IPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली..! इथे आणि या दिवशी होणार लिलाव..!

| मुंबई | भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर BCCIने लगेच पुढच्या हंगामाची तयारी सुरू केली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात IPL 2021साठी खेळाडूंचा लिलाव होणार हे सांगण्यात आलं होते. अखेर आज IPL गव्हर्निंग कौन्सिलने लिलावाची तारीखदेखील जाहीर केली.

फेब्रुवारीच्या १८ तारखेला ही लिलाव प्रक्रिया चेन्नईत पार पडणार असल्याची घोषणा IPLने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून केली. यंदाच्या IPL लिलावाआधी प्रत्येक संघाला आपल्या संघातील कायम राखलेल्या खेळाडूंची यादी आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी BCCIकडे सुपूर्द करायची होती. त्यानुसार २० जानेवारीपर्यंत सर्व संघांनी आपल्या संघातून करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी BCCIला दिली. आता १८ तारखेला होणाऱ्या लिलावात सर्व संघ आपल्याला हवा असलेला खेळाडू घेण्यासाठी उत्सुक आहेत.

जे भारतीय खेळाडू करारमुक्त झाले आहेत आणि ज्यांना पुढील हंगामात IPLमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा खेळाडूंनी ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. मूळ फॉर्म आणि इतर आवश्यक कागदपत्रे १२ फेब्रुवारीपर्यंत पोस्टाने पाठवली तरीही चालणार आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

IPL 2021चे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा हंगाम ११ एप्रिल ते ६ जून या कालावधीत रंगण्याची शक्यता आहे. लिलाव पार पडल्यानंतर IPLच्या यंदाच्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *