पातळीवर काही वाद आहेत. भारतीय जनता पक्ष अशा प्रकारच्या अंतर्गत वादाचा फायदा घेण्यात माहिर आहे.

पश्चिम बंगालमध्ये अनेक नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे. याबाबत प्रशांत किशोर म्हणाले, भारतीय जनता पक्षाची ही रणनितीच आहे. ते दुसºया पक्षाच्या नेत्यांची अक्षरश: शिकार करतात. त्यांना पैशाचे, पदांचे आमिष दाखविले जाते. उमेदवारी दिली जाते. त्यामुळे तृणमूल कॉँग्रेसमधीलही अनेक नेते त्यांच्याकडे गेले आहेत.

आपल्यावरच नाराज होऊन अनेक नेत्यांनी पक्षत्याग केल्याच्या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले, मी येथे मैत्री वाढविण्यासाठी आलेले नाही. मला पक्षाला विजय मिळवून द्यायचा आहे. मी हे करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा काहींना असे वाटू शकते की त्यांना बाजुला करण्यात आले आहे. मात्र, भाकरी फिरविण्याची गरज होती. भाजपा आणि अमित शहा पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा मिळणार असल्याचे सांगत आहेत, कारण त्यातून त्यांना तृणमूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये घबराट निर्माण करायची आहे. भाजपा जिंकत असल्याची हवा निर्माण करण्याची आहे. मात्र, केवळ हवा करून आणि आवाज वाढवून आपण निवडणुका जिंकू शकत नाही हे त्यांना माहित असायला हवे, असेही प्रशांत किशोर म्हणाले. भाजपाच्या काही सभांना दोनशे-तीनशे लोकही नसतात. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी असते.

सुवेंदू अधिकारी यांच्या भाजप प्रवेशाबाबत ते म्हणाले, अधिकारी यांचे महत्व उगाचच वाढवून ठेवण्यात आले होते. नंदीग्राम आंदोलनाचे हिरो म्हणून त्यांना पुढे आणले गेले. जणू काही ममता दिदी नाही तर त्यांनीच नंदीग्रामचा लढा दिला. आता ममता बॅनर्जी नंदीग्राममधून लढत आहेत. त्यांना अधिकारी यांनी पराभूत करून दाखवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *