भारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..!

| नवी दिल्ली | भारतात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या अन् त्याचा आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण पाहता सर्वत्र विदारक चित्रच दिसत आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येथे होणार्‍या ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे. परिस्थिती बिघडली असतानाही आयपीएल 2021 आयोजनावरून बीसीसीआयला जाब विचारला जात आहे; पण परिस्थिती पाहता भारत ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारताला पर्याय म्हणून संयुक्त अरब अमिरात (यूएई) चा विचार सुरू आहे. जर पुढील सहा महिन्यांत देशातील परिस्थिती सुधारली नाही, तर ट्वेंटी-20 वर्ल्डकप यूएईत खेळवण्याचा विचार आयसीसी करत आहे.

ट्वेंटी-20 वर्ल्डकप यूएईत झाल्यास सर्वात जास्त आनंद पाकिस्तान संघाला होणार आहे. ते आधीपासूनच ही स्पर्धा यूएईत खेळवण्याची मागणी करत आहेत.

गतवर्षी कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारी ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धा रद्द करावी लागली होती. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि दररोज किमान साडेतीन लाख कोरोना रुग्ण सापडत आहेत. भारताच्या तुलनेत यूएईत ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करणे अधिक सोयीचे ठरेल. बीसीसीआय आणि अमिरात क्रिकेट बोर्डाचे चांगले संबंध आहेत आणि मागच्या वर्षी संपूर्ण आयपीएल स्पर्धा येथे खेळवण्यात आली होती. ट्वेंटी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने ठेवला आहे. शिवाय, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळूर, हैदराबाद, धर्मशाला आणि लखनौ येथे वर्ल्डकपचे सामने खेळवण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.