नेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..!

| मुंबई | महाराष्ट्र शासनाचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतीच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ५१ गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे. सुपरिचित कामगार नेते अविनाश दौंड यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याने राज्यातील कामगार क्षेत्रात, विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अतिशय समाधानाची भावना आहे.

अविनाश दौंड यांनी राज्य सरकारी कर्मचारी चळवळीचे जनक स्व.र.ग.कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सतत ३५ वर्षं राज्यातील १७ लाख सरकारी- निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संघटनेचे नेतृत्व केले आहे. सद्यस्थितीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र या राज्यातील सर्वात मोठ्या संघटनेचे कार्यालय सचिव, बलाढ्य अशा बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस, महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉइज फेडरेशनचे कार्याध्यक्ष, आदर्श संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय लिपिक वर्ग संघटनेचे प्रमुख सल्लागार, ७८ लक्ष सभासद संख्या असलेल्या अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, तसेच दि मंत्रालय कन्झुमर्स को.ऑप सोसायटीचे संचालक अशा विविध पदांवर ते जोमाने कार्य करीत आहेत.

याव्यतिरिक्त कामगार संघटना कृती समितीचे दौंड हे सदस्य असून कामगार विषयावर सातत्याने व्याख्याने देऊन प्रबोधन कार्य करीत आहेत. कै.नारायण मेघांनी लोखंडे महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्थेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ते गेली अनेक वर्षे ज्ञानदान करत आहेत. त्यांचा एक काव्यसंग्रह राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला असुन आणखी दोन सामाजिक आणि कामगार विषयांवरील काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होत आहेत.

अविनाश दौंड यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शासन मुद्रण व लेखन सामग्री विभागाचे संचालक रुपेंद्र मोरे, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबईचे व्यवस्थापक मनोज वैद्य आणि सर्व व्यवस्थापकीय अधिकारी, राज्यातील सर्व शासकीय मुद्रणालयातील कामगार संघटना यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी यांनी या पुरस्काराचे स्वागत केले असून अध्यक्ष अशोक दगडे यांनी हा सरकारी कर्मचारी चळवळीचा बहुमान असल्याचे म्हटले आहे. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल शासनाचे आभार मानले असुन या पुरस्काराने राज्यातील लक्षावधी सरकारी कर्मचाऱ्यांना आनंद झाला असल्याची माहिती दिली आहे.

अध्यक्ष समस्त गोनवडी ग्रामस्थ मंडळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, यांनीही दौंड यांचा अतिशय अभिमान वाटत असल्याचे कळविले आहे. पदद्मश्री तात्याराव लहाने, आमदार कपिल पाटील, कामगार नेते डॉ डि.एल. कराड, कामगार कल्याण आयुक्त रविराज ईळवे ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी या मान्यवरांनी अविनाश दौंड यांचे अभिनंदन केले आहे.

अविनाश दौंड यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कामगार कल्याण मंडळाचे आभार व्यक्त केले असून या यशात पत्नी सौ.ज्योती, सर्व कुटुंबीय, ग्रामस्थ, हितचिंतक आणि राज्यातील लक्षावधी सहकारी कर्मचा-यांनी मोलाची साथ दिली असून सदर मानाचा पुरस्कार स्व.श्रद्धेय र.ग.कर्णिक यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करत असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.