लोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..?

सामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात तर काहींशी मात्र अजिबात जुळत नाही. हे जुळवण्याचं काम सर्वस्वी जसं आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं अगदी तसंच ते समोरच्यावरही अवलंबून आहे.

हे खरं जरी असलं तरी प्रत्येक व्यक्तींना आपण काही सांभाळत बसत नाही. घरातल्यासुद्धा एखाद्या व्यक्तीला आपल्याला सपशेल दुर्लक्ष करावे लागते. कारण व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळणारी नसतात. आणि त्याठिकाणी समायोजन करण्याची आवश्यकता वाटत नसल्याने दुर्लक्ष करणे हा पर्याय आपण निवडतो.

परंतु अशा व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने आपलं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम करत असतात. विनाकारण बदनामी करतात, त्रास देतात, आपल्या प्रगतीच्या आड येतात. पुष्कळदा असा अनुभव येतो कि त्या व्यक्तीच्या विरोधी विचार करण्यातच आपला बहुसंख्य वेळ आणि ऊर्जा नष्ट झालेली असते.

म्हणून अडथळे तर येतातच कालांतराने अपयश सुद्धा पचवणं खूप जड होऊन बसतं. अशा या लोकांची करणे आपण आज जाणून घेऊया. जेणेकरून आपल्याला आपलं मार्ग निवडता येईल.

१) जे आपल्याला सहज जमते ते त्यांना जमत नसेल तर अशावेळी बदनामी करण्याशिवाय त्यांच्या हातात काही उरलेलं नाही असे विचार त्यांना आपली बदनामी करण्यासाठी उद्युक्त करतात.

२) जर एखाद्या व्यक्तीला त्याची प्रगती होण्यापासून थांबवायचं असेल तर त्याला नको नको ते बोलून त्याची मानसिकता बिघडवायची आणि यातूनच त्याला मागे खेचायच कारण मानसिकता बिघडली की आपल्याला आपण काय करतोय याच भान राहत नाही आणि आपण भरकटतो.

३) जेव्हा आपण ठरवलेल्या ध्येयापासून आपलं लक्ष अजिबात हटवत नाही त्यावेळी आपलं लक्ष दुसरीकडे जावं यासाठी आपली बदनामी केली जाते जेणेकरून आपल्याला लोक काय बोलतात याकडे आपलं लक्ष जाते आणि आपण त्याकडे जास्त लक्ष देऊन त्यामधे अडकतो.

४) सध्या जगात स्पर्धा सगळीकडेच चालू आहे मग ते शिक्षण असो, नोकरी असो नाहीतर जीवनशैली. आणि या स्पर्धेच्या युगात पुढे जाण्याचे प्रयत्न करायचं सोडून काहीजण अशा चुकीच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.

५) ज्यांना काहीच ध्येय नसते त्यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो आणि या रिकाम्या वेळेत स्वतःसाठी ध्येय ठरवणे, ज्यातून काही शिकायला मिळेल अस काही करण्यापेक्षा जे पुढे जात आहेत अशा व्यक्तींना बदनामी करण्याचं काम ते करतात.

६) काही व्यक्तींना लहानपणापासूनच नकारार्थी वातावरण मिळालेलं असते. ज्यांच्या घरात सतत लोकांची बदनामी होत असते, टीव्ही सिरियल मधे सुद्धा ज्यांना नकारार्थी अभिनय आवडतो असे व्यक्ती कायम इतरांना त्रास होईल, आवडणार नाही असे वागून त्यांची बदनामी करतात आणि त्यांना प्रगतीपासून मागे खेचतात.

काही व्यक्ती प्रयत्न सुद्धा करतात पण तरीसुद्धा यश मिळत नाही आणि मग अशावेळी लोक आपल्या अपयशाला हसतील , काय म्हणतील या भीतीने जो प्रगती करतोय त्यालाच दोष देऊन त्याची बदनामी करतात. उदा. अरे त्याने खोटं बोलून ते मिळवलं आहे मला ते जमल नाही असे बोलून प्रगती करणाऱ्या व्यक्तीला बदनाम करायचं.

माझी प्रगती ही माझ्याच हातात आहे. मी जर ठरवलं तर मला जे आणि जसे हवं अगदी तस मला घडवता येईल फक्त मला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे.कारण लोक त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी बदनामी करणारच म्हणून आपल्याला स्वतःलाच स्वतःचा पाठिंबा बनवायचं. आणि आपल्यालाच ठरवायचं आहे की लक्ष कुठे द्यायचं आपल्या ध्येयाकडे की लोकांच्या बदनामीकडे…

– मिनल वरपे, मनोचिकित्सक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *