महाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..!

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शेकडो हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. अखेर आजच्याच दिवशी म्हणजेच सन १९६० साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश घेऊन आले. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच, १ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे.

आज महाराष्ट्र दिनी आपण क्रिकेटमधील असे काही मराठी खेळाडू पाहणार आहोत, ज्यांचा नावलौकिक आणि त्यांनी केलेले अनेक विक्रम-पराक्रम क्रिकेट इतिहासात अजरामर झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी मोठेमोठे विक्रम केले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे महाराष्ट्रीयन गोलंदाज –

. सुभाष गुप्ते – मुंबईत जन्मलेल्या सुभाष गुप्ते यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९५१ ला इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३६ कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी २९.५५ च्या सरासरीने १४९ विकेट्स घेतल्या. यात त्यांनी १२ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

४. सचिन तेंडूलकर – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वोत्तम फलंदाज म्हणून तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावलेच पण त्याचबरोबर त्याने गोलंदाजीतही त्याचे महत्त्वाचे योगदान दिले आहे.

त्याने त्याच्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत २०० कसोटी, ४६३ वनडे आणि १ टी२० सामना असे मिळून ६६४ सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले आहेत. यामध्ये त्याने ४६.५३ च्या सरासरीने २०१ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने २ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्याने दोन्ही वेळा वनडेत ५ विकेट्स घेतल्या आहेत.

३. रवी शास्त्री – मुंबईचे माजी कर्णधार आणि भारतीय संघाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्रींनी फेब्रुवारी १९८१ ला न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यातून आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

त्यांनी फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही भरीव कामगिरी केली आहे. शास्त्री यांनी त्यांच्या कारकिर्दीत ८० कसोटी आणि १५० कसोटी सामने असे मिळून एकूण २३० आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ३८.६९ च्या सरासरीने २८० विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्यांनी ३ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

२. अजित आगरकर – मुंबईचा असणाऱ्या अजित अगरकरने एप्रिल १९९८ ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्यानंतर २६ कसोटी, १९१ वनडे सामने आणि ४ टी२० सामने खेळले. त्याचा २००७ च्या पहिल्या टी२० विश्वविजेत्या भारतीय संघातही समावेश होता.

त्याने एकूण २२१ सामने खेळताना ३१.०९ च्या सरासरीने ३४९ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी ३ वेळा केली.

१. झहिर खान – श्रीरामपूरमध्ये जन्मलेल्या झहिर खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना अनेकदा भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. २०११ च्या विश्वचषकातही तो भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.

त्याने ऑक्टोबर २००० ला केनिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्यानंतर ९२ कसोटी, २०० वनडे आणि १७ टी२० सामने असे मिळून ३०९ सामने खेळले.

डावकरी वेगवान गोलंदाज असणाऱ्या झहिरने ३०९ सामन्यात ३१.१४ च्या सरासरीने ६१० विकेट्स घेतल्या. तसेच त्याने एका डावात ५ विकेट्स घेण्याची १२ वेळा कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे महाराष्ट्रीयन खेळाडू –

५. अजिंक्य रहाणे –

भारतीय कसोटी संघाचा सध्याचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने भारताकडून इंग्लंड विरुद्ध मँचेस्टर येथे ऑगस्ट २०११ ला टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले.

त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७२ कसोटी, ९० वनडे आणि २० टी२० सामने असे मिळून एकूण १८२ सामने खेळताना ३७.७० च्या सरासरीने ९८९३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १५ शतकांचा आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे.

४. दिलीप वेंगसरकर –

७० आणि ८० च्या दशकात सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांच्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे क्रिकेटपटू म्हणजे दिलीप वेंगसकर. जानेवारी १९७६ ला न्यूझीलंड विरुद्ध ऑकलंडला झालेल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वेंगसरकरांनी लॉर्ड्सच्या मैदानावर सलग तीन शतके करण्याचा पराक्रमही केला.

त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४५ सामन्यात ३९.३० च्या सरासरीने १८ शतके आणि ५८ अर्धशतकांसह १०३७६ धावा केल्या.

३. सुनिल गावसकर –

‘लिटील मास्टर’ सुनील गावसकरांनी १६ वर्षे भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीची धूरा समर्थपणे सांभाळली. ही धूरा सांभाळताना त्यांनी अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. १९७१ ला वेस्ट इंडिज विरुद्धच्या पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्यांनी १२५ कसोटी आणि १०८ वनडे असे मिळून एकूण २३३ सामने खेळताना ४६.२० च्या सरासरीने १३२१४ धावा केल्या. यामध्ये त्यांनी ३५ शतके आणि ७२ अर्धशतके केली आहेत.

२. रोहित शर्मा –

भारतीय वनडे आणि टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने मागील काही वर्षात त्याच्या दमदार खेळीने वेगळीच छाप उमटवली आहे. २००७ ला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पदार्पण करणारा रोहित आज एक दिग्गज सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखला जातो.

२००७ रोहितने वनडे आणि टी२० अशा दोन्ही प्रकारात पदार्पण केले. पण कसोटीत पदार्पण करण्यासाठी मात्र त्याला २०१३ सालाची वाट पहावी लागली. रोहितने आत्तापर्यंत ३७ कसोटी, २२४ वनडे आणि १०८ टी२० सामने असे मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३६९ सामने खेळले आहेत.

या ३६९ सामन्यांमध्ये त्याने ४४.३९ च्या सरासरीने १४४५४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ४० शतकांचा आणि ७४ अर्धशतकांचा समावेश आहे.

१. सचिन तेंडुलकर – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आहे.

मुंबईत रहाणाऱ्या सचिनने वयाच्या १६ व्या वर्षीत १९८९ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत २०० कसोटी, ४६३ वनडे आणि १ टी२० सामना असे मिळून ६६४ सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले आहेत.

त्याने ६६४ सामन्यात ४८.५२ च्या सरासरीने ३४३५७ धावा केल्या असून सर्वाधिक १०० शतके आणि १६४ अर्धशतके केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.