भविष्य घडवणारे शिक्षक स्वतःच्या भविष्याविषयी अंधारातच..! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन,सोलापूरच्या सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष..!

| सोलापूर | शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांचे पर्यायाने देशाचे भविष्य घडवणारे शिक्षक स्वतःच्या भविष्याशी निगडीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) बाबत मात्र अंधारात असल्याचे धक्कादायक वास्तव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, सोलापूरने केलेल्या ऑनलाईन सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. याबाबत संघटनेतर्फे एक प्रश्नावली तयार करून जिल्ह्यातील शिक्षकांना पाठवण्यात आली होती.

सध्या प्रशासनातर्फे सर्व जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शिक्षकांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत वर्ग करण्यासाठी कार्यवाही सुरु आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेतील कर्मचाऱ्यांना शासनाने परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करून तब्बल १५ वर्षे झाली. परंतु यातील हिशोबाच्या अनियमिततेमुले आधीच ही योजना वादाच्या भोवर्यात सापडलेली आहे. त्यात आता शासनाने कर्मचाऱ्यांना एनपीएस मध्ये वर्ग केल्याने कर्मचाऱ्यांचा संभ्रम अजूनच वाढला आहे. त्यात कर्मचाऱ्यांना विश्वासात घेण्याऐवजी प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलल्याने या योजनेविषयी कर्मचाऱ्यांना किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी संघटनेने हा सर्व्हे आयोजित केला होता..

यामध्ये एनपीएस संदर्भात काही मूलभूत गोष्टींवर आधारित दहा बहुपर्यायी प्रश्न विचारले गेले होते. यामध्ये एनपीएसचा फुलफॉर्म, त्यातील कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा, गुंतवणूक, देखरेख ठेवणारे अधिकारी असे प्रश्न होते. यामध्ये ४३० शिक्षकांनी सहभाग घेतला. यापैकी फक्त ५.६% म्हणजे २४ शिक्षकांना एनपीएसचा फुलफॉर्म अचूक निवडता आला. तसेच एनपीएस योजनेची केंद्रीय देखभाल अभिकरण म्हणून काम पाहणाऱ्या संस्थेचे नाव तब्बल ६१% शिक्षकांना माहित नाही.या योजनेत सहभागी होण्यासाठी भरून द्याव्या लागणाऱ्या CSRF फॉर्मचा फुलफॉर्म ६०.७% शिक्षकांना माहीतच नाही. जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आहरण व संवितरण अधिकारी शिक्षणाधिकारी असतात हे फक्त १०% शिक्षकांना माहित आहे. एनपीएस ही शेअर बाजारावर आधारित योजना आहे, यामध्ये कर्मचाऱ्याच्या खात्यावरील रक्कम कर्मचारी बाजारात कोणत्या प्रकारे गुंतवू शकतो हे ७७.७% शिक्षकांना माहितीच नाही. ही रक्कम आपण काही फंड मॅनेजरच्या माध्यमातून गुंतवू शकतो मात्र ८७.९% शिक्षकांना याविषयी नीटशी माहिती आढळून आली नाही. सरासरी ५२% शिक्षकांनी माहित नाही हा पर्याय नोंदवला आहे.सरासरी फक्त १९.७९% शिक्षकांनी यातील प्रश्नांची बरोबर उत्तरे दिलेली आहेत.

स्वतःच्या आयुष्यभराची रक्कम आपण ज्या योजनेत गुंतवणार आहोत त्यासंबंधी शिक्षकांना कोणतीही योग्य माहिती न देता व त्यांना विश्वासात न घेता ही योजना केवळ कारवाईच्या बडग्याने शिक्षकांच्या माथी मारणे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, सोलापूरचे जिल्हा प्रशासन प्रकाश कोळी यांनी दिली. एनपीएसची अंमलबजावणी करण्याआधी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा परिपूर्ण हिशोब देण्यावर संघटन आग्रही असून हीच रक्कम एनपीएसमध्ये ओपनिंग बॅलन्स म्हणून येणार असल्याने ही मागणी रास्त असल्याचे संघटनेचे प्रवक्ते बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा जुना हिशोब पूर्ण न करता शिक्षकांना एनपीएस मध्ये ढकलणे हे शासन व प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या भविष्याची जबाबदारी झटकून या योजनेचे अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याची भावना सामान्य शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *