| शानदार, जबरदस्त, जिंदाबाद | शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून दिमाखदार राज्यस्तरीय कोविड योद्धा सन्मान सोहळा संपन्न..!

| ठाणे | कोविडच्या संकटकाळात ठाणे शहर -जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्वच डॉक्टरांनी – वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थानी प्रचंड मोठं कार्य केले आहे, त्यामुळेच कोरोनासारख्या संकटावर आपण हळूहळू मात करत आहोंत असे गौरवोद्गार राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज काढले. पण, कोरोनाच्या ब्रिटन येथे आढळून आल्या दुसऱ्या स्टेनच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात आपल्या सर्वांनाच सतर्क राहावे लागणार असल्याचे प्रतिपादन श्री शिंदे यांनी यावेळी केले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असलेल्या वैद्यकीय सेवेचेही त्यांनी मनापासून कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर खा. डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे शहराचे महापौर श्री नरेश म्हस्के, माजी महापौर सौ मीनाक्षी शिंदे, परिवहन सभापती श्री विलास जोशी , जेष्ठ नगरसेवक श्री राम रेपळे, श्री रमाकांत मढवी आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून ठाण्यात राज्यस्तरीय कोविड योद्धा सन्मान सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खा. डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने डॉक्टरांचा विशेष सन्मान करण्यात आला. राज्यात कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य व्यवस्था कमी पडू नये यासाठी अहोरात्र नि:स्वार्थीपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या राज्यभरातील कोविड योद्धाना ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्या कार्याचा सन्मान करत गौरविण्यात आले. यात ठाणे शहर – जिल्हा, मुंबईतील विविध हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, दानशूर स्वयंसेवी संस्था यांचा तसेच या कोविड संकट काळात राज्यभरात उत्कृष्ट काम केलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या निवडक पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोविड संकट काळात वैद्यकीय सेवा दिलेल्या डॉक्टरांचे – कर्मचाऱ्यांचे जाहीर आभार मानले. तर, येणाऱ्या काळातही शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळातही वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही आणि आमची टीम तत्पर राहील अशी ग्वाही दिली. नवीन वर्षात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची बांधणी जिल्हानिहाय व तालुका स्तरीय करून महाराष्ट्रभर कक्षाचे जाळे पसरवा जेणेकरून कोणताही रूग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहणार नाही अशी सूचना यावेळी डॉ श्रीकांत शिंदे यांनी केली.

तर, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या जेष्ठ पत्रकार श्री संतोष आंधळे यांनी अवयव दान विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. कुठल्याही अवयवाला रिप्लेसमेंट नाही, त्यामुळे अवयवदान बद्दल जनजागृती करण्यासाठी एक विशेष मोहीम शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने हाती घ्यावी अशी सूचनाही श्री आंधळे यांनी यावेळी केली.

पद्मश्री डॉ तात्याराव लहाने साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाला ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. सोबतच आज प्रकाशित झालेल्या शिवसेना वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथ हा रूग्णसेवेत काम करणाऱ्या समाजसेवकांसाठी दीपस्तंभ ठरेल असा आशावाद व्यक्त केला.

याप्रसंगी ठाणे मनपा महापौर श्री.नरेश म्हस्के साहेब, माजी महापौर सौ. मीनाक्षी ताई शिंदे, विविध हॉस्पिटलचे डॉक्टर्स, तसेच महाराष्ट्रच्या अनेक भागातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर , वैद्यकीय कर्मचारी , स्वयंसेवी संस्था यांचे आदी सर्वांचे आभार शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी विशेषकरून 24×7 अलर्ट राहणाऱ्या आणि संवेदनशीलपणे कार्यरत असणाऱ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातील सर्व 15 वैद्यकीय सहाय्यक आणि राज्यभरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानले

तर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आधारवड, प्रेरणास्थान मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ श्रीकांत दादा शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यापुढील काळात गरजू रुग्णांसाठी एक हक्काचे व्यासपीठ बनेल अशी ग्वाही मंगेश चिवटे यांनी दिली.  

एकंदरीत, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या मार्फत दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.