| पुणे | नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात करत पत्रकार भवन येथे साहित्यिक विश्वातील या वर्षीच्या पहिल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची नोंद झाली. चपराक साहित्य महोत्सव २०२१ हा तब्बल १५ पुस्तकांचे प्रकाशन करत थाटात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्टातील निरनिराळ्या भागातील १५ साहित्यिकांची पुस्तके अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.
चपराक प्रकाशनचे सर्वेसर्वा घनश्याम पाटील यांचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील सरस लिखाण करणाऱ्या नवोदितांचे साहित्य प्रकाशित करून त्यांना प्रकाश झोतात आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यापैकीच एक म्हणजे या वेळेस ज्योती हनुमंत भारती यांच्या ‘बोलावं म्हणतेय ‘ या पहिल्याच काव्यसंग्रहाचे चपराक प्रकाशनकडून प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे वाचकांनी जोरदार स्वागत केल आहे.
घनश्याम सुंदरा श्रीधरा बघ हा ग्रंथांचा अरुणोदय झाला असे म्हणत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी प्रकाशक घनश्याम पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी विविधांगी अशा १५ पुस्तकांचे प्रकाशन झाले त्यात प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, सदानंद भणगे, सुनील शिनखेडे, किरण लोखंडे, श्रीराम पंचिद्र, डॉ. भास्कर बढे, सुनील जवंजाळ, विजय जोशी, सुनील पांडे, डॉ. कैलाश दौंड, वैद्य ज्योती शिरोडकर, सुभाष घुमे, संजय गोरडे, शिल्पा जैन आणि प्रा.ज्योती हनुमंत भारती या लेखकांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे प्रदीप रावत म्हणाले की, सध्याच्या काळात साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात जे एक साचलेपण आले आहे, ती मरगळ झटकून एक खूप सुंदर साहित्यिक मेजवानी वाचकांना देण्याचा प्रयत्न या साहित्य संमेलनाने केलेला आहे.
प्रकाशन पश्चात उत्तरार्ध काव्य संमेलनात रंगला. या काव्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. कैलास दौंड होते तसेच ज्येष्ठ साहित्यिका प्रा. अंजली कुलकर्णी याही काव्य संमेलनात हिरीरीने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी उपस्थित कवींचा उत्साह वाढविला. काव्य संमेलन दणक्यात पार पडले, या काव्य संमेलनात देखील ज्योती हनुमंत भारती यांच्या कवितांना महाराष्ट्राच्या भावी काव्य क्षेत्रात खूप सुंदर भवितव्य आहे असे म्हणत काव्य संमेलन अध्यक्ष डॉ.कैलास दौंड यांनी पुस्तकासह कवियत्रीचे कौतुक केले.