देशात पहिल्यांदाच एकाच दिवशी एकाच ठिकाणी दहा हजार नागरिकांचे लसीकरण करून साजरा होतोय लस महोत्सव…

| ठाणे | ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज दिवावासीयांकरिता दिवा येथील एस्.एम्.जी. विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महालसीकरण मोहिमेत १०,००० नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे डोस देण्यात येणार असून एकाच दिवशी एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण होण्याची राज्यातीलच नव्हे देशातील पहिलीच घटना असणार आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने दिवावासीयांनी उपस्थित राहून या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी करत लसीकरणानंतर देखील शासनाचे कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळणे, मास्कचा नियमित वापर करणे, सतत हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या कोरोना त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे असल्याचे आवर्जून सांगितले.

एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण मोहीमेचे आयोजन केल्याबद्दल ठाण्याचे महापौर श्री. नरेश म्हस्के, ठाणे मनपा आयुक्त डॉ. बिपीन शर्मा तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक करत त्यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे मनपा आयुक्त डॉ. बिपीन शर्मा, माजी उपमहापौर व नगरसेवक रमाकांत मढवी, ठामपा अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, नगरसेवक शैलेश पाटील, नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक दिपक जाधव, नगरसेविका सुनिता मुंडे, नगरसेविका दिपाली भगत, नगरसेविका दर्शना म्हात्रे, नगरसेविका अंकिता पाटील तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *