पहिला डोस आणि दुसऱ्या डोसात अंतर वाढविण्याच्या सल्ल्यानंतर, आता कोरोना होऊन गेल्यानंतर ९ महिन्यांनी लस देण्याची नवी शिफारस..!

| नवी दिल्ली – लोकशक्ती ऑनलाईन | कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांना सहा महिन्यानंतर लस दिली जावी, अशी शिफारस काही दिवसांपूर्वी अ‍ॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (एनटीएजीआय) केली होती. याच समितीने आता कोरोनातून बरे झाल्याना नऊ महिन्यांनंतर लस देण्यात यावी, असे म्हटले आहे. गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना लस देण्याची शिफारस समितीने केली आहे.

लसीकरणासंदर्भात आवश्यक त्या शिफारशी करण्यासाठी केंद्र सरकारने एनटीएजीआयची स्थापना केलेली आहे.

यापूर्वी सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधले अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याचा सल्ला या समितीने दिला होता. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा संसर्ग होऊ नये म्हणून दोन डोसमधले अंतर वाढवण्यात यावे, असे त्यावेळी समितीने सांगितले होते. याच समितीने आता सरकारला कोरोनामुक्त झालेल्यांचे लसीकरण कोरोनामुक्तीनंतर नऊ महिन्यांनी करण्यात यावे, असा सल्ला दिला आहे.

कोरोना संसर्ग झाल्यानंतर आणि पहिला डोस घेण्यामध्ये अधिक अंतर असेल तर शरीरामध्ये अ‍ॅण्टीबॉडीज तयार होण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढण्यासाठी फायदा होईल, असे समितीचे म्हणणे आहे. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोवरील लस द्यावी, असे समितीचे म्हणणे आहे. ज्या रुग्णांनी मोनोक्लोनल अ‍ॅण्टीबॉडीजच्या मदतीने किंवा कानव्हलेसंट प्लाझ्मा उपचारांच्या मदतीने कोरोनावर मात केली आहे, त्यांनी लसीचा डोस तीन महिन्यानंतर घेतला पाहिजे, असे एनटीएजीआयने स्पष्ट केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *